
>>संजय राऊत, महेश मांजरेकर
संजय राऊत – हे सगळं मोदी, शहा राज्यकर्ते झाल्यामुळे होतंय का?
राज ठाकरे – त्याच्यानंतरच झालं ना… मी परवाच कोणाशी तरी बोलत होतो. व्यवसाय करताना तर चोऱयामाऱया सगळेच करत असतील, पण अदानी आणि अंबानी यांच्यातील मोठा फरक बघायचा असेल तर तो हा आहे की, मोदी मोठे व्हायच्या आधीपासून अंबानी मोठे होते, पण अदानी हा मोदी मोठे झाल्यानंतरच मोठा झाला आहे. अदानीचा विस्तार हे मोदी मोठे झाल्यानंतरचाच आहे. मोदी ज्या वेळी गुजरातचे मुख्यमंत्री झाले त्याच वेळी अदानीला मुंद्रा पोर्ट मिळाला आणि मोदी पंतप्रधान झाल्यानंतर तर अदानीला अनेक गोष्टी मिळाल्या आहेत. मला नेहमी एक प्रश्न पडतो. भारतीय जनता पक्षाला मला हा प्रश्न विचारायचाय की, समजा तिथे भारतीय जनता पक्षाऐवजी काँग्रेसचे सरकार किंवा दुसऱ्या कुठल्या तरी पक्षाचं सरकार असतं आणि एखाद्या केंद्रात बसलेल्या सरकारने काँग्रेस किंवा इतर कोणत्याही पक्षाने जर एकाच उद्योगपतीवर मेहरबानी केली असती, तर भारतीय जनता पक्ष कशा प्रकारे रिअॅक्ट झाला असता?
संजय राऊत – रस्त्यावर येऊन थयथय नाचले असते.
राज ठाकरे – बरोबर ना? मग आज हे होताना भारतीय जनता पक्षाचे लोक हवालदिल का आहेत? गप्प का आहेत?
संजय राऊत – तुम्हाला काय वाटतं? का हवालदिल आहेत?
राज ठाकरे – याचं कारण त्यांच्या हातात काहीच नाही. ही सगळी मोदींनी बसवलेली माणसं आहेत. कळलं का? याच्यातले जे स्वकर्तृत्वाने बसलेले होते त्यांना नष्ट केले गेले. उदाहरणार्थ शिवराजसिंग चौहान असतील, गडकरी असतील. आणखी एक-दोन जण आहेत. ही माणसं यांना आवडत नाहीत. पूर्वी काँग्रेसच्या काळात जे व्हायचं तेच आता सुरू आहे. फक्त यांचा उद्देश सफल झाला पाहिजे. बस्स! पण एक सांगतो काँग्रेसच्या काळात जे पंतप्रधान होते त्यांना कुठल्या राज्याचं लेबल नव्हतं. हे पहिल्यांदा असे राज्यकर्ते बसले आहेत ज्यांच्यावर कुठल्यातरी राज्याचं लेबल आहे.
संजय राऊत – गुजरातचे प्रधानमंत्री आहेत ते… गुजरातचे गृहमंत्री आहेत ते…
राज ठाकरे – ज्याप्रकारे त्यांचं मुंबईवर आणि एमएमआर रिजनवर लक्ष आहे. ते पाहता हा धोका सर्वाधिक आहे. 50-60 वर्षांत आजपर्यंत कधी असं घडलं नव्हतं ते आता घडतंय.
संजय राऊत – उद्धवसाहेब, हा धोका तर आहेच आणि त्या धोक्याशी आपण लढतो आहोत..
उद्धव ठाकरे – एक लक्षात घ्या की, आम्ही सातत्याने सांगतोय की मुंबईचा महापौर हा मराठीच होईल. भाजप काय म्हणतेय की मुंबईचा महापौर हा हिंदू होईल. म्हणजे याचा अर्थ भाजप मराठी माणसाला हिंदू समजत नाही का? मग देवेंद्र फडणवीस हिंदू आहेत की नाहीत? संयुक्त महाराष्ट्राच्या लढय़ात मराठी माणसांवर गोळ्या घालणारा माणूस मोरारजी देसाई हा हिंदू होता की नव्हता? मराठी माणूस जेव्हा रस्त्यावर उतरला होता तेव्हा मोरारजींनी पोलिसांना सांगितलं की, तुम्हाला माणसे मारण्यासाठी गोळ्या दिल्या आहेत, त्या वाया घालवू नका. त्यातून 107 हुतात्मे झाले जे रेकॉर्डवर आहेत.
संजय राऊत – गोळ्यांचा हिशेब मागितला..
उद्धव ठाकरे – होय… गोळ्यांचा हिशेब मागितला होता. मग मोरारजी देसाई हे गुजरातमध्ये जन्मलेले हिंदू होते की नव्हते आणि मराठी माणूस हा हिंदू आहे की नाही हे देवेंद्र फडणवीसांनी सांगावं… ज्या वेळी मोदींना अटलबिहारी वाजपेयी केराच्या टोपलीत टाकत होते तेव्हा त्यांना वाचवणारे हिंदुहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे हा अस्सल मराठी माणूस होता. त्यामुळे भाजपनं हिंदू व मराठीमध्ये जी काही गफलत करण्याचा प्रयत्न चालवला आहे तो आधी बंद करावा आणि देवेंद्र फडणवीसांनी सांगावं की मराठी आणि हिंदू म्हणजे काय? कारण मराठी हा हिंदूच आहे.
राज ठाकरे – आणखी एक गोष्ट सांगतो तुम्हाला, मला एक व्यक्ती भेटली आणि त्यांनी मला असे सांगितलं की, जरा या या गोष्टींकडे तुम्ही लक्ष द्या. मी मघाशी जे म्हटलं ना की 2024 ते 2025 हा जो एक वर्षाचा काळ आहे त्या एक वर्षाच्या काळाचा आलेख मी आता पुढे मांडणार आहे. जिथे मला सर्वाधिक धोका दिसायला लागला. हा धोका तुम्हाला 2022 ते 2023 मध्ये दिसत नाही, 2023 ते 2024 मध्ये दिसत नाही. पण 2024 ते 2025 मध्ये जे काही घडलं ते मी तुमच्यासमोर लवकरच मांडणार आहे… लोकांसमोर मांडणार आहे.
संजय राऊत – राजसाहेब हा विषय अत्यंत गंभीर आहे. कधीकाळी महाराष्ट्र हे देशाचे ग्रोथ इंजिन होते. मोदी, शहा आल्यानंतर महाराष्ट्राची पीछेहाट झाली आणि त्यांनी गुजरातला ग्रोथ इंजिन बनवण्याचा प्रयत्न केला.
उद्धव ठाकरे – पीछेहाट नाही झाली. महाराष्ट्राला त्यांनी पाठी ढकलले.
संजय राऊत – हा महाराष्ट्रावर सूड घेण्याचा प्रयत्न आहे का?
उद्धव ठाकरे – दुसरं काय म्हणू शकतो?
राज ठाकरे – मी म्हटलं ना ही जुनी जखम आहे… तेव्हा मुंबई हाताला लागली नाही म्हणून हे सगळे चालले आहे. मी नेहमी सांगतो की, भुगोलाशिवाय इतिहास नाही. तुम्ही जर मुंबईपासूनचा भुगोल नीट काढलात तर तुमच्या लक्षात येईल की, बुलेट ट्रेन कुठून कुठे चालली आहे? या बुलेट ट्रेनला मी त्या वेळी विरोध केला होता. माझा आजही विरोधच आहे.
उद्धव ठाकरे – सगळ्यांनीच विरोध केला.
राज ठाकरे – ही बुलेट ट्रेन जिथून अहमदाबादला जाणार आहे… तो ठाणे, पालघर हा जो सगळा भाग आहे, हा सगळा तेवढा पट्टा बरोब्बर गुजरातला लागून आहे.
संजय राऊत – गुजरातची बॉर्डर आहे ती…
राज ठाकरे – करेक्ट. तुम्ही एमएमआर रिजन नीट बघितलंत तर तुमच्या लक्षात येईल… मी जेव्हा वर्षभरात सगळं नीट पाहायला लागलो तेव्हा मला सर्वाधिक धोका दिसायला लागला.
उद्धव ठाकरे – महाराष्ट्रातल्या, पालघरमधल्या दोन खेडय़ांवरही ते आता आपला हक्क सांगायला लागले आहेत.
