झाडावर अडकलेल्या मोराला पक्षीमित्रांकडून जीवदान

410

शिरूर तालुक्यातील कवठे येमाई गावठाण येथे 25 फूट उंच झाडावर फाद्यांमध्ये पाय अडकलेल्या मोराला दोन पक्षीमित्र तरुणांनी जीवदान दिले आहे. त्या दोघांनी झाडावर चढून फांद्यामध्ये पाय अडकलेल्या मोराल सुखरुप खाली उतरवले. या तरुणांचे ग्रामस्थांनी कौतुक केले आहे.

कवठे येमाई गावठाणात एक मोर आहे. हा मोर दररोज सकाळपासून गावात विविध भागात फिरून सायंकाळी मारुती मंदिरालगत असणाऱ्या झाडावर जातो. परिसरात त्याला खाद्य मिळत असल्याने तो नेहमी याच परिसरात असतो. रविवारी सकाळी 7 वाजण्याच्या सुमारास झाडावर फाद्यांमध्ये पाय अडकलेल्या मोराचा आवाज ऐकू आला. त्या मोराजवळ कावळे घिरट्या घालत होते. ते पाहून दोन पक्षीमित्र तरुणांनी झाडावर चढून या मोराची सुटाक केली आणि त्याला खाली उतरवले. जखमी मोराला येथील पशुवैद्यकीय दवाखान्यात नेण्यात आले. मोराच्या पायाला गंभीर दुखापत झाली असून त्यावर उपचार करण्यात आले आहेत. याबाबत शिरूर वन विभागास कळविण्यात आले आहे. तीन-चार दिवसात मोर व्यवस्थित चालू लागला तर त्याला पुन्हा गावात सोडण्यात येईल, अन्यथा पायाची जखम गंभीर असल्यास कात्रज पुणे येथे पुढील उपचारासाठी हलविण्यात येईल असे वन अधिकाऱ्यांनी सांगितले.

आपली प्रतिक्रिया द्या