उच्च व तंत्रशिक्षणमंत्री उदय सामंत यांच्या विकासकामांना सुरुवात

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

उच्च व तंत्रशिक्षणमंत्री पद स्वीकारल्यानंतर उदय सामंत यांनी त्यांच्या विधानसभा मतदारसंघात आगमन करताना विकास कामाचे भूमीपूजन करत आपल्या कॅबिनेट मंत्रीपदाच्या कार्याला प्रारंभ केला. सोमेश्वर-चिंचखरी येथील पुलाच्या कामाचे भूमिपूजन उच्च तंत्रशिक्षणमंत्री उदय सामंत यांच्याहस्ते करण्यात आले. यावेळी चिंचखरी येथे ढोल-ताशांच्या गजरात, फटाक्यांच्या आतषबाजीत भगवा जल्लोष करण्यात आला.

नाबार्ड अंतर्गत अंदाजे 1 कोटी 30 लाख रुपये खर्च करून बांधण्यात येणाऱ्या रत्नागिरी तालुक्यातील पोमेंडी बु. सोमेश्वर तोणदे चिंचखरी येथील चिंचखरी दत्तमंदीर जवळील पुलाच्या भूमिपुजन प्रसंगी बोलताना ते उदय सामंत म्हणाले की, आता आपलं सरकार आहे.पक्षप्रमुख आणि मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांनी माझ्यावर उच्च तंत्रशिक्षण मंत्रीपदाची जबाबदारी टाकली आहे.आता आपण सर्वजण शासन आहोत.आपण जबाबदारीने काम केली पाहिजेत.जास्तीत जास्त विकासकामे आपण आपल्या गावात केली पाहिजेत अशी अपेक्षा सामंत यांनी व्यक्त करताना उपसभापती दत्तात्रय मयेकर यांच्या कामाचे कौतुक करताना योगायोग आहे मयेकर उपसभापती झाले आणि गावच्या पुलाचे काम सुरु झाले आणि माझे भाग्य की मंत्री म्हणून मी त्यापुलाचे भूमिपूजन केले.

शिवसेनेचे सहसंपर्कप्रमुख राजेंद्र महाडिक,जिल्हाप्रमुख विलास चाळके,जिल्हा परिषद अध्यक्ष रोहन बने,उपजिल्हाप्रमुख महेश म्हाप रत्नागिरीचे तालुकाप्रमुख, नगराध्यक्ष प्रदीप साळवी, क्षेत्रप्रमुख प्रमोद शेरे, सभापती प्राजक्ता पाटील,उपसभापती दत्तात्रय मयेकर जि.प.सदस्या देवयानी झापडेकर,परशुराम कदम,समाजकल्याण सभापती प्रकाश रसाळ, सार्वजनिक बांधकाम विभागाच्या कार्यकारी अभियंता प्रज्ञा वाळके, सहा. अभियंता वीणा पुजारी व अन्य मान्यवर व चिंचखरी येथील ग्रामस्थ मोठया संख्येने उपस्थित होते. पुढे उदय सामंत म्हणाले आपल्याला मिळालेल्या उच्च व तंत्र शिक्षण पदाचा वापर राज्याबरोबर जिल्हयातील विकास कामे करण्यासाठी करणार आहे. पुण्यासारखे रत्नागिरी जिल्हयात शैक्षणिक हब निर्माण होईल असा विश्वास त्यांनी यावेळी व्यक्त केला. जिल्हयातील प्रलंबित विकास कामे पूर्णत्वास नेण्यास आपण प्रयत्न करणार आहे. या विकासकामांना ताकद देण्याची जबाबदारी ही जनतेची असल्याचे त्यांनी सांगितले.