
राज्याचा अर्थसंकल्प हा कोकणापासून विदर्भापर्यंत सर्वांना समान न्याय देणारा आहे. चांदा ते बांदा ही संकल्पना या अर्थसंकल्पातही राबवली. मी ज्या खात्याचा मंत्री आहे त्या उच्च व तंत्रशिक्षण विभागाला 1619 कोटी रुपयांचा निधी देण्यात आला आहे, अशी माहिती उच्च व तंत्रशिक्षण मंत्री उदय सामंत यांनी शनिवारी पत्रकार परिषदेत दिली.
उदय सामंत म्हणाले की, राज्याच्या अर्थसंकल्पामध्ये रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यांना भरभरून निधी मिळाला आहे. रत्नागिरी शहरासाठी 10 कोटी निधी मिळाला आहे. त्यामध्ये रत्नागिरी शहरातील मांडवी येथील गटाराच्या कामाला दीड कोटी रुपयांचा निधी मिळाला आहे. छत्रपती शिवाजी महाराज स्टेडियमच्या मैदानाच्या देखभाल आणि दुरुस्तीसाठी 2 कोटी रुपयांचा निधी मिळाला आहे. आपण उभारत असलेल्या शिवसृष्टीसाठी 2 कोटी रुपयांचा निधी, सिंधुदुर्ग जिल्ह्यातील विजयदुर्ग आणि सिंधुदुर्ग किल्ल्याच्या देखभालीसाठी 2 कोटी रुपयांचा निधी मिळाला आहे, असे त्यांनी सांगितले.
रत्नागिरी जिल्ह्याला ऐतिहासिक वारसा आहे. भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जन्मगावी आंबडवे येथील शाळेसाठी 1 कोटी रुपयांचा निधी, सानेगुरुजी यांच्या पालघरसाठी 1 कोटी रुपयांचा निधी, बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठासाठी 50 कोटी रुपयांचा निधी देण्यात आला आहे. मी ज्या खात्याचा मंत्री आहे त्या उच्च व तंत्रशिक्षण विभागासाठी 1619 कोटी रुपयांचा निधी अर्थसंकल्पात जाहीर करण्यात आला आहे. विद्यापीठातील जी अध्यसन केंद्र आहेत त्यांना 3 कोटी रुपये देण्यात आले आहेत. त्या 3 कोटी रुपयांतून 17 लाख रुपयांचे व्याज उपलब्ध होणार आहेत. या 17 लाख रुपयांतून ही अध्यसन केंद्र चालवण्यात येतील. शिवाजी विद्यापीठासाठी 10 कोटी रुपयांचा निधी देण्यात आला आहे, असे उदय सामंत यांनी सांगितले.





























































