नुपूर शर्मांचं समर्थन करणाऱ्या इसमाची गळा चिरून हत्या, दोन आरोपींना अटक

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

भाजपच्या माजी प्रवक्त्या नुपूर शर्मा यांच्या समर्थनार्थ पोस्ट करणाऱ्या मुलाच्या वडिलांची दिवसाढवळ्या गळा चिरून हत्या करण्यात आली आहे. ही भयंकर घटना उदयपूर येथे घडली आहे. या घटनेमुळे उदयपूर येथे एकच गहजब उडाला असून उदयपूरची इंटरनेट सेवा बंद करण्याचे आदेश देण्यात आले आहेत.

आज तक या वृत्त संकेतस्थळाने दिलेल्या वृत्तानुसार, या घटनेतील मयताचं नाव कन्हैयालाल असं आहे. कन्हैयालाल यांच्या 8 वर्षांच्या मुलाने 18 जून रोजी मोबाईलवरून नुपूर शर्मा यांच्या समर्थनार्थ सोशल मीडियावर पोस्ट केली होती. त्यानंतर काही जण नाराज झाले होते आणि कन्हैयालल यांना धमक्या मिळत होत्या. व्यवसायाने टेलर असलेल्या कन्हैयालाल यांच्या दुकानावर 28 जून रोजी दुपारी तीनच्या सुमाराला दोन तरुण आले.

त्यांनी कन्हैयालाल यांच्याशी बोलाया सुरुवात करून त्यांना कापडाचं माप घ्यायला सांगितलं. कपड्याचं माप घेताना या तरुणांनी धारदार शस्त्रांनी कन्हैयालाल यांच्यावर हल्ला केला आणि त्यांचा गळा चिरून त्यांची हत्या केली. या आरोपींची नावं रियाज मोहम्मद असं असून त्याने एक व्हिडीओ शेअर केला आहे. त्यात त्याने आरोपीचा गळा चिरून झाल्यावर हा व्हिडीओ शेअर करणार असल्याचं म्हटलं आहे. या प्रकरणातील दुसऱ्या आरोपीचं नाव गौस मोहम्मद असं आहे. हे दोघेही खांजीपीर येथील रहिवासी आहेत. या दोघांनाही पोलिसांनी अटक केली आहे.

या घटनेनंतर उदयपूर येथील धानमंडी परिसरात तणाव वाढला. स्थानिक नागरिक रस्त्यावर उतरून विरोध करू लागले. त्यामुळे परिसरात आणखी अनुचित घटना घडू नये यासाठी इंटरनेट 24 तासांसाठी बंद करण्यात आलं आहे. या घटनेनंतर राजस्थानचे मुख्यमंत्री अशोक गेहलोत यांनी या हत्येचा निषेध केला असून या प्रकरणातील आरोपींवर कठोर कारवाई करण्याचे आदेश दिले आहेत. तसंच, जनतेला शांतता कायम राखण्याचं आवाहनही गेहलोत यांनी केलं आहे.