राज्यातील `सीईटी’ परीक्षांबाबत लवकरच निर्णय, उच्च व तंत्रशिक्षण मंत्री उदय सामंत यांची माहिती

980

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर सुरक्षित अंतराच्या नियमासह जिल्हा, तालुका आणि विभागीय स्तरावर सीईटी परीक्षा केंद्र, आसन व्यवस्था आदींबाबत सर्व्हे सुरू आहे. सर्व बाबींची तपासणी करून सीईटी परीक्षा होऊ शकते का, याबाबतचा निर्णय येत्या पाच ते सहा दिवसांत घेण्यात येईल, अशी माहिती उच्च व तंत्रशिक्षण मंत्री उदय सामंत यांनी दिली.

अध्यापकांसाठी सुरू करण्यात येणाऱ्या प्रशिक्षण संस्थेच्या उभारणीचे कामकाज पाहणीसाठी उच्च शिक्षण मंत्री सामंत गुरुवारी पुण्यात आले होते. या वेळी त्यांनी विविध विषयांवर माहिती दिली. सामंत म्हणाले, विविध अभ्यासक्रमांच्या प्रवेशासाठी राज्यातील पाच ते साडेपाच लाख विद्यार्थी सीईटी परीक्षा देतात. यंदा कोरोनामुळे परीक्षेचे आयोजन करण्यात मोठी अडचण आहे. लाखो विद्यार्थ्यांसाठी सुरक्षित अंतराचे नियम पळून तालुका, जिल्हा आणि विभागीय स्तरावर सीईटी परीक्षांची परीक्षा केंद्रे करू शकतो का, याबाबतचा सर्व्हे सीईटी सेलकडून सुरू आहे. सध्या राज्यातील अनेक शाळा, वसतिगृह क्वारंटाईन सेंटरसाठी वापरण्यात आली आहेत. त्यामुळे तेथे परीक्षा कशा घ्यायच्या, याबाबत सव्र्हे सुरू आहे. सीईटी यंत्रणा स्वायत्त आहे. त्यांचे यासंबंधीचे सर्वेक्षण सुरू आहे. आणीबाणीची परिस्थिती निर्माण झाली, तर बारावीच्या गुणांवर प्रवेश द्यायचा की दुसरे काही करता येईल, याबाबतचा विचार सुरू आहे. मात्र विद्यार्थी हिताचा विचार करूनच निर्णय घेण्यात येईल. सध्या ऑनलाईन शिक्षणासाठी विद्याथ्र्यांना अधिकचा अर्थिक भुर्दंड बसणार नाही, अशी भूमिका शासनाची असून यासाठी लवकरच निर्णय घेण्यात येणार आहे.

अंतिम वर्षाच्या परीक्षांबाबत राज्य सरकारने मांडलेली भूमिकाच सर्वोच्च न्यायालयात सादर केली आहे. राज्य सरकार विद्यार्थी हिताचाच विचार करत आहे. यावर उद्या (दि. 14) न्यायालयात तारीख असल्याने यावर मी विभागाचा प्रमुख म्हणून आता बोलणे योग्य नाही. न्यायालयाच्या निर्णयानंतर भूमिका घेतली जाईल.

आपली प्रतिक्रिया द्या