
मालवणी नटसम्राट बाबूजी अर्थात मच्छिंद्र कांबळी यांचे सिंधुदुर्ग जिल्ह्यातील कुडाळ येथे उभारणी होत असलेले स्मारक येत्या वर्षभरात पूर्ण होईल असा विश्वास पालकमंत्री उदय सामंत यांनी व्यक्त केला. स्वर्गीय मच्छिंद्र कांबळी यांच्या रेवंडी गावी बीएसएनएल टॉवर लोकार्पण कार्यक्रमाच्या निमित्ताने पालकमंत्री बोलत होते.
मालवण तालुक्यातील समुद्र-खाडी किनारी वसलेल्या निसर्गसंपन्न रेवंडी गावात मोबाईल सुविधेचा प्रश्नही निकाली निघाला आहे. रेवंडी भद्रकाली मंदिर परिसरात शासनाच्या माध्यमातून उभारण्यात आलेल्या बीएसएनएल टॉवरचे लोकार्पण पालकमंत्री उदय सामंत, खासदार विनायक राऊत, आमदार वैभव नाईक यांच्या उपस्थितीत रविवारी करण्यात आले.
यावेळी यावेळी जिल्हा परिषद गटनेते नागेंद्र परब, माजी जिल्हा परिषद अध्यक्ष संजय पडते, संग्राम प्रभुगावकर, उपजिल्हाप्रमुख बबन शिंदे, तालुकाप्रमुख हरी खोबरेकर, उपतालुकाप्रमुख गणेश कुडाळकर, बाबी जोगी, अमोल वस्त यासह बीएसएनएल अधिकारी उपस्थित होते.
भद्रकाली देवस्थान कमिटी रेवंडी यांनी नाममात्र भाडे करारावर टॉवरसाठी जागा उपलब्ध करून दिल्याची माहिती कमिटी अध्यक्ष युवराज कांबळी यांनी दिली. सरपंच प्रिया कांबळी, उपसरपंच शामसुंदर तळाशीलकर, देवस्थान कमिटी सचिव विजय सहदेव कांबळी, खजिनदार जयराम मनोहर कांबळी कमिटी सदस्य, ग्रामपंचायत सदस्य व ग्रामस्थ यासह शिवसेना पदाधिकारी यावेळी उपस्थित होते. एकूणच रेवंडी गावात मोबाईल रेंज उपलब्ध झाल्याने ग्रामस्थांनी समाधान व्यक्त केले आहे. मात्र टॉवरवर टुजी सेवाही सुरू व्हावी अशी मागणी केली. युवराज कांबळी यांनी गावाच्या विकासाच्या दृष्टीने विविध मागण्या करण्यात आल्या. रेवंडी गावच्या विकासासाठी कटिबद्ध असल्याचे पालकमंत्री, खासदार, आमदार यांनी स्पष्ट केले.






























































