
पुर्ववैमनस्यातून एकाचा खून करून पसार झालेल्या मूख्य आरोपीसह दोघांना भारती विद्यापीठ पोलिसांनी जूना कात्रज बोगदा परिसरातून अटक केली. यातील तीन आरोपींना यापुर्वी अटक करण्यात आली आहे. मात्र, मूख्य आरोपी मागील दोन महिन्यांपासून फरार होता. अजय सदाशिव रेणूसे (24, रा. आंबेगाव), दत्ता राहूल कदम (22, रा. आंबेगाव) अशी अटक करण्यात आलेल्यांची नावे आहेत. तर, प्रकाश निवृत्ती रेणूसे (27, रा. कात्रज) असे खून झालेल्याचे नाव आहे.
आंबेगाव भागात 13 डिसेंबर रोजी ही घटना घडली होती. यातील मूख्य आरोपी अजय रेणूसे याने साथीदारांसह प्रकाश यांना मारहाण केली. यात ते गंभीर जखमी झाले. उपचारादरम्यान 19 डिसेंबरला त्यांचा मृत्यू झाला. त्यानंतर दाखल गुन्ह्यात पोलिसांनी तात्काळ तिघांना अटक केली. मात्र, आरोपी अजय रेणूसे आणि कदम हे दोघे पसार झाले होते. सुमारे दोन महिन्यांपासून ते पोलिसांना चकवा देत होते. या दरम्यान संशयीत आरोपी हे कात्रज बोगदा परिसरात नातेवाईकांना भेटायला येणार असल्याची माहिती अंमलदार अभिजीत जाधव, निलेश ढमढेरे, चेतन गोरे यांच्यासह पथकाला मिळाली होती. यानूसार पथकाने सापळा रचून दोघांना ताब्यात घेतले.
चौकशीत त्यांनी गुन्हा केल्याची कबूली दिली. पोलीस उपायुक्त स्मार्तना पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली भारती विद्यापीठ पोलीस ठाण्याचे वरिष्ठ निरीक्षक विजय कुंभार, पोलीस निरीक्षक विजय पुराणिक, सहायक निरीक्षक अमोल रसाळ, उपनिरीक्षक धीरज गुप्ता, अंमलदार हर्षल शिंदे, राहुल तांबे, विक्रम सावंत यांच्यासह पथकाने ही कारवाई केली.


























