संजय राऊत – सुरतमधून ब्रिटिशांच्या ईस्ट इंडिया कंपनीला पैसे जात होते म्हणून छत्रपती शिवाजी महाराजांनी त्याकाळात सुरत लुटली. त्याचा राग आजही त्यांच्या मनात आहे. त्याचा बदला म्हणून ते मुंबई लुटताहेत का? मला तर असे कळले की, सध्याच्या राज्यातल्या राज्यकर्त्यांपैकी जे राज्यातले डेप्युटी आहेत… ‘उप’… ते दिल्लीत जातात तेव्हा मोठय़ा थैल्या घेऊन जातात. जोपर्यंत दिल्लीवाल्यांना त्या थैल्या मिळतील तोपर्यंत ते ‘उप’ सत्तेवर राहतील. हे थैलीचं राजकारण मुंबईतून अनेक वर्षे सुरू आहे. म्हणजेच काँग्रेसच्या काळापासून मुंबई ही थैल्या देण्यासाठीच निर्माण झाली की काय आणि आता तर त्या थैलीचा आकडा वाढत चालला आहे. दिल्लीला कायम थैल्या पोहोचवणे हेच मुंबईचे महत्त्व आहे काय?
उद्धव ठाकरे – त्यांच्यासाठी हेच फार महत्त्वाचं आहे. आम्ही मुंबईला आपलं शहर म्हणून बघतो. मुंबईचं नाव मुंबादेवीवरून पडलं हे सगळ्यांना माहीत आहे. पण ते मुंबईला सोन्याचं अंडं देणारी कोंबडी म्हणून बघताहेत आणि आता ती कोंबडीच ते कापायला निघाले आहेत.
संजय राऊत – त्यांनी जर कोंबडी कापली तर जैन बांधव काय करणार? त्यांना कबुतरं… कोंबडय़ा…
राज ठाकरे – ते पिसं लावून फिरतील…
संजय राऊत – कारण मुंबईसाठी हा अत्यंत गंभीर प्रश्न आहे.
राज ठाकरे – मला असं वाटतं की, महाराष्ट्रामधले आमचे जे विरोधकही असतील त्यांनी आणि महाराष्ट्रातल्या प्रत्येक पक्षाच्या राजकारण्यांनी या गोष्टींचा गंभीरपणे विचार करणं गरजेचं आहे… आता नेमपं हे काय चालू आहे आणि महाराष्ट्राभोवती हा नेमका कसला विळखा आहे. हे प्रत्येकाने ओळखलेच पाहिजे. सत्तेसाठी म्हणून तुमच्याकडून काही गोष्टी करवून घेत आहेत. महाराष्ट्रातल्या प्रत्येक पक्षातल्या नेत्यांनी याचा विचार केला पाहिजे. अगदी वरपासून खालपर्यंत. की आपण हे काय करतोय? जर आज कळलं नाही की आपण काय करतोय आणि काय करून ठेवणार आहोत, तर नंतर प्रत्येकाला कपाळावर फक्त पश्चातापाचा हात मारावा लागेल.
संजय राऊत – मराठी म्हणून सगळ्यांनी एकत्र यायला पाहिजे.
राज ठाकरे – मराठी म्हणून या गोष्टीचा विचार करावाच लागेल. हे बघा, आपापसातले मतभेद असतील… भांडणं असतील, जे काही असेल ते मिटवा. मी म्हणतो की महाराष्ट्रापुढे काहीही नाही. भारतीय जनता पक्षातील लोक असतील किंवा त्यांच्या बरोबर इतर पक्षांचे जे कोणी सहकारी लोक असतील किंवा अजून कोणी असेल… प्रत्येकानं या गोष्टीचा विचार करणे गरजेचे आहे… नाहीतर महाराष्ट्र आपल्याला माफ करणार नाही.
संजय राऊत – त्याकाळात चिंतामणराव देशमुख निर्माण झाले आणि त्यांनी केंद्रातून ठिणगी टाकली… आज चिंतामणराव कोण होणार?
उद्धव ठाकरे – भाजपमध्ये जी मराठी माणसे आहेत. जे केंद्रात मंत्री किंवा खासदार म्हणून बसलेत त्यांनी चिंतामणरावांचा आदर्श गिरवला पाहिजे.
संजय राऊत – ते सगळे चाटम आहेत ना.
उद्धव ठाकरे – तेच म्हणतोय मी. चिंतामणरावांनी घालून दिलेला एक आदर्श होता. तो वेगळा. पण आज आदर्श घोटाळा करणाऱयांच्या मांडीला मांडी लावून बसतात ते काय चिंतामणराव बनणार?
संजय राऊत – एक आरोप कायम होतो की ठाकरे विकासावर बोलत नाहीत…
उद्धव ठाकरे – मग कशावर बोलतात?
संजय राऊत – ठाकरे न केलेल्या कामाचे फक्त व्रेडिट घेतात.. अशी कोणती कामे आहेत की न केलेल्या कामाचे व्रेडिट तुम्ही घेता… उदाहरणार्थ सागरी महामार्ग…
उद्धव ठाकरे – न केलेली कामे म्हणजे नोटाबंदी… परवा आदित्य म्हणाला की रुपयाचा दर सतत घसरतोय, त्याचे व्रेडिट आम्ही घेत नाही… ड्रग्जचे कारखाने चालवणारे कोणाच्या बाजूचे आहेत ते पहा… त्याचे व्रेडिट आम्ही घेत नाही. त्यांची जी काही दुष्कृत्य आहेत त्याचे व्रेडिट आम्ही घेत नाही. आम्ही केलेली कामे आम्ही ठणठणीतपणे लावली आहेत. कोस्टल रोड असेल.. शाळा असतील… हॉस्पिटल्स असतील… कोरोनाच्या काळात केलेलं काम आहे. मुंबई मॉडेल ज्याचे जगभरात कौतुक झाले.
संजय राऊत – पण ‘मुंबई मॉडेल’ पुस्तिकेवर तर निवडणूक आयोगाने बंदी आणली.
उद्धव ठाकरे – निवडणूक आयोगाच्या बंदीची मी पर्वा नाही करत. कारण त्यावेळेला निवडणूक आयोगाची लोक वाचली म्हणून आज ते असं काही करू शकताहेत. तेसुद्धा कोरोनात गेले असते तर? मला एक सांगा की कोरोनाच्या काळात मुंबईत किंवा महाराष्ट्रात आपण जेव्हा लोकांची काळजी घेत होतो तेव्हा गंगेमध्ये प्रेतं वाहत होती ती कोणाची होती? हिंदूंची होती, मुसलमानांची होती, ख्रिश्चनांची होती, कोणाची होती? गुजरातमध्ये सार्वजनिक चिता पेटल्या होत्या. ते का नाही सांगत ही लोकं? मुंबई मॉडेलमध्ये मला खरंच एका गोष्टीचं समाधान आहे, की चीनने पंधरा दिवसांत फील्ड हॉस्पिटल बांधलं. आपण मुंबईमध्ये 18 दिवसांत फील्ड हॉस्पिटल बांधून दाखवलं. किती तरी कामे आहेत… मी तर त्यावर पुस्तिकाच केली आहे. तुम्ही म्हणालात की या पुस्तिकेवर बंदी आणली आहे. पण ती बंदी मी मानत नाही. निवडणूक आयोगाला जे करायचं ते करू द्या. कारण लोकसभेच्या निवडणुकीत आपल्या गाण्यातले ‘जय भवानी’, ‘जय शिवाजी’ हे शब्द काढायला सांगितले. हिंदू हा तुझा धर्म… यावर आक्षेप घेतला आणि हे आम्हाला हिंदुत्व शिकवणार?
संजय राऊत – आणि ते म्हणताहेत की तुम्ही हिंदुत्व सोडलंय?
उद्धव ठाकरे – पण मी नाही मानलं, काय करणार निवडणूक आयोग? कोरोना काळात जे काही केलं ते आम्ही निवडणूक आयोगाच्या परवानगीने केलेलं नाही.
संजय राऊत – तुमच्या वचननाम्यामध्ये काही महत्त्वाचे मुद्दे आहेत. आता संयुक्त वचननामा आहे. काल देवेंद्र फडणवीस म्हणाले की, आम्ही मुंबई झोपडपट्टी मुक्त करू.
