सिग्नलने घात केला, बांगलादेशात दोन ट्रेनच्या टक्करीत 16 जणांचा मृत्यू, 60 जखमी

808

बांगलादेशच्या ब्राह्मणबरिया जिल्हय़ात काल उशिरा रात्री दोन प्रवासी रेल्वे गाडय़ांमध्ये झालेल्या अपघातात 16 जणांचा मृत्यू झाला तर अनेक 60 जण जखमी झाले. सिग्नलकडे दुर्लक्ष केल्यामुळे हा अपघात झाल्याचे सांगण्यात येत आहे. दरम्यान, अपघाताची तीक्रता पाहता मृतांचा आकडा आणखी वाढू शकतो, अशी शक्यता प्रशासनाने व्यक्त केली आहे.

मंदोबाघ रेल्वे स्थानकावर मध्यरात्री 2 वाजता हा अपघात घडला. चितगावला जाणारी उदयन एक्प्रेस ही रेल्वे स्थानकावरून निघत असताना तिथे ढाक्याला जाणारी तुर्ना निशिता एक्प्रेसबरोबर तिची टक्कर झाली. उदयन एक्प्रेस रूळ बदलत असताना हा अपघात झाला. दोन्ही गाडय़ांच्या चालकांनी सिग्नलकडे दुर्लक्ष केल्यामुळे हा अपघात झाला. अपघातात 12 जण जागीच ठार झाले तर दोघांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. डब्यात अजूनही अनेक जण अडकून पडल्यामुळे मृतांची संख्या वाढू शकते असे सांगण्यात येत आहे.

चालक निलंबित, 4 चौकशी समित्या  

याप्रकरणी दोन्ही गाडय़ांच्या चालकांचे तत्काळ निलंबन करण्यात आले असून अपघाताच्या चौकशीसाठी चार समित्या स्थापन करण्यात आल्या आहेत. तसेच जिल्हा न्यायदंडाधिकाऱयांच्या अध्यक्षतेखालील समितीकडूनही चौकशी करण्यात येणार आहे.

आपली प्रतिक्रिया द्या