
‘शिवसेना आणि मुख्यमंत्री म्हणून उद्धव ठाकरे यांचे कार्य तळागाळापर्यंत पोहोचविण्याची जबाबदारी शिवसैनिकांची आहे. ‘शिवसंपर्क अभियाना’च्या माध्यमातून प्रभागनिहाय शाखांची स्थापना करावी. त्यातून सर्वसामान्य नागरिकांचे प्रश्न सोडवावेत. येत्या 12 दिवसांत महाराष्ट्रात आदर्शवत शिवसंपर्क अभियान कोल्हापुरातील शिवसैनिकांनी राबवावे,’ असे आवाहन उच्च व तंत्रशिक्षणमंत्री उदय सामंत यांनी केले.
कोल्हापूर शासकीय विश्रामगृहावर शिवसंपर्क मेळावा झाला. यावेळी उपस्थित शिवसेना पदाधिकारी व शिवसैनिकांना राज्य नियोजन मंडळाचे कार्यकारी अध्यक्ष राजेश क्षीरसागर यांनी शिवसंपर्क प्रतिज्ञा देत, शिवसंपर्क अभियान राबविण्याचे आवाहन केले. यावेळी जिल्हा संपर्कप्रमुख अरुण दुधवडकर, जिल्हाप्रमुख विजय देवणे, आमदार प्रकाश आबिटकर, माजी आमदार सत्यजित पाटील-सरूडकर, महिला आघाडीच्या शहरप्रमुख मंगल साळोखे, माजी आमदार सुजित मिणचेकर, शहरप्रमुख रविकिरण इंगवले, अरुण सावंत, युवासेनेचे हर्षल सुर्वे, जयवंत हारुगले आदी उपस्थित होते.
मंत्री उदय सामंत म्हणाले, ‘कोणी अंगावर आल्यास शिंगावर घेण्याची शिकवण शिवसेनाप्रमुखांनी दिली आहे. विरोधकांच्या टीकेला मुख्यमंत्री उद्धव ठाकरे कृतीतून उत्तर देत आहेत. महाराष्ट्र हे परंपरा जपणारे राज्य आहे. कुटुंबप्रमुखाच्या परंपरेप्रमाणे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे जनतेची काळजी घेत आहेत. त्यांच्या कार्याची दखल जगभराने घेतली, तशीच दखल पंतप्रधानांनीही घेतली आहे. शिवसंपर्क अभियानाच्या या 12 दिवसांच्या काळात शिवसेनेचे भगवे वातावरण निर्माण करा,’ असे आवाहन त्यांनी केले.
संपर्कप्रमुख दुधवडकर म्हणाले, ‘मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या आदेशानुसार शहरातील 81 प्रभागांत शिवसंपर्क अभियान राबवा. शाखाप्रमुख, गटप्रमुखांची नियुक्ती करून, लोकांच्या समस्या जाणून वरिष्ठांपर्यंत पोहोचवा. शिवसेनेत काम केलेल्या ज्येष्ठांच्या जाणकार फळीची मदत लोकसंपर्कात घ्या’, अशा सूचनाही त्यांनी दिल्या.




























