उद्धव ठाकरे – म्हणजे नेमपं काय करू? अदानीयुक्त करू? आज धारावीत जे चाललंय ते फार भयंकर आहे. पात्र-अपात्रतेचा खेळ करून धारावीच्या निमित्ताने अर्धीअधिक मुंबई अदानीच्या घशात टाकली आहे असं म्हटलं तर ते वावगं ठरणार नाही. मुलुंडपासून सुरुवात होते… कांजूरची मिठागरे टाकलीत… दहिसरचे मिठागर टाकले… कुर्ला मदर डेअरी टाकली… मुंबईतली ही सगळी झोपडपट्टी तिकडे हलवायची आणि धारावीला मोठे टॉवर बांधायचे.
संजय राऊत – मग आपल्याकडे काय राहिलं?
उद्धव ठाकरे – एक गोष्ट आपल्या लक्षात आली नाही, ती म्हणजे धारावीच्या बगलेमध्ये अहमदाबादला जाणारं बुलेट ट्रेनचं स्टेशन कसं काय? म्हणजे तिकडे कोण राहणार आहेत?
राज ठाकरे – तेच तर सांगतोय ना मी…
उद्धव ठाकरे – इतक्या दूरदृष्टीने ते हे सगळं करताहेत. झोपडपट्टीमुक्त म्हणजे अदानीयुक्त करतायत. जसं काँग्रेसमुक्त भारत करता करता काँग्रेसयुक्त भाजप झाला, तसंच आहे हे.
संजय राऊत – आपल्या वचननाम्यात तीन महत्त्वाचे मुद्दे आहेत. बाकीही आहेतच. पाच वर्षांत आपण एक लाख स्वस्त घरं देणार आहात…
उद्धव ठाकरे – होय. सोबत वचननामाही आणलाय. पण त्याच्या आधी विकासावर बोलायचं असे जे म्हणत आहेत त्यांना सांगतो, कोस्टल रोड आम्ही करून दाखवला की नाही? शिवसेनाप्रमुखांच्या नावाने मुंबईकरांसाठी एक धरण बांधून दाखवले की नाही? पाचशे फुटांपर्यंतचा मालमत्ता कर आम्ही रद्द करून दाखवला की नाही? बेस्टची सेवा आणि शाळा सुधारून दाखवल्या की नाहीत?
संजय राऊत – अनेक कामं आहेत, अटल सेतूचं काम तर काँग्रेसच्या काळात सुरू झालं होतं.
उद्धव ठाकरे – पहिला गर्डर मुख्यमंत्री असताना मी टाकला होता आणि मी ते काम बंद पडू दिलं नाही.
संजय राऊत – विलासराव देशमुखांच्या नावाने जो संपूर्ण फ्री वे आहे तो काँग्रेसच्या काळात निर्माण झाला आहे. मेट्रोची पायाभरणी हीसुद्धा मनमोहन सिंगांनी केली आहे.
उद्धव ठाकरे – मनमोहन सिंग हे मुंबईला आर्थिक केंद्र देणार होते. तेही मोदी, शहांनी गुजरातला नेलं.
संजय राऊत – वचननाम्यात एक लाख स्वस्त घरे देण्याची योजना आहे… तुम्ही घरकाम करणाऱया महिलांना दीड हजार रुपये देणार आहात. म्हणजे ही तुमची लाडकी बहीण योजनाच आहे. सरकार दीड हजार देतंय… तुम्ही पण दीड हजार देताय…
उद्धव ठाकरे – असेल… पण बहिणींचे लाड आम्ही केले तर तुम्हाला काय प्रॉब्लेम आहे?
संजय राऊत – दुसरं असं की, ज्या मोकळ्या आणि मोक्याच्या जागा आहेत त्या बिल्डरांच्या घशात जाण्यापासून आपण रोखणार आहात… अशी अनेक कामे आहेत. त्यावर आता सरकार पक्षाचं फार महत्त्वाचं म्हणणं आहे… केंद्रात आमची सत्ता आहे.. महाराष्ट्रात आमची सत्ता आहे… राज्यकर्ते आम्हीच आहोत… या योजनांची अंमलबजावणी आम्ही यांना करू देणार नाही.
उद्धव ठाकरे – आडवे येऊन दाखवाच… माझे आज त्यांना आव्हान आहे… आमच्या या योजनांच्या आडवे येऊन तुम्ही दाखवाच…
राज ठाकरे – मला एक गोष्ट कळली नाही की चांगल्या योजना असतील तर आमच्याकडे केंद्र आहे, आमच्याकडे राज्य आहे… ही कुठली मस्ती?
संजय राऊत – ही मस्तीच आहे…
राज ठाकरे – जर योजना चांगल्या असतील तर त्या सर्वांनी मिळून केल्याच पाहिजेत.
संजय राऊत – मधल्या काळात आपण एक महत्त्वाचं विधान केलं होतं, की भाजपला मोदींची आणि पैशांची मस्ती आली आहे.
राज ठाकरे – हो… त्यांच्याकडे मोदी आणि ईव्हीएम आहे. लहानपणी आपण सगळे पत्त्यांचा बंगला करायचो.. यांच्याकडेसुद्धा बघितलं तर पत्त्यांचा बंगला आहे पण तो उलटा आहे. खालचा पत्ता आहे तो नरेंद्र मोदींचा आहे आणि आता हे जे सगळे बोलताहेत ते केवळ नरेंद्र मोदींच्या जिवावर बोलताहेत. भारतीय जनता पक्षाला आज जे काही मतदान होतंय ते फक्त नरेंद्र मोदींच्याच नावावर होतंय. यांच्या कोणाच्याही नावावर होत नाही.
महेश मांजरेकर – मला दोन-तीन प्रश्न पडलेत… समजा मला किंवा माझ्या घरच्यांना काही त्रास झाला तर मी हिंदुजा हॉस्पिटलमध्ये जाईन. दुसरीकडं जाईन. इतकी हॉस्पिटल आहेत इथं महापालिकेची…
राज ठाकरे – (त्यांना थोडे थांबवत) या विषयावर येतो जरा… थोडंसं महत्त्वाचं बोलतो… या सगळ्या गोष्टींचं जर का तुम्हाला उत्तर हवंय किंवा याचा प्रॉब्लेम आपण ज्याला ‘जर्म’ म्हणतो तो म्हणजे या शहरात येणारे अवास्तव लोंढे… तुम्ही कितीही चांगल्या योजना करा, हे लोंढे ज्यावेळी येतात त्यावेळेला तुमच्या या सगळ्या योजना विस्कटल्या जातात. तुम्ही चांगले रस्ते केलेत की त्यावर एक्स्ट्रा गाडय़ा येणार… कारण लोंढे जास्त येतायत. इमारती उभ्या राहतायत. एक साधी गोष्ट लक्षात घेऊया की, ज्याप्रकारे मुंबईत किंवा सगळ्याच ठिकाणी जी रिडेव्हलपमेंट्स सुरू आहेत. पूर्वी एका इमारतीत सर्वसाधारणपणे 20 माणसे राहत होती, तिकडे आता दोनशे-चारशे माणसे राहायला आली… जागा तेवढीच आहे… जास्तीत जास्त माणसं जेव्हा एका शहरात येतात तेव्हा तिथली व्यवस्था कोलमडते. त्यामुळं बंधनं लोंढय़ांवरच घातली गेली पाहिजेत.
महेश मांजरेकर – माझा प्रश्न तोच आहे की, गर्दी कशी कमी करायची?
राज ठाकरे – तुम्ही ते बोलायला गेलात की तुम्हाला मुंबईत आणि महाराष्ट्रात हे सांगितलं जातं की, या देशातला कोणताही माणूस कुठेही जाऊ शकतो आणि कुठेही राहू शकतो, हे बाकीच्या राज्यांमध्ये होत नाही. बाकीच्या राज्यातले लोक त्यांच्याकडे येणारे लोंढे बरोबर कंट्रोल करतात. आमच्याकडे आमचेच लोक सांगतात की, कोणीही कुठेही राहू शकतो.
संजय राऊत – आता आडवी मुंबई उभी झाली आहे…
महेश मांजरेकर – एक पॅलेमिटी किंवा एपिडेमिक… हेच मुंबईला वाचवू शकतं का?
