
7 ऑक्टोबर 2023 रोजी हमासने इस्रायलवर केलेल्या हल्ल्याला दोन वर्षे पूर्ण झाली आहेत. हमासने केलेल्या हल्ल्याला प्रत्युत्तर म्हणून इस्रायलने गेल्या दोन वर्षांत गाझा पट्टीवर केलेल्या हल्ल्यात जवळपास 90 टक्के गाझा उद्ध्वस्त झाला आहे. बॉम्बहल्ला आणि जमिनीवरील लष्करी कारवाईमुळे गाझा पट्टी ढिगाऱ्यांचा ढीग बनली आहे. गाझात 90 टक्के शाळा भुईसपाट झाल्या आहेत. 99 टक्के शेतजमीन नापीक बनली आहे. लाखो पॅलेस्टिनी लोकांना पाणी, वीज आणि वैद्यकीय सेवा नसलेल्या तंबूंमध्ये राहण्यास भाग पाडले जात आहे. इस्रायलच्या हल्ल्यात आतापर्यंत 65 हजारांहून अधिक लोकांना आपला जीव गमवावा लागला आहे.
54 दशलक्ष टन कचरा जमा
गाझा शहर हे ढिगाऱ्यांचे शहर बनले आहे. या ठिकाणी दिमाखात उभ्या असलेल्या 80 टक्के इमारती उद्ध्वस्त झाल्या आहेत. इस्रायली लष्करी हल्ल्यांमुळे उद्ध्वस्त झालेल्या इमारतींमधील 54 दशलक्ष टनांहून अधिक कचरा गाझामध्ये आहे. हा ढिगारा स्वच्छ करण्यासाठी किमान 10 वर्षे लागतील तसेच यासाठी 1.2 ट्रिलियन खर्च येईल, असा अंदाज आहे.
शाळा-विद्यापीठे जमीनदोस्त
गाझामध्ये शिक्षण आणि आरोग्य सेवा दोन्ही उद्ध्वस्त झाल्या आहेत. 7 ऑक्टोबर 2023 पूर्वी गाझामध्ये 850 शाळा होत्या. यातील 90 टक्क्यांहून अधिक शाळा जमीनदोस्त झाल्या आहेत. गाझामधील 10 विद्यापीठांच्या 51 इमारतींपैकी एकही इमारती कार्यरत स्थितीत नाही. 30 हजार कोटी रुपयांच्या शैक्षणिक पायाभूत सुविधा उद्ध्वस्त झाल्या आहेत.
90 टक्के लोक बेघर
गाझात होत असलेल्या रोजच्या हल्ल्यात इमारती पडल्या आहेत. येथील 90 टक्के लोक बेघर झाले आहेत. उत्तर आणि दक्षिण गाझातून हाकलून लावलेले लाखो लोक आता पाणी, वीज किंवा औषधांशिवाय तंबूत राहत आहेत. गाझा पट्टीचा सुमारे 80 टक्के भाग लष्करी क्षेत्रात आहे, जिथे नागरिकांना प्रवेश करण्यास मनाई आहे. आजपर्यंत, 66,158 पॅलेस्टिनी नागरिक मारले गेले आहेत, ज्यात 18,430 मुले आहेत.