
सातारा शहर परिसरातील दुचाकी चोरीप्रकरणी स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागाच्या पथकाने दोघांना जेरंबद करून त्यांच्याकडून 4 दुचाकी जप्त केल्या. राजेश सुखदेव चौगुले, संभाजी मोहन जाधव (दोघे रा. अतीत, ता. सातारा) अशी संशयित आरोपींची नावे आहेत. साताऱ्यातून दुचाकी चोऱ्यांचे प्रमाण वाढल्याने स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागाचे पोलीस त्याबाबत तपास करीत होते.
खिंडवाडी येथे चोरीच्या दुचाकी विक्रीसाठी काहीजण येणार असल्याची माहिती स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागाला मिळाली. त्यानुसार पोलिसांनी सापळा लावला असता संशयित राजेश चौगुले व संभाजी जाधव तेथे आले. दुचाकीबाबत पोलिसांनी विचारताच त्यांनी त्या दुचाकी चोरीच्या असल्याची कबुली दिली. अधिक चौकशी केली असता त्यांनी आणखी दोन दुचाकी असल्याचे सांगितले. स्थानिक गुन्हे अन्वेषण पथकाने एकूण 4 दुचाकी जप्त करून संशयितांना अटक केली. त्यातील 2 दुचाकी चोरीप्रकरणी सातारा शहर पोलिसात, एका दुचाकीच्या चोरीप्रकरणी शाहूपुरी पोलीस ठाण्यात तक्रारी दाखल असल्याचे समोर आले. स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागाने संशयितांसह जप्त केलेल्या दुचाकी शहर पोलिसांकडे वर्ग केल्या आहेत.
जिल्हा पोलीस प्रमुख अजयकुमार बन्सल, अपर पोलीस अधीक्षक अजित बोऱ्हाडे, पोलीस निरीक्षक किशोर धुमाळ यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक पोलीस निरीक्षक रमेश गर्जे, सहायक पोलीस निरीक्षक आनंदसिंग साबळे, फौजदार गणेश वाघ, सहायक फौजदार तानाजी माने, पोलीस हवालदार सुधीर बनकर, अजित कर्णे, प्रवीण पवार, शिवाजी भिसे, केतन शिंदे यांनी ही कारवाई केली.





























