राज ठाकरे – दुर्दैव आहे ते… पण प्रश्न असा आहे की, जोपर्यंत हे लोंढे अंगावर येत आहेत तोपर्यंत कितीही योजना राबवायचा प्रयत्न करा… त्या कोलमडणारच. तुम्ही मघाशी म्हणालात की, फुटपाथवरती लोक राहतात… फुटपाथ कितीही वेळा साफ करा, तो भरतच राहणार…
महेश मांजरेकर – मुंबईत पार्पिंगची मोठी समस्या आहे सर्वसामान्य मुंबईकर म्हणून मी सांगतो… मी जर गाड़ी रस्त्याला पार्किंग केली तर तुम्हाला माझ्याकडून पार्किंगचे पैसे घेण्याचा काही एक हक्क नाही. मला जागा दाखवा, तिथे पार्पिंग करेन.
राज ठाकरे – साधारण चार-पाच महिने झाले असतील, मी एक योजना घेऊन मुख्यमंत्र्यांना भेटलो. ती पार्किंगची योजना होती. अगदी साधी सरळ योजना. त्यात मी त्यांना सांगितले होते की, काही महत्त्वाची, मोक्याची मैदाने काढा. त्यावर त्यांनी मला लगेच सांगितले की, पायलेट प्रोजेक्ट म्हणून मुंबईत एक आणि उपनगरात दोन मैदानांच्या खाली पाचशे ते हजार गाडय़ांचे पार्किंग करू… वर मैदान तसंच्या तसं. असे पार्किंगचे लॉट्स जोपर्यंत तयार करत नाही, तोपर्यंत रोजच्या रोज गाडय़ा एकमेकांवर आदळणारच आहेत. या शहरात रोज गाडय़ांचे रजिस्ट्रेशन किती होतंय त्याचे आकडे बघा एकदा. दुसरी योजना अशी की, फुटपाथला पिवळा-काळा रंग दिला म्हणजे तिथे पार्किंग करता येईल आणि फुटपाथच्या दगडांना काळा-लाल रंग दिला तर नो-पार्पिंग. वेगळे बोर्ड लावण्याची गरजच पडणार नाही. सोप्या सोप्या गोष्टी आहेत. महिनाभरात ताबडतोब करून टाकू असं फडणवीसांनी मला सांगितलं. पण पुढं काहीही झालं नाही.
महेश मांजरेकर – माझं तेच म्हणणं आहे, मी एक कॅल्क्युलेशन केलं की, मुंबईत साधारण 51 लाख गाडय़ा आहेत. प्रत्येक गाडी अॅव्हरेज 6 फूट धरली… त्यात ट्रक आहे, त्यात टेम्पो आहे. जर त्या बम्पर टू बम्पर उभ्या केल्या तर इथपासून लंडनपर्यंत जाऊन परत एक हजार किलोमीटर लाईन लागेल या गाडय़ांची… त्या गाडय़ांवरून जायला विमानालाही नऊ तास लागतील.
राज ठाकरे – तेच सांगतो की, या सगळ्या गोष्टींवर राज्यकर्ते म्हणून कंट्रोलच नाही. देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी व्हावेत असं मी एकदा म्हटलं होतं. ते झालेही. पण मला वाईट या गोष्टीचं वाटतं की, एका व्यक्तीकडे इतपं बहुमत दिल्यानंतरही काही झालेलं नाही. टाऊन प्लॅनिंग किंवा त्यासंदर्भातील सगळ्या यंत्रणा हातात असताना एखाद्या राज्यातील किंवा देशातील या प्रश्नांकडं का पाहिलं जात नाही? दर सहा महिन्याला निवडणुका लागतात. मग ते इकडे बोलतात… सहा महिन्यांनी दुसरीकडे निवडणुका लागल्या की ते तिकडे बोलतात… महत्त्वाच्या प्रश्नांबाबत त्यांच्याकडून काहीतरी घडेल असं मला वाटलं होतं. पण मूळ प्रश्नांकडं त्यांचं लक्षच नाही. त्यामुळं खालच्या लोकांचंही लक्ष नाही. फक्त निवडणुका बघायच्या, माणसं ढापायची, पैसे वाटायचे इतकंच चालू आहे. त्यांचंच वाक्य होतं, कुठे नेऊन ठेवलाय महाराष्ट्र? असा महाराष्ट्र होता? लोकांच्या छोटय़ा छोटय़ा गरजा आणि छोटय़ा छोटय़ा अपेक्षा आहेत. त्याही जर लोंढय़ांमुळे उद्ध्वस्त होणार असतील आणि त्या लोंढय़ांमुळे केवळ योजनाच नाही तर तुमचं अस्तित्व.. मराठी माणसांचं अस्तित्व उद्ध्वस्त होणार असेल तर…
महेश मांजरेकर – इकडे राहणारी माणसं उद्ध्वस्त होत आहेत. योजना तर जाऊच दे.
उद्धव ठाकरे – हा विचार तुम्ही मघाशी मांडलात. ज्याचा त्रास मी आता सहन करतोय. हा सगळा विचार मुंबईकरांनी केला पाहिजे. आम्ही मराठी तर आहोतच, पण जे आदळलेले लोंढे आहेत, जे पिढ्यान्पिढ्या इथे राहतात, त्यांचेही घसे बसले आहेत. त्यांनाही आजारपण भोगावं लागतंय आणि तरीसुद्धा ते लोक केवळ आम्ही इथल्या लोकांची चिंता वाहतोय म्हणून आमच्याविरोधात भाजपला मतदान करणार असतील तर त्यांनी हे लक्षात ठेवायला हवं की, त्यांना वाचवायला भाजपवाले येणार नाहीत.
राज ठाकरे – याच्यावरती सोल्युशन एकच आहे ते म्हणजे समाज जागृत होणं गरजेचं आहे. ते चुकत असतील तर त्यांना माफ करू नका. आम्ही चुकत असू तर आम्हाला माफ करू नका, योग्य कोण काय करतंय त्याआधारे मतदान होणार आहे की नाही? आणि जर चुकीच्याच गोष्टी करणाऱया लोकांच्या मागे तुम्ही मतदान करत राहिलात तर समोरचे जे चुका करताहेत त्यांना कधीच कळणार नाही की, या आपल्या चुका आहेत म्हणून.
उद्धव ठाकरे – उद्या वाचवायलाच कोण येणार नाही.
राज ठाकरे – कोण येणार?
महेश मांजरेकर – आपण म्हणतो मुंबई डेव्हलप करा, पण मुंबईची तेवढी क्षमताच राहिलेली नाही. मुंबईची डेव्हलपमेंट करण्यापेक्षा, एफएसआय वाढवण्यापेक्षा आहेत त्या सुविधा चांगल्या करा. ट्रेनच्या म्हणा.. मेट्रोच्या म्हणा. आम्ही लहानपणी बघायचो, एखादी झोपडपट्टी बांधली की, लगेच येऊन म्युनिसिपाल्टी ती तोडायची. आज त्यांनाही माहीत आहे की, मी झोपडपट्टी बांधली की, इथे जो काही टॉवर होईल त्यात मला जागा मिळणारच आहे. त्यामुळेच तर लोंढे येतात ना? प्रॉब्लेम हाच आहे.
राज ठाकरे – मी परत परत तेच तर सांगतोय. मेट्रो, रेल्वे, मोनोरेल अशा सुविधा जेव्हा तुम्ही सुरू करता त्याआधी तुम्ही गाड्यांच्या रजिस्ट्रेशनवर पहिल्यांदा बंधने आणली पाहिजेत ना.
महेश मांजरेकर – ते बंदच झालं पाहिजे.
राज ठाकरे – पण ते होतच नाही ना.
महेश मांजरेकर – गाडी घ्यायची असेल तर घ्या, पण प्रत्येक घरात एकच गाडी असेल असं करा.
राज ठाकरे – यात तुम्ही, आम्ही सगळेच आलो. एक कायदा करा गाडय़ांबद्दल. सगळे जण मानतील. काय प्रश्न येतो त्यात?
महेश मांजरेकर – जेवढय़ा रजिस्टर्ड रिक्षा आहेत तेवढय़ाच अनधिकृत रिक्षाही आहेत.
राज ठाकरे – दहा वर्षांपूर्वी मी अनधिकृत टॅक्सी आणि रिक्षांविरोधात आंदोलन केलं होतं. चार हजार बेकायदा रिक्षा फाडायला लावल्या होत्या. अर्थात सरकारनेच पकडल्या होत्या. जवळपास दोन हजार अनधिकृत टॅक्सीज डिसमेंटल केल्या होत्या. सरकारला सांगून मी हे करून घेतलं होतं. त्यावेळी मला वाटतं की, काँग्रेसची सत्ता होती.
