
सामना ऑनलाईन । चैन्नई
आयआयटी मद्रास कॅम्पसमध्ये बुधवारी गर्लफ्रेंडवरून दोन तरुणांमध्ये तुफान राडा झाला. यात रागाच्या भरात एकाने दुसऱ्याला चाकूने भोसकले. कॉलेजमधील एका तरुणीवर या दोघांचेही प्रेम आहे. याच मुद्दयावरून त्यांच्यात वाद झाल्याचे पोलिसांनी सांगितले आहे. मनोज (24), प्रमोद कौशिक (24) अशी या दोघांची नावे आहेत. या वादात जखमी झालेल्या प्रमोदवर रुग्णालयात उपचार सुरू आहेत. तर मनोज फरार आहे.
मनोज आणि प्रमोद दोघे आयआयटी एमटेकच्या दुसऱ्या वर्गात शिकत आहेत. दोघेही कॉलेजमधील एकाच तरुणीवर प्रेम करतात. यावरून त्यांच्यात सतत वाद होत असत. बुधवारीही त्यांच्यात याच विषयावरून कडाक्याचे भांडण झाले. हे भांडण इतके विकोपाला गेले की मनोजने प्रमोदला चाकूने भोसकले. प्रमोद रक्ताच्या थारोळ्यात पडताच मनोजने तिथून पळ काढला. त्यानंतर पोलिसांनी प्रमोदला तात्काळ रुग्णालयात दाखल केले. पोलीस मनोजचा कसून शोध घेत आहेत.



























































