भाजपने राज्यपालांना सांगितलं नाही की असं बोला! कोश्यारीवर कारवाई होणं गरजेची!!

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

महाराष्ट्र, गुजरात आणि मध्य प्रदेश अशा तीन राज्यांच्या मिळून 26 खासदारांना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शुक्रवारी भेटीसाठी निमंत्रित केलं होतं. या खासदारांमध्ये उदयनराजे भोसले यांचाही समावेश होता. या भेटीनंतर पत्रकारांनी खासदार भोसले यांना, छत्रपती शिवाजी महाराजांबद्दल भाजप नेत्यांकडून होत असलेल्या अवमानकारक विधानांचा विषय पंतप्रधानांसमोर निघाला का? असा प्रश्न विचारला. यावर खासदार भोसले म्हणाले की, याबाबतचं पत्र आम्ही पंतप्रधान कार्यालयाला दिले असून ते पंतप्रधानांपर्यंत पोहोचेल.

दिल्लीमध्ये पत्रकारांशी बोलताना उदयनराजे म्हणाले की यापूर्वी राष्ट्रपतींनाही याबाबत पत्र लिहिण्यात आले होते, जे नियमानुसार राष्ट्रपती कार्यालयाने गृहमंत्रायलयाकडे पाठवलं होतं. हा जसा एक प्रक्रियेचा भाग होता, तशाच पद्धतीने प्रक्रियेचा भाग म्हणून आम्ही पंतप्रधान कार्यालयाकडे आमचे पत्र सुपूर्द केले आहे असे खासदार भोसले यांनी सांगितले.
‘छत्रपती शिवाजी महाराज हे फक्त महाराष्ट्राची नाही तर संपूर्ण देशाची अस्मिता आहे. त्यांच्याबद्दल बोलताना मोजूनमापून बोललं पाहिजे. राज्यपालांच्या वक्तव्यामुळे असंतोष दिसतो आहे. यावर लवकरात लवकर तोडगा निघणे गरजेचं आहे.’ अशी प्रतिक्रिया त्यांनी पत्रकारांशी बोलताना दिली.

पत्रकारांशी बोलताना उदयनराजे म्हणाले की, ‘पंतप्रधानांना खासदारांना वेळ देता आला नाही. त्यांच्या कार्यालयाशी संपर्क साधून पत्र त्यांच्या कार्यालयाला पोच झालं आहे. राज्यभरातील शिवभक्त हे नाराज आहेत. मी व्यक्तिश: जे करायचं आहे ते करतोय. वारंवार बोलणाऱ्यांकडे दुर्लक्ष केलं तर फरक पडत नाही, असं कोणालाही वाटता कामा नये. महापुरुषांबद्दल असं घडत राहीलं तर ही चांगली लक्षणे नाही.पंतप्रधानांना विविध यंत्रणांमार्फत राज्यांमध्ये काय चाललं आहे कळत असतं. या प्रकरणाची तीव्रता पंतप्रधानांना माहिती आहे.’ राज्यपालांनी माफी न मागितल्याबद्दल खंत वाटते असं म्हणतानाच उदयनराजे म्हणाले की, ‘भाजपने त्यांना सांगितलं नाही की असं बोला. एखाद्याने चूक केली तर त्यासाठी पक्ष जबाबदार होत नाही. शिस्त मोडल्याबद्दल कारवाई झाली पाहिजे ते राज्यपालांनाही लागू होतं.’