उद्धव ठाकरे – म्हणूनच मी सांगतो, आतापर्यंत आम्ही जी कामं केली ती लोकांसमोर आहेत. उद्या काय करणार ते लोकांसमोर ठेवलंय. आता लोकांनी ठरवायला पाहिजे की, उद्या त्यांना काय पाहिजे. आम्ही तळमळीने बोलतो आहोत, विषय मांडतो आहोत, पण सत्ताधाऱयांकडून फक्त आरोप होत आहेत. त्यांनी केलेली कामं कुठे आहेत? ना यांनी नेते निर्माण केले, ना यांनी कामे निर्माण केली. फक्त दुसऱयाचं उचलायचं आणि स्वतःच्या नावावर खपवायचं इतकंच केलं. शिवसेनाप्रमुखांचा जो पुतळा आपण उभारला, मी केला, त्याचंही व्रेडिट ते घेत आहेत. अरे मग तुम्ही आलात कशाला जन्माला… आणि कशासाठी बसलात राज्यावर. फक्त निवडणूक आली की जाती जातीत, धर्मा धर्मात मारामाऱया लावायच्या आणि लोकांनी आंधळेपणाने मतदान करायचं ही त्यांची अपेक्षा आहे का?
संजय राऊत – अंधभक्त आहेत ना.. हिंदुत्व म्हणजे काय आहे? अंधभक्त निर्माण करणं हेच त्यांचं हिंदुत्व?
राज ठाकरे – मला आता काय वाटतं माहीत आहे का, की ही महानगरपालिकेची निवडणूक आहे. मला असं प्रामाणिकपणे वाटतं की, ही जी बेबंदशाही सुरू आहे, याला काही प्रमाणात जर थांबवायचं असेल, अटकाव करायचा असेल तर मुंबई, ठाणे या सगळ्या एमएमआर रिजनमधल्या महानगरपालिका या आमच्या हातामध्ये येणं गरजेचं आहे. सत्तेसाठी बोलत नाही, पण या सगळ्या गोष्टींना जर अटकाव बसला नाही.. उद्या जर का तीनही गोष्टी गेल्या तर नंतर तुम्ही कोणाकडे बघायचेच नाही मग. मराठी माणसासाठी ही सगळ्यात मोठी निवडणूक आहे. हे मी निवडणुकीसाठी बोलत नाही.. निवडणुका लागायच्या आधीपासून बोलतोय.
संजय राऊत – जवळपास सात ते आठ वर्षांनी या निवडणुका होत आहेत. आपण प्रतीक्षा करीत होतो निवडणुका व्हाव्यात, पण या निवडणुकासुद्धा सरळ मार्गाने होत नाहीयेत. यंत्रणांचा गैरवापर होतोय..
राज ठाकरे – हिंदीची सक्ती हाच मुद्दा घ्या. आठवतंय का, मी त्यावेळी बोललो होतो की, ही फक्त हिंदीची सक्ती नाही, तर ते चाचपडून बघताहेत तुम्हाला. तुम्ही जागे आहात की झोपलेले आहात! हिंदीची सक्ती हा त्याचाच भाग होता. महाराष्ट्रातला मराठी माणूस जागा आहे का? आणि नसेल जागा तर करून टाकू सक्ती, असा तो डाव होता.
संजय राऊत – तुम्हाला काय दिसलं? जागा आहे की झोपलाय?
राज ठाकरे – मला असं वाटतं की, मराठी माणूस जागा आहे. तो नुसताच जागा नाही तर त्रासलेला आहे, रागावलेला आहे आणि चिडलेलाही आहे. तो बोलत नाही याचा अर्थ असा नाही की, तो झोपलाय. तो जागा रहावा आणि त्याने बदल घडवावा हीच माझी देवीकडे प्रार्थना आहे.
संजय राऊत – सात वर्षांनी निवडणुका होताहेत, पण त्याही सरळ मार्गाने होत नाहीयेत. धमक्या, दहशत, पैशांनी माणसं विकत घेणं… काय होणार?
राज ठाकरे – अहो, माझं तेच म्हणणं आहे ना.. ते म्हणताहेत की आम्ही विकास केला. मग तुम्हाला धमक्या का द्याव्या लागताहेत? तुम्हाला पैसे का वापरावे लागताहेत? तुम्ही उमेदवाऱया मागे का घ्यायला लावत आहात? तुम्ही म्हणताय ना विकास केला? मग विकासावर बोला.
संजय राऊत – उद्धव साहेब, राज साहेब… या मुंबईमध्ये अनेक मोठे नेते महानगरपालिकेत गेले. जॉर्ज फर्नांडिसपासून अहिल्या रांगणेकर, मृणालताई गोरे असतील किंवा आपल्या शिवसेनेच्या मनोहर जोशींपासून…
उद्धव ठाकरे – मनोहर जोशी तर लोकसभा अध्यक्षही झाले.
संजय राऊत – या चांगल्या माणसांच्या बाबतीत कधीही बिनविरोध निवडणुका झाल्या नाहीत आणि आता असे काय आहे की, 70 लोक बिनविरोध निवडून आले?
उद्धव ठाकरे – मनोहर जोशी हे लोकसभेचे अध्यक्ष झाल्यावर कधीही शिवसेना उमेदवाराच्या प्रचाराला किंवा अर्ज भरायला गेले नव्हते कधी, जसे आताचे विधानसभेचे अध्यक्ष गेले तसे.
संजय राऊत – 70 ठिकाणी बिनविरोध.. बॅरिस्टर नाथ पै सुद्धा कधी बिनविरोध निवडून आले नाहीत. उत्तर प्रदेशात राम मनोहर लोहिया किंवा अटलजी कधी बिनविरोध निवडून आले नाहीत.
उद्धव ठाकरे – मोदी आले नाहीत.
संजय राऊत – होय… मोदी आले नाहीत… अमित शहा बिनविरोध आले नाहीत… पण या महाराष्ट्रात 70 लोक बिनविरोध निवडून येतात. याचा तुम्ही कसा काय सामना करणार?
राज ठाकरे – काय आहे की, बाकीच्या सगळ्या गोष्टींशी तुम्हाला भांडता येतं, अंगावर जाता येतं. सगळ्या गोष्टी करता येतात. परंतु समाजामधल्या काही घटकांचं जे अधःपतन झालं आहे, त्याचं काय करायचं हाच पहिला प्रश्न आहे.
संजय राऊत – हे अधःपतन महाराष्ट्राचं झालंय?
राज ठाकरे – हेच तर दुर्दैव आहे. आहेच मुळी.
संजय राऊत – अजित पवार भारतीय जनता पक्षासोबत आहेत. त्यांची अधिकृतपणे युती आहे आणि ते पुणे व पिंपरी-चिंचवडमध्ये स्वतंत्रपणे निवडणूक लढवताहेत. त्यांनी भारतीय जनता पक्षाच्या भ्रष्टाचारावर मोठा हल्ला केला. त्यांचं म्हणणं आहे की, भाजपला मस्ती आली आहे. जे तुम्ही म्हणताय. त्यांचं म्हणणं आहे की, भाजपने प्रचंड भ्रष्टाचार केला. त्यांचं असंही म्हणणं आहे की भाजपला नीतिमत्ता नाही.
उद्धव ठाकरे – मला वाटतं ही त्यांची नुरा कुस्ती आहे. म्हणजे एकमेकांवर आरोप करायचे आणि विरोधी पक्षाला स्पेसच ठेवायची नाही. निवडून आलो की, पुन्हा एकत्रच यायचंय. आतासुद्धा आम्ही एकत्र आलो आहोत म्हणून मिंधेंना मुंबई, ठाण्यात मराठी मतं फोडण्यासाठी ते वापरताहेत. मिंधेंचा वापर त्याचसाठी आहे. म्हणूनच तर त्यांना शिवसेना आणि आमचं चिन्ह दिलंय. मराठी माणसामध्ये गोंधळ उडवायचा, त्यांच्यात फूट पाडायची, मराठी माणसं फोडायची हे मिंधेंना दिलेलं काम आहे आणि ते काम मिंधे करताहेत.
संजय राऊत – पण ते काम तुम्ही दोघे भाऊ एकत्र आल्याने असफल झालंय…
उद्धव ठाकरे – होय… असफल झालंय… आणि मराठी माणसांनी ते आणखी असफल केलं पाहिजे.
राज ठाकरे – त्यांनी सगळ्या योजना आखल्या होत्या, पण आम्ही दोघे एकत्र येऊ हे कधी होईल याची अपेक्षाच त्यांनी केली नव्हती.
