उबेरच्या ताफ्यात 1 हजार इलेक्ट्रिक कार दाखल होणार

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

कॅब सेवा देणाऱ्या उबेर कंपनीच्या ताफ्यात लवकरच 1 हजारहून अधिक इलेक्ट्रिक कार दाखल होणार आहेत. यासाठी उबेरने लिथिअम अर्बन टेक्नॉलॉजी कंपनीशी गुरुवारी भागिदारीची घोषणा केली. सुरुवातीला मुंबई, पुण्यासह दिल्ली एनसीआर, बंगळूरू, हैदराबाद अशा पाच प्रमुख शहरांतील रस्त्यावर या इलेक्ट्रिक कार धावणार आहेत. तसेच पुढील वर्षभरात जवळपास 2000 इलेक्ट्रिक कार उपलब्ध करण्याचा निर्धार उबरने केला आहे.

उबेरने याआधी युलु, महिंद्रा आणि सन मोबिलिटी या कंपन्यांशी भागिदारी केली आहे. याच भागिदारीतून उबेरने याआधी प्रमुख शहरांतील रस्त्यांवर 100 हून अधिक इलेक्ट्रिक वाहने उतरवली आहेत. लिथिअमच्या चार्जिंग हबमध्ये एकाच वेळी मोठय़ा प्रमाणावर कार आणि बस चार्जिंग करण्याची क्षमता आहे. त्यामुळे आपण इलेक्ट्रिक कारसाठी प्रभावी सेवा देऊ शकणार आहोत, असा विश्वास उबेर इंडियाचे अध्यक्ष प्रभजीत सिंग यांनी व्यक्त केला.