विजबिले हफ्त्याने न घेणाऱ्या अधिकाऱ्यांवर कारवाई करू; उदय सामंत यांचा इशारा

महावितरणचे विजबिल हफ्त्यांमध्ये भरण्याची सूचना राज्य सरकारने केली आहे. 1 ते 6 हफ्त्यांमध्ये विजबिल भरू शकत असतानाही हफ्त्याने विजबिल भरायला गेलेल्या ग्राहकांकडून विजबिल भरून घेत नसल्याचे दिसून येत आहे. हफ्त्याने विजबिल भरण्यास नकार देणाऱ्या अधिकाऱ्यांवर कारवाई करण्यात येईल, असा इशारा उच्च व तंत्रशिक्षणमंत्री उदय सामंत यांनी दिला आहे. ते शनिवारी रत्नागिरीतील पत्रकार परिषदेत बोलत होते.

जिल्हाधिकारी कार्यालयात शनिवारी महावितरणसंदर्भांत एक बैठक झाली. त्या बैठकीत ग्राहकांची विजबिले हफ्त्याने स्विकारण्याची सूचना उदय सामंत यांनी अधिकाऱ्यांना केली. कोरोना परिस्थिती आणि लसीकरणाचा आढावाही त्यांनी घेतला. सामंत म्हणाले की,22 हजार 391 जणांनी लसीकरणासाठी रजिस्ट्रेशन केले असून 70 टक्के जणांनी लस घेतली आहे. पोलीस खात्यातील 80 टक्के जणांनी लस घेतली आहे. महसूल विभागातील 75 टक्के आणि आरोग्य विभागातील 18 टक्के जणांनी लस घेतली असून आरोग्य विभागाचे प्रमाण कमी असून त्याबाबत मी जिल्हापरिषद अध्यक्ष रोहन बने यांच्याशी चर्चा केली आहे. 45 आणि 60 वर्षावरील व्यक्तींच्या लसीकरणाबाबतही नियोजन करण्यात येणार असल्याचे सामंत यांनी सांगितले.

1 मार्चपासून 10 हजार कोरोना चाचण्या
1 मार्चपासून जिल्ह्यात 10 हजार कोरोना चाचण्या घेण्यात येणार असून कोरोना प्रसारावर नियंत्रण आणण्याचा प्रयत्न करणार असल्याचे सामंत यांनी सांगितले. गणपती, दिवाळीप्रमाणे शिमगोत्सव साधेपणाने साजरा करून नागरिकांनी सहकार्य करावे असे आवाहन सामंत यांनी केले.

उर्दू भवन आणि ऑफ़िसर क्लब उभारणार
हज हाऊसच्या इमारतीप्रमाणे उर्दू भवन रत्नागिरीत उभारणार असून या ठिकाणी उर्दू भाषेविषयी संशोधन होणार आहे. उर्दू भवनसाठी एक एकर जागा देण्याचे निश्चित झाल्याचे सामंत यांनी सांगितले. रत्नागिरीत ऑफिसर क्लब उभारण्यात येणार आहे. त्या ठिकाणी शासकीय अधिकारी, कार्पोरेट आणि खासगी व्यक्तींना सभासदत्व दिले जाणार आहे. याबाबत नियोजन सुरू असल्याचे सामंत यांनी स्पष्ट केले.

आपली प्रतिक्रिया द्या