संजय राऊत – त्यामुळे त्यांचा बंगला कोसळला. दुसरा एक फार गंभीर प्रश्न आहे की, या निवडणुकीमध्ये कधी नव्हे तेवढय़ा बंडखोऱया, मारामाऱया, खुनाखुनी, एबी फॉर्म पळवणं आणि गिळणं इथपर्यंत मजल गेली…
राज ठाकरे – या गोष्टीची कारणं अशी आहेत की, वेळेत निवडणुका झाल्या असत्या तर हे चित्र तेवढं दिसलं नसतं. हे सात वर्षे जे सगळं तुंबलं ना… आता होणार… आता होणार… आता होणार… आणि त्या अपेक्षेने दर सणासुदीला इच्छुक जे काही पैसे वाटत बसले होते, त्या सगळ्याचा हा उद्रेक झाला.
संजय राऊत – म्हणजेच बंडखोरीचा विक्रम झाला. पूर्वीच्या राजकारणात नेते घडविण्याची प्रक्रिया होती…
उद्धव ठाकरे – आता नेते बिघडवण्याची आहे.
संजय राऊत – आता भारतीय जनता पक्षाला नेते पळवावे लागतात. जगातला सगळ्यात मोठा आंतरराष्ट्रीय पक्ष…
उद्धव ठाकरे – मी लोकसभा निवडणुकीच्या वेळी बोललो होतो की, भारतीय जनता पक्षासारखा वांझोटा पक्ष देशाच्या राजकारणात नाही. यांना राजकारणात पोरं होत नाहीत. त्याचं पाप आमच्यावर टाकतात आणि आमची राजकारणातील पोरं ते पळवतात.
संजय राऊत – मग आता या पोरांना तुम्ही कसा काय आवर घालणार?
उद्धव ठाकरे – त्याची गरज नाही. आमच्याकडे पोरं… म्हणजे…
संजय राऊत – प्रक्रिया सुरूच आहे… म्हणजे तिकडे तुमच्याकडे बंदी नाहीये.
उद्धव ठाकरे – मोहन भागवत बोललेत ना.
संजय राऊत – म्हणजे तुम्ही हिंदुत्वाचं पालन करताय…
उद्धव ठाकरे – त्यांचं ऐकतोय आम्ही.
संजय राऊत – दुसरं असं आहे की, या वेळेला भारतीय जनता पक्षातच बंडखोऱया झाल्या. भारतीय जनता पक्षातून लोक बाहेर गेले.
उद्धव ठाकरे – म्हणजे जसं राज मघाशी म्हणाला तसा त्यांचा पत्त्याचा बंगला हलायला लागला आहे. एक दिवस तो पत्त्याचा बंगला बेपत्ता होईल.
राज ठाकरे – पटकथा लेखक सलीम खान आहेत ना… त्यांनी मला एकदा खूप छान सांगितले होते… ते म्हणाले होते, ‘हर एक पॅकेट पे एक्सपायरी डेट लिखी होती है…’ भाजपचीही असणारच.
संजय राऊत – प्रत्येक गोष्टीला अंत आहे, आपण जे म्हणालात की, कोणीही सत्तेचा अमरपट्टा घेऊन आलेला नसतो…
राज ठाकरे – लोकशाहीच्या देशात.
संजय राऊत – लोकशाही आहे का?
राज ठाकरे – लोकशाही आहे ना… लोकांमध्ये आहे.
संजय राऊत – मतपेटीत का दिसत नाही?
राज ठाकरे – त्याचं कारणच ते आहे. अनेक गोष्टी आहेत त्यामध्ये. ईव्हीएमपासून इतर अनेक गोष्टी आहेत.
संजय राऊत – तुम्ही अजूनही मानता ईव्हीएममध्ये घोटाळा?
राज ठाकरे – आता तेलंगणा आणि पंजाबमध्ये जिल्हा परिषदेच्या निवडणुका झाल्या. तिथे मतदान बॅलेट पेपरवर झालं. तेलंगणात भारतीय जनता पक्ष सातव्या नंबरवर गेला आणि पंजाबमध्ये चार नंबरवर गेला. हे बॅलेट पेपरवर सिद्ध झालंच ना.
संजय राऊत – कर्नाटकातसुद्धा त्याच पद्धतीनं झालं…
राज ठाकरे – बॅलेट पेपरवरच झाले ना.
संजय राऊत – राज्यातल्या निवडणुका बॅलेट पेपरवर घेणं हा राज्य निवडणूक आयोगाचा अधिकार आहे.
राज ठाकरे – राज्य निवडणूक आयोग? तो कोणाकडे आहे?
संजय राऊत – महाराष्ट्रात राज्य निवडणूक आयोग नावाची संस्था अस्तित्वात आहे का?
राज ठाकरे – भारतात कुठे आहे? देशात कुठे आहे? नाहीतर आमचं म्हणणं ऐकलं असतं ना त्यांनी?
संजय राऊत – आपण स्वतः त्यांच्याकडे गेलात, प्रेझेंटेशन दिलंत…
राज ठाकरे – सगळं सांगून झालं.
संजय राऊत – बिनविरोध निवडून आले त्याविरोधात मनसेचे नेते याचिका घेऊन गेलेत.
राज ठाकरे – बघू काय होतंय?
संजय राऊत – शिंदे गटाचं किती आव्हान वाटतंय? कारण त्यांच्याकडे आपलं चिन्ह आहे.
उद्धव ठाकरे – बाळासाहेबांनी एक शब्द वापरला होता. तो आता काही मी वापरू इच्छित नाही. पण ‘यूज अॅण्ड थ्रो’. याच्यावरून तुम्हाला तो शब्द आणि त्याचा अर्थ लक्षात आला असेल, तो शब्दही तुम्हाला कळला असेल, पण ते बोलणं बाळासाहेबांना शोभत होतं बोलायला. मी बोलणार नाही, पण तसाच मिंधेचा उपयोग आहे.
संजय राऊत – मुंबईबरोबर 29 महानगरपालिका आहेत आणि तीही महत्त्वाची शहरं… अगदी चंद्रपूरपर्यंत आहेत. तुम्ही एमएमआर रिजनचा उल्लेख करताय… पुणे, नाशिक, जळगाव, संभाजीनगर, जालना, परभणी, नागपूर, अमरावती, अकोला या सगळ्या महानगरपालिका मिळून महाराष्ट्र आहे. आपण मुंबईवर बोलतोय… पण यांना तुम्ही काय सांगाल? या ज्या उरलेल्या महानगरपालिका आहेत, तीसुद्धा जनता आपल्याकडे पाहते आहे की, आमच्याकडेही लक्ष द्या. आम्हीसुद्धा महाराष्ट्राचेच लोक आहोत. तुम्ही त्यांना काय आवाहन करणार?
राज ठाकरे – आता या सगळ्या निवडणुकीकडे तुम्ही पाहताय. महाराष्ट्र तर बघतोच आहे. ज्या प्रकारे आता या निवडणुकीत वेडेपिसे होऊन ज्या लेव्हलला पैसे वाटले जाताहेत, आता या क्षणाला तरी तुम्ही त्यांना संपूर्ण महाराष्ट्रभर किती पुरणार आहात? आता नगरपालिका आणि बाकीच्या सर्व निवडणुका झाल्या तेव्हा त्यांनी काय थैमान घातले ते आपण पाहिलं ना. इतर शहरांपर्यंतही आम्ही नक्की जाऊ, प्रश्न नाहीच. कारण तोही महाराष्ट्रच आहे. परंतु मला असं वाटतं की, आताची एकूण परिस्थिती पाहता सावध पावलं टाकणं गरजेचं आहे आणि त्या सावध पावलांमध्ये पहिलं पाऊल मुंबई आहे, ठाणे आहे.
उद्धव ठाकरे – इथले जे मतदार आहेत त्यांना आम्ही दोघे मिळून सांगतोय की, आता तुम्हाला राज्यकर्त्यांकडून काही अपेक्षा ठेवण्याची गरज नाही. तुम्हीच राज्यकर्त्यांना दिशा दाखवली पाहिजे. भले ते पैसा वाटतील, दारू वाटतील. ड्रग्जचा पैसाही येतोय, पण महाराष्ट्र हा लाचार होत नाही, हे दाखवण्याची आता गरज आहे.
संजय राऊत – मुंबईसह अनेक शहरांमध्ये मराठी माणूस नक्कीच आहे, पण इतर समाजही आहे. मुस्लिम बांधव आहेत, ख्रिश्चन बांधव आहेत, जैन आहेत, पारशी आहेत. ते आपल्याबरोबर राहतील का?
उद्धव ठाकरे – नक्कीच आपल्याबरोबर राहतील.
राज ठाकरे – का नाही राहणार?
संजय राऊत – तुम्ही हिंदुत्वविरोधी आहात अशी टीका होऊ शकते तुमच्यावर?
राज ठाकरे – का कशाकरिता? मी उद्या समजा मंदिरात जाऊन पाया पडतोय आणि तुम्ही मला सांगाल, गंगेचं पाणी पी… मी नाही पिणार… गंगा उगम पावते तिथलं पाणी कदाचित पिईन मी. गंगेत प्रेतं वाहून जाताना पाहिलीत ना? ते पाणी पिऊ?
संजय राऊत – उद्धवजी, हे प्रबोधनकार ठाकरेंचं हिंदुत्व आहे. ते जसं म्हणायचे, मला घंटा बडवणारं हिंदुत्व नकोय. तेच राजजी आणि तुम्ही आज म्हणता…
राज ठाकरे – बरोबरच आहे, जे नाही पटत ते नाही पटत ना.
संजय राऊत – उद्धवजी, तुम्ही तरी हिंदू आहात का? हा भारतीय जनता पक्षाला पडलेला प्रश्न आहे.
उद्धव ठाकरे – आमचं हिंदुत्व ते आहे, जे प्रबोधनकार सांगायचे… जे शिवसेनाप्रमुख सांगायचे. त्यांचा मुसलमानांना विरोध नव्हता. देशद्रोही आणि देशप्रेमी असे सरळ दोन विभाग त्यांनी केले होते. जरी तो मुसलमान असेल आणि आपल्या देशावर प्रेम करणारा असेल तर तो आमचा आहे आणि आता जसा त्यांचा कुरूलकर पकडला गेला आहे… मला माहीत नाही तो कुरुलकर कोण आहे? पण तो देशद्रोही आहे की नाही? जो आपल्या देशात राहून पाकिस्तानचं काम करतोय तो देशद्रोही आहे. आमचं हिंदुत्व हे राष्ट्रीयत्व आहे. जे बाळासाहेबांनी सांगितलंय.
राज ठाकरे – आपण आता गोमातेची हत्या, बीफ एक्सपोर्ट वगैरे हा विषय बघू. काँग्रेस सरकारच्या काळात बीफ एक्सपोर्टमध्ये भारताचा नंबर नववा होता. मोदी सरकारच्या काळामध्ये बीफ एक्सपोर्टचा आपला नंबर दोन नंबरवर आला. म्हणजे सर्वाधिक गायी आणि सगळ्या गोष्टी भारतात मारल्या जात आहेत हे तर सत्य आहे. ही सरकारी आकडेवारी आहे, माझी नाही.
संजय राऊत – आणि या कंपन्यांकडून भारतीय जनता पक्षाला मोठय़ा देणग्या मिळाल्या आहेत.
राज ठाकरे – आता त्यावर नरेंद्र मोदींची क्लिप मी त्यावेळी जाहीर दाखवलेलीही होती. त्यात ते म्हणाले होते की, ये तो मेरे दोस्त है… बीफ एक्सपोर्ट करणारे हे माझे मित्र आहेत असे ते बोलले होते. सोयीच्या हिंदुत्वाला काय अर्थ आहे? आणि तुम्ही कितीही काहीही म्हणा, या हिंदुस्थानात हिंदुत्वावर निवडणूक लढवून जिंकता येतं हे दाखवून देणारे फक्त माननीय बाळासाहेब ठाकरे होते आणि ते पहिले होते. त्यानंतर या सगळ्या गोष्टी सुरू झाल्या. शिवसेनाप्रमुखांनी हे दाखवलं तेव्हा भारतीय जनता पक्ष गांधीवादी, समाजवादात होता.
संजय राऊत – त्यांनी तर अनेकदा पळ काढलाय हिंदुत्वापासून… बाबरी असेल अन्य विषय असतील.
उद्धव ठाकरे – मला असं वाटतं की, आपण आता महापालिका निवडणुकीच्या निमित्ताने त्या विषयात जाण्यापेक्षा आता महापालिकेच्या क्षेत्रात राहणारे सर्वधर्मीय हे भाजपच्या या भ्रष्टाचाराला आणि त्यांच्या प्रदूषणाला कंटाळलेले आहेत. म्हणजेच हिंदूंनाही तेवढाच त्रास होतोय. हिंदूंना खड्डे लागताहेत… मुसलमानांनाही खड्डय़ात जावं लागतंय. मग त्यात धर्म कशाला आणता?
संजय राऊत – धर्म भारतीय जनता पक्ष आणतोय हे मी म्हणतोय…
राज ठाकरे – त्यांना काय, प्रचार करायला काय जातंय?
उद्धव ठाकरे – आणि म्हणूनच सगळ्यांनी मिळून आता भाजपला खड्डय़ात घातलं पाहिजे. मग यात हिंदू येऊ देत, मुस्लिम येऊ देत, ख्रिश्चनसुद्धा येऊ देत. जो जो महाराष्ट्रप्रेमी आहे, ज्याला आपली आणि आपल्या कुटुंबीयांची चिंता आहे, त्यांनी भाजपला नाकारलं पाहिजे.
संजय राऊत – तुम्ही महाराष्ट्र धर्माविषयी बोलताय…
उद्धव ठाकरे – हो!
संजय राऊत – तुम्ही दोघे एकत्र येण्याने मुंबईसह महाराष्ट्रामध्ये एक ऊर्जा निर्माण झाली. लोकांना आशेचा किरण दिसतोय की, आम्हाला नेतृत्व मिळालंय. आम्ही काहीतरी करू शकतो. एकत्र राहण्यासाठी एकत्र आलोय असे जे आपण म्हणताय तेही लोकांना आवडलंय की, आता हे सगळे एकत्र आहेत. एकत्र राहून महाराष्ट्राची सत्ता घेणार का?
उद्धव ठाकरे – महाराष्ट्राचीच कशाला? एकत्र राहून देशाची सत्ता आली तर तुम्हाला काय अडचण आहे? एक लक्षात घ्या, आम्ही एकत्र आलेलो आहोत ते मराठी माणसाच्या न्याय्य हक्कांसाठी… म्हणजे इतर भाषिकांवर अन्याय करण्यासाठी नव्हे. हिंदुत्वासाठी आलोय याचा अर्थ मुस्लिम किंवा ख्रिश्चनांवर अन्याय करण्यासाठी आलेलो नाही. मी पुनः पुन्हा सांगतो, मुंबईकरांनी मुंबई महापालिका 25 वर्षे आमच्या ताब्यात दिली त्या मुंबईकरांमध्ये मराठी तर आहेतच, पण मुस्लिम आहेत, ख्रिश्चन आहेत, काही प्रमाणात गुजरातीही आहेत, उत्तर भारतीयही आहेत आणि या सगळ्यांना आम्ही समान सुविधा दिल्या आहेत. जसं मघाशी शाळेचा विषय निघाला. आम्ही आठ ते नऊ भाषांत शाळा दिलेल्या आहेत. उर्दू शाळा पण आहेत आणि कोरोनात सर्व धर्मीयांवर आम्ही सारखे उपचार केले आहेत.
राज ठाकरे – मी एक साधी गोष्ट सांगतो. कसं आहे की, प्रत्येक राज्यातला हिंदू तसा वेगवेगळा आहे. कारण वेगवेगळ्या राज्यातलं कल्चर वेगळं आहे. तसा प्रत्येक राज्यातला मुसलमानदेखील वेगळा आहे. महाराष्ट्रामध्ये पिढय़ान्पिढय़ा आणि वर्षानुवर्षे राहणारा जो मुसलमान आहे तो मराठी मुसलमान आहे. मराठी भाषिक आहे. त्याच्यावरच आंदोलन झालं होतं त्यावेळी हज कमिटीच्या ऑफिससमोर.. 2009 किंवा 2010चं आंदोलन असेल ते. हज कमिटीवर यूपी, बिहार आणि तिकडच्या सर्व लोकांचं वर्चस्व होतं आणि महाराष्ट्रातल्या मराठी मुसलमानांना ते हजला जाऊ देत नव्हते. त्यावेळी माझ्या पक्षानं केलेलं आंदोलन आहे. महाराष्ट्रात असंख्य मुसलमान आहेत. आमचा सलीम मामा आहेच की, तो मराठी मुसलमान आहे.
