
राजधानी दिल्लीत पाकिस्तानच्या आयएसआय संघटनेचे दोन दहशतवादी घुसले असून याठिकाणी दहशतवादी कारवाया करण्याचा त्यांचा कट असल्याची माहिती गुप्तचर यंत्रणांना मिळाली आहे. या पार्श्वभूमीवर सुरक्षा दलांकडून दोन्ही दहशतवाद्यांची रेखाचित्रे जारी करण्यात आली आहेत. गुजरातमध्येही पाकिस्तानचे कमांडो आणि दहशतवादी घुसण्याच्या तयारीत असून गुजरातमध्ये त्यांचा दंगली घडवण्याचा डाव असल्याची माहिती गुप्तचर यंत्रणांना मिळाली आहे. त्यामुळे सागरी किनाऱयांवरील आणि बंदरांवरील सुरक्षाव्यवस्था वाढवण्यात आली आहे.
जम्मू-कश्मीरमधून 370 कलम हटवल्यानंतर पाकिस्तानचा तिळपापड झाला आहे. या पार्श्वभूमीवर हिंदुस्थानात दहशतवादी कारवाया करण्याचा पाकिस्तानचा कट असल्याचे उघड झाले आहे. पाकडय़ा दहशतवाद्यांकडून हिंदुस्थानात सागरी मार्गाने घुसखोरी करण्याचा प्रयत्न सुरू आहे. त्यामुळे तामीळनाडू, कर्नाटकमध्येही हाय ऍलर्ट जारी करण्यात आला आहे. त्यानंतर आता दिल्ली आणि गुजरातवरही दहशतवादाचे सावट आहे. गुप्तचर यंत्रणांना दिल्लीत दोन दहशतवादी घुसल्याची माहिती मिळाल्यानंतर तातडीने दिल्लीतील संवेदनशील ठिकाणांवर आणि गर्दीच्या ठिकाणी सुरक्षाव्यवस्था वाढवण्यात आली आहे. तसेच पोलीस पेट्रोलिंगही वाढवण्यात आले आहे.
कोईम्बतूरमध्ये एनआयएचे छापे
एनआयए अर्थात राष्ट्रीय तपास यंत्रणेने तामीळनाडूच्या कोईम्बतूरमध्ये छापे टाकले. एनआयएच्या अधिकाऱयांनी 5 ठिकाणी छापेमारी केली. दहशतवादी संघटनांशी संपर्क असल्याच्या संशयावरून हे छापे टाकण्यात आले. गेल्या आठवडय़ात लष्कर ए तोयबाचे 6 दहशतवादी पाकिस्तानातून श्रीलंका मार्गे हिंदुस्थानात घुसल्याची गुप्त माहिती एनआयएला मिळाली होती. या पार्श्वभूमीवर हिंदुस्थानात अनेक भागांत हाय ऍलर्ट जारी करण्यात आला होता.
तटरक्षक दल, सागरी पोलीस दलाचे जवान तैनात
गुजरातमध्ये तटरक्षक दल तसेच सागरी पोलीस आणि स्थानिक पोलीस तैनात ठेवण्यात आले आहेत. गुजरातमधील सर्व बंदरांवरील सुरक्षाव्यवस्था वाढवण्यात आली असून दहशतवादी छोटय़ा होडय़ांमधून कच्छच्या खाडीमार्गे गुजरातमध्ये दाखल होऊ शकतात. या पार्श्वभूमीवर गुजरातमधील समुद्र किनाऱयांवर कडक सुरक्षाव्यवस्था तैनात करण्यात आली आहे. एसआरपीएफच्या 60 जवानांना सर्व चेकपॉईंट्सवर तैनात करण्यात आले आहे.

























































