माझे सहा डॉक्टर

>> उदय देशपांडे (मलखांब प्रशिक्षक)

मलखांब. माझा बहिश्वर प्राण. आताच्या बंद काळात या मलखांबाचीच साथ माझ्यासाठी मोलाची ठरली. मला वैद्यकीय मदतीखेरीज अनेक कल्पक गोष्टी मलखांबाने सुचविल्या.

खरं तर लॉकडाऊनचा काळ एवढा वाढेल असे वाटले नव्हते. तेव्हापासून म्हणजे 23 मार्चपासून व्यायामशाळा बंदच. अजूनही व्यायामशाळेतील सगळे उपक्रम बंद आहेत. ‘समर्थ’मध्ये सकाळी सहा वाजता महिलांचा, सकाळी सात वाजता पुरुषांचा योगवर्ग सुरू व्हायचा. मग पाच वाजेपर्यंत दिवसभरात महिलांचे पाच योगवर्ग व्हायचे. संध्याकाळी पाच वाजल्यापासून दहा वाजेपर्यंत एक हजार मुलं रोज व्यायामशाळेत नियमित येत होती. पण हे सगळे उपक्रम लॉकडाऊनकाळात थांबले. घराच्या बाहेर पडायचे नाही, मग काय करायचे असा प्रश्न निर्माण झाला. कारण याआधी माझा दिनक्रम पहाटे साडेचार ते रात्री साडेदहा असा होता. सकाळी साडेचारला मी व्यायामशाळेत जायचो आणि रात्री साडेदहाला घरी यायचो. त्यामुळे एकदम सगळंच बंद झालं. पण शरीर स्वस्थ बसू देत नव्हतं. मग यावेळेत काय काय करायचे याची मनात यादी तयार झाली. त्यानुसार आमच्या घरातल्या गच्चीमध्ये मी सकाळी सहा ते आठ या वेळात व्यायामाला सुरुवात केली. इतके दिवस कामाच्या धबडग्यामध्ये स्वतःकडे लक्ष देणं दुर्लभ झालं होतं. रोज सकाळी सहा ते आठ या वेळात नित्यनेमाने मी स्वतःच्या व्यायामाला सुरुवात केली. त्यात अजूनही खंड पडू दिलेला नाही. गच्चीमध्ये या वेळेत कोणीच येत नसल्याने कसला प्रश्नच आला नाही. आधी साधारण 45 मिनिटांचा वॉक व त्यानंतर सूर्यनमस्कारपासून, स्कीपिंगपासून, योगासने, प्राणायाम असे सगळे व्यायाम मी अजूनही करतो.

पहिले एक दोन महिने मी घरातच दिवसभर असायचो. या वेळेची संधी साधली. जशा गाण्याच्या परीक्षा असतात प्रथमा, द्वितिया ते अगदी संगीत विशारदपर्यंत, जसं ज्युडो, कराटेमध्ये ‘बेल्ट एक्झॅम्स’ असतात, तसं मलखांबामध्ये ‘गुणवत्ता चाचणी परीक्षा अभ्यासक्रम ‘लॉकडाऊन’मध्ये तयार करायला सुरुवात केली. मग त्यात अगदी पहिल्यांदा ज्यांना मलखांब शिकायची इच्छा आहे ते ‘मलखांबेच्छु’, त्यानंतर ‘मलखांबप्रेमी’, मग ‘मलखांब प्रवेश’, त्यानंतर ‘मलखांब कुशल’ मग ‘मलखांब प्रवीण’ आणि शेवटी ‘मलखांब विशारद’ असा एक सहा स्तरांचा अभ्यासक्रम तयार केला आणि त्याच्यामध्ये बारकाईने सगळे एलिमेण्ट्स लिहून काढले. त्यात कसे शिकवायचे, मदत कशी करायची याचा तपशिल, मग त्यांची परीक्षा कशी घ्यायची, त्यांना गुण कसे द्यायचे आणि त्यांना प्रशस्तिपत्रक कसे द्यायचे, अशी संपूर्ण माहिती असणार आहे. दररोज मी सहा डॉक्टरांना भेटतो. तर हे डॉक्टर कुठले? तर पहिली गोष्ट म्हणजे स्वच्छ सूर्यप्रकाश, दुसरा डॉक्टर योग्य तो पुरेसा नियमित व्यायाम, तिसरा डॉक्टर सुदृढ शरीर ठेवण्यासाठी सकस आहार , चौथा डॉक्टर पुरेशी विश्रांती (किमान आठ तासांची झोप), पाचवा डॉक्टर जवळच्या स्नेह्यांशी मनमोकळ्या गप्पा मारणं. आणि सहावा डॉक्टर म्हणजे आत्मविश्वास. या सहा डॉक्टरांना दररोज भेटून आरोग्य चांगलं ठेवतो. सकाळी नऊला व्यायामशाळेत येऊन रात्री नऊला घरी जातो. मध्ये एक तास घरी जेवायला जातो.

व्यायामशाळेत जरी सात-आठ लोक कामाला आले तरी सोशल डिस्टंस पाळायचे, मास्क लावायचा, सॅनिटायझर वापरायचं, यापद्धतीने आम्ही काम करताना काळजी घेतो. मलखांब हा सगळ्या रोगांवरती उत्तम उपाय आहे आणि मलखांबापासून शरीरातील अंतर्गत संस्थांना जो व्यायाम होतो त्याच्यामुळे ‘इम्युनिटी’ वाढते.

 

आपली प्रतिक्रिया द्या