उद्धव ठाकरे – काल एका माझ्या मुस्लिम उमेदवाराच्या ऑफिसमध्ये मी गेलो होतो.
राज ठाकरे – क्रिकेटर जहीर खान आहे. तो मराठीच आहे संगमनेरचा. जेव्हा आम्ही समोरासमोर येतो तेव्हा मराठीतच गप्पा मारतो.
उद्धव ठाकरे – साबीरभाई शेख होतेच ना.. बेहरामपाड्याचा हाजी हा आपला नगरसेवकच आहे. आपला आमदार हारून खान..
संजय राऊत – उद्धवजी आणि राजजी आपण धुरंधर नेते आहात. जे नवीन पर्व सुरू झाले आहे, एकत्र येण्याचं… आपल्या युतीचं… मराठी माणसाच्या एकजुटीचं यानिमित्ताने आपण महाराष्ट्राला काय आवाहन कराल?
उद्धव ठाकरे – मी महाराष्ट्राला आवाहन म्हणजे विनंती करेन की, आजपर्यंत आपण भाजपच्या नादी लागलो आणि आपलं आयुष्य त्यांनी बरबाद केलं. आता महाराष्ट्राने त्यांना दाखवून दिलं पाहिजे, जो देशाला दिशा दाखवणारा महाराष्ट्र आहे तो महाराष्ट्र आता दिसला पाहिजे. यांचं हिंदुत्व आणि यांचं देशप्रेम… खरं ते खरं आणि खोटं ते खोटं. एक लक्षात घ्या, देशभक्ती आणि भाजप भक्ती ही एक नाही. मी देशभक्त आहे याचा अर्थ मी भाजप भक्त नाही आणि जो भाजप किंवा मोदीभक्त आहे तो देशभक्त आहे असा त्याचा अर्थ होत नाही. देशभक्त हा वेगळा असतो… तो देशावर प्रेम करणारा असतो. तुम्ही सांगाल त्याला मी देशभक्त मानणार नाही. मी मोदीभक्त होऊ शकत नाही. मी भाजपभक्त होऊ शकत नाही. मी अस्सल मराठी बोलणारा हिंदू आहे, देशप्रेमी आहे हे महाराष्ट्राला मी दाखवलं पाहिजे.
राज ठाकरे – मला असं वाटतं की, या दळिद्री राजकारणाला बाजूला सारून महाराष्ट्राने एक वेगळी झेप घेणं गरजेचं आहे. नाहीतर देशाला दिशा दाखवणारा महाराष्ट्र हा यूपी, बिहारपेक्षा खाली जाईल आणि महाराष्ट्रातील जनतेने जागे रहावे एवढीच फक्त माझी इच्छा आहे.
महेश मांजरेकर – महाराष्ट्रात राहणारा, मग तो मुस्लिम असो, जैन असो वा मराठी, या सगळ्यांना महाराष्ट्रीय म्हणणे खूप गरजेचे आहे. त्यांच्यासाठी ही निवडणूक असली पाहिजे.
उद्धव ठाकरे – आम्ही म्हणतो ना त्यांना.
राज ठाकरे – मला असं वाटतं, महाराष्ट्रीय वगैरे म्हणण्यापेक्षा मराठी हाच खरा भाव आहे. कारण ते मराठीच आहेत.
महेश मांजरेकर – जे मुंबईत राहतात त्यांना माहिती आहे की, आता मुंबईची कपॅसिटी संपली आहे. इथले जैन सांगतील, साऊथ इंडियनही सांगतील… आणि इथले ख्रिश्चनही सांगतील.
राज ठाकरे – हो… पण जैन हे सांगतील तेव्हा बरं वाटेल.
उद्धव ठाकरे – माझं म्हणणं इतपंच आहे की, आता आपण सगळे गुण्यागोविंदाने नांदत आहोत. जेव्हा एखादं संकट येतं तेव्हा ते मराठी, हिंदी, जैन, गुजराती असं बघून येतं का? मी पुनः पुन्हा तेच सांगतो की, कोरोना आला… मुंबईत पाणी तुंबलं किंवा एखादा अपघात झाला… घातपात झाला… 1992 ची दंगल असेल, नंतर झालेले बॉम्बस्पह्ट असतील, नंतरचे अपघात असतील… शिवसैनिक धावून जातो, रक्तदान करतो… ते रक्त तो कोणाला जाणार आहे हे विचारून देत नाही. शिवसेना आणि मनसेच्या शाखांमध्ये अन्य भाषिकसुद्धा येतात ना? मुसलमानही येतात. माझ्या मुलाला अॅडमिशन पाहिजे, कुणाला हॉस्पिटलमध्ये अॅडमिट करायचे आहे. कुणाला रक्ताची गरज असते. रक्तदान करायला जेवढे शिवसैनिक आणि मनसे सैनिक उभे राहतात तेवढे हे राज्यकर्त्यांचे जे कोणी भक्त आहेत ते उभे राहतात का? त्यामुळे आम्ही हा एकोपा ठेवायला बघतो आहोत. त्यात मिठाचा खडा टाकण्याचे काम भाजप करतो आहे. तो मिठाचा खडा टाकणाऱयाला आता खडय़ासारखे बाजूला टाका असे आवाहन मी पुन्हा एकदा महाराष्ट्राला करीन.
राज ठाकरे – सगळय़ात महत्त्वाचं म्हणजे मुंबईवर कब्जा करण्यापेक्षा तुम्ही अहमदाबादची मुंबई करा ना… आम्हाला आनंद होईल. तुम्ही बडोद्याची मुंबई करा… तुम्ही सुरतची मुंबई करा… आम्हाला आनंदच होईल. हेल्दी कॉम्पिटिशन असू द्या ना.
उद्धव ठाकरे – आधी अहमदाबादचे नामांतर करा.
राज ठाकरे – मुंबई आणि हा भाग जो राजकारण म्हणून गुजरातला जोडण्याचा प्रयत्न सुरू आहे, त्यापेक्षा तुमच्या राज्याचा विकास करा ना. गौतम अदानींनी उद्योग करू नये इतका दळभद्री विचार आमचा नाही. उद्योगपती मोठे व्हावेतच… या देशामध्येच व्हावेत… पण मग गौतम अदानीने गुजरात मोठा करावा… तिकडच्या जागा द्याव्यात… तिकडे त्याला मोठं करावं.
संजय राऊत – देश खूप मोठा आहे आपला…
राज ठाकरे – देश खूप मोठा आहे. प्रॉब्लेम असा आहे की, तुमचा मुंबई, महाराष्ट्रातल्या सगळ्या गोष्टींवर डोळा आहे आणि ज्या प्रकारचे राजकारण भारतीय जनता पक्ष खेळतोय. दुर्दैवी आहे हे. खरं तर या गोष्टीची गरजच नाहीये, पण ते होतंय म्हणून आम्हाला बोलावं लागतंय आणि मग तुम्ही म्हणणार की, आम्ही निवडणुकीच्या तोंडावर बोलतोय… पण निवडणुकीच्या तोंडावर आम्ही बोलतच नाही. हा प्लॅन आहे आणि हा प्लॅन तुमच्यासमोर मांडणे गरजेचं आहे म्हणून आम्ही बोलतो.
संजय राऊत – उद्धव साहेब आणि राजसाहेब आपण आलात आणि मुंबई, महाराष्ट्र देशाच्या राजकारणावर दिलखुलासपणे बोललात. मराठी माणसाच्या एकजुटीवर बोललात. राजसाहेबांनी त्यांच्या दणदणीत शब्दांत भूमिका मांडली. उद्धवजींचा आवाज थोडासा बसला आहे…
उद्धव ठाकरे – माझा आवाज बसला आहे, पण विचार खणखणीत आहेत.
संजय राऊत – महेश मांजरेकर एक मुंबईकर म्हणून इथे बसले आणि एक कॉमन मॅन म्हणून त्यांनी त्यांच्या मनातले प्रश्न तुम्हाला विचारले.. त्यांचेही आभार… जय हिंद… जय महाराष्ट्र…!
– समाप्त –
भाजपा आणि मिंध्यांमध्ये नुरा कुस्ती चालली आहे. निवडणुकांनंतर ते एकत्रच दिसतील. शेवटी सत्ता आणि दिल्लीची भीती. मी आणि राज एकत्र आल्यामुळे ते मिंधेंना मुंबