फ्रीस्टाईल हाणामारी करणाऱया ‘त्या’ दोन शिक्षिका निलंबित

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

गेल्या आठवडय़ात भरतगाव (ता. सातारा) येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेत दोन शिक्षिकांमध्ये मारहाणीची घटना घडली होती. या घटनेची गंभीर दखल घेत जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी विनय गौडा यांनी दोन्ही शिक्षिकांवर निलंबनाची कारवाई केली आहे. त्यामुळे रंजना चौरे यांचे मुख्यालय खटाव, तर मनीषा भुजबळ यांचे मुख्यालय कराड येथे असणार आहे.

भरतगाव येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेत उपशिक्षिका मनीषा भुजबळ व रंजना चौरे या दोघींमध्ये मारामारीची घटना घडली होती. याबाबत त्यांनी पोलीस ठाण्यात परस्पर विरोधी तक्रारी दिल्या होत्या. शिक्षणाधिकारी शबनम मुजावर यांनी ही घटना गांभीर्याने घेत सातारा पंचायत समिती स्तरावरून तत्काळ अहवाल मागविला होता. याबाबत सविस्तर अहवाल शिक्षण विभागाकडून विनय गौडा यांच्याकडे सादर करण्यात आला होता.

भरतगाव शाळेत झालेल्या मारहाणीच्या घटनेने भरतगावची त्याचप्रमाणे जिल्हा परिषदेचीही बदनामी झाली होती. याबाबत भरतगाव ग्रामपंचायत व शाळा व्यवस्थापन समितीने दोन्ही शिक्षिकांची बदली करा, अन्यथा शाळेला टाळे ठोकू, असा इशारा दिला होता. दोन शिक्षिकांमध्ये शाळेतच झालेली मारहाणीची घटना गंभीर असल्याने गौडा यांनी दोन्ही शिक्षिकांना निलंबित केले आहे.