
आष्टीमधील सांगवी पाटण येथील दोन तरुणांच्या गाडीला अपघात झाला असून त्यात त्यांचा जागीच मृत्यू झाला. हे तरुण नवरात्रीसाठी देवीची ज्योत आणण्यासाठी तुळजापूर येथे जात होते. या घटनेने गावावर शोककळा पसरली.
सांगवी पाटण येथून हे तरूण दुचाकीवरून तुळजापूरकडे निघाले होते. येरमाळा येथे अज्ञात वाहनाने त्यांच्या दुचाकीला धडक दिली. या धडकेत दोन्ही तरुणांचा जागीच मृत्यू झाला. महेश भास्करराव भोसले, अमोल सुरेशराव खिलारे अशी त्या तरुणांची नावे आहेत.
आष्टी तालुक्यातील सांगवी थेपाटण येथील तरूण दरवर्षीप्रमाणे नवरात्र उत्सवात देवीची स्थापना करतात व तुळजापूर येथून ज्योत आणतात. सोमवारी घटनास्थापना असल्याने गावातील काही तरूण टेम्पो, पिकअपमध्ये चालले होते. तर महेश भोसले, अमोल सुरेशराव खिलारे दोघेजण दुचाकीवर निघाले होते. शनिवारी सकाळी अकराच्या दरम्यान गावातून निघाले होते. जात असताना येरमाळा येथे रस्त्यावर अज्ञात वाहनाने दिलेल्या जोराच्या धडकेत दोघांचाही जागीच मृत्यू झाल्याची घटना घडली आहे.

































































