‘पब्जी’मुळे दोन तरुणांनी जीव गमावला; रेल्वेची धडक बसून ठार

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

सामना ऑनलाईन । हिंगोली

शहराजवळील खटकाळी बायपास भागातील रेल्वे पटरीवर भरधाव वेगातील रेल्वेच्या धडकेत दोन तरुणांचा काल जागीच मृत्यू झाला. रेल्वेने धडक दिली तेव्हा हे दोघेही तरुण रेल्वे पटरीवर बसून मोबाईलवर पब्जी गेम खेळत असल्याचे सांगितले जात आहे. ते पब्जीमध्ये मग्न असल्याने त्यांना रेल्वे येत असल्याचे समजले नाही. यामुळे त्यांना जीव गमवावा लागल्याची चर्चा हिंगोळी जिह्यात पसरली आहे. मात्र पब्जीमुळे त्यांचा मृत्यू झालेला नाही. हा अपघात आहे, असा दावा केला जात आहे.

पोलीस संबंधित तरुणांच्या मोबाईलची तपासणी करणार आहेत. त्यानंतरच खरे कारण समोर येईल. शहराजवळील खटकाळी बायपास भागातील रेल्वे पटरीवर हिंगोली येथून पूर्णाकडे जाणाऱ्या अजमेर-हैदराबाद सुपरफास्ट रेल्वेची दोन तरुणांना जोराची धडक बसली. या धडकेत दोन्ही तरुणांचा जागेवरच मृत्यू झाला. नागेश केशव गोरे (24, रा. हनुमानगर) व स्वप्नील अन्नपूर्णे (23, रा. सुराणानगर) अशी मृत तरुणांची नावे आहेत.