
ज्या लोकांची लायकी नाही आणि ज्यांना अक्कल नाही ते छत्रपती शिवाजी महाराजांविरोधात अशी वक्तव्ये करतात. खरे तर यांची जीभ हासडली पाहिजे. या लोकांना माफी मागायला लावा. त्या प्रवक्त्याची पदावरूनच नव्हे, तर भाजपमधून हकालपट्टी करून टाका आणि या राज्यपालांना खाली ओढून लांब फेकून द्या, अशी विनंती आपण पंतप्रधानांना करणार आहोत आणि तुम्हाला हे जर करता येत नसेल तर पुढील वाटचाल काय असेल ते आपण ठरवणार असल्याचा इशारा खासदार उदयनराजे भोसले यांनी दिला आहे.
छत्रपती शिवाजी महाराजांचे नाव घेतल्याशिवाय राजकीय पक्षांचे काम चालत नाही; पण आज महाराष्ट्रात काय चालले आहे ? राज्यपाल हे सन्मानाचे पद आहे. निदान या पदावरील व्यक्तीला अक्कल पाहिजे, कळले पाहिजे. तो कुठला तो थर्ड क्लास, भिकारडा सुधांशू त्रिवेदी… अशा लोकांनी छत्रपती शिवरायांबद्दल काहीही बोलायचे? ही एक प्रकारची विकृती आहे. विकृतीला कोणता पक्ष नसतो, कोणती जात नसते. गँगरीन झाले तर शरीराचा तो भाग कापून टाकला जातो. त्याप्रमाणे अशा लोकांना पक्षांनी कापून फेकून दिले पाहिजे, असे ते म्हणाले.
राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी यापूर्वीही छत्रपती शिवाजी महाराजांबद्दल वादग्रस्त वक्तव्ये केली आहेत. त्यांना शिवरायांच्या इतिहासाचे विस्मरण होत असेल किंवा त्यांची बुद्धी भ्रष्ट झाली असेल. राज्यपाल मोठे पद असून, त्यांना ते झेपत नसेल तर त्यांना बाजूला केले पाहिजे, अशी टीका त्यांनी केली. वादग्रस्त वक्तव्य करणाऱयांनी शिवरायांचा इतिहास वाचला तर बरे होईल. शिवरायांबाबत विधान करणाऱयांची बुद्धी भ्रष्ट झाली असावी किंवा त्यांना विस्मरण होत असावे, असे उदयनराजे म्हणाले.
राज्यपालांनी महाराष्ट्राची माफी मागावी!
z महाराष्ट्राचे राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी संभाजीनगरमध्ये छत्रपती शिवाजी महाराजांबद्दल केलेले विधान अत्यंत निषेधार्ह आहे. त्यांनी आपले विधान मागे घेऊन महाराष्ट्राची माफी मागावी, अन्यथा तीक्र आंदोलन करण्याचा इशारा रिपब्लिकन पक्षाचे प्रदेश उपाध्यक्ष दादा ओव्हाळ यांनी दिला आहे. छत्रपती शिवाजी महाराजांनी रयतेचे राज्य चालवले. या महामानवांच्या विचारांना जुना विचार व जुना आदर्श म्हणणे हे अत्यंत चुकीचे आहे. कोश्यारी यांनी सातत्याने महाराष्ट्रातील महापुरुषांचा अवमानच करण्याचा प्रयत्न केला आहे. राज्यपाल या पदाचा गैरवापर करून महापुरुषांचा ते अवमान करतात, हे अत्यंत निंदनीय असल्याचेही ओव्हाळ म्हणाले.






























































