
जम्मू कश्मीरमध्ये लष्कराने ‘ऑपरेशन ऑल आऊट’ला वेग दिला आहे. जम्मू कश्मीरच्या शोपिया जिल्ह्यात झालेल्या चकमकीत सुरक्षा दलाला मोठे यश मिळाले आहे. या चकमकीत सुरक्षा दलाने दोन दहशतवाद्यांचा खात्मा केला आहे. मंगळवारी रात्रीपासून चकमक सुरू असल्याची माहिती मिळाली आहे. परिसराची नाकाबंदी करून सुरक्षा दलाने शोधमोहिम हाती घेतली आहे.
शोपिया जिल्ह्यातील सुगन भागात दहशतवादी लपल्याची माहिती सुरक्षा दलाला मिळाली होती. मिळालेल्या माहितीच्या आधारे सुरक्षा दलाने दहशतवादी लपलेल्या भागाला घेराव घातला. सुरक्षा दलाने घेराव घातल्याचे लक्षात येताच दहशतवाद्यांनी सुरक्षा दलाच्या जवानांवर गोळीबार करण्यास सुरुवात केली. सुरक्षा दलाने प्रत्युत्तरादाखल केलेल्या कारवाईत दोन दहशतवाद्यांचा खात्मा करण्यात सुरक्षा दलाला यश आले आहे. मंगळवारी रात्रीपासून ही चकमक सुरू होती. परिसरात आणखी काही दहशतवादी लपल्याची शक्यता असल्याने सुरक्षा दलाची शोधमोहीम सुरू आहे. दहशतवाद्यांच्या कारवाया वाढत असल्याने सुरक्षा दलाने मोठ्या प्रमाणात शोधमोहीम हाती घेतली आहे.




























































