
पार्क केलेली दुचाकी चोरून चोरटा सटकला, पण तो ज्या मार्गाने गेला तेथील सीसीटीव्ही बंद होते. त्यामुळे टिळक नगर पोलिसांनी उलटय़ा दिशेने तपास करीत मानखुर्दमध्ये चोराला पकडले आणि त्याच्याकडून चोरीच्या दोन मोटारसायकल हस्तगत केल्या.
गणेश झंजाड (44) याने त्यांची युनिकॉर्न दुचाकी टिळक नगर येथील त्रिभुवन सोसायटीच्या गेटसमोर पार्क करून ठेवली होती. 8 ऑगस्ट रोजी सकाळी गणेश दुचाकी पार्क करून कामाला निघून गेले, मात्र परतल्यावर त्या ठिकाणी दुचाकी नसल्याचे आढळून आले. दुचाकी चोरी झाल्याचे लक्षात येताच गणेश यांनी टिळक नगर पोलीस ठाण्यात तक्रार दिली. याप्रकरणी गुन्हा दाखल झाल्यानंतर वरिष्ठ निरीक्षक संतोष डेंमरे यांच्या मार्गदर्शनाखाली सपोनि राहुल वाघमारे व पथकाने तपास सुरू केला.
पथकाने घटनास्थळावरून चोरटा ज्या दिशेने गेला त्या मार्गावरील सीसीटीव्ही फुटेज तपासले, परंतु ते बंद आढळून आले. त्यामुळे आरोपी ज्या मार्गाने घटनास्थळी आला होता त्या मार्गावर उलट तपास सुरू केला. तेव्हा आरोपी एका अन्य दुचाकीस्वाराकडून लिफ्ट घेऊन आल्याचे आढळले. तो वांद्रे-कुर्ला संकुलातील भारत डायमंड कंपनीच्या जॅकेटमधून बाहेर पडत असताना दिसल्यानंतर पोलिसांनी तेथून त्याची इत्थंभूत माहिती मिळवली. मग तांत्रिक बाबींच्या आधारे केलेल्या तपासात तो चोरटा मानखुर्द येथे राहत असल्याचे समजले. त्यानुसार वाघमारे व पथकाने मानखुर्द गाठून प्रणेश कंबू (27) याला पकडले. त्याच्याकडून चोरीच्या दोन दुचाकी हस्तगत करण्यात आल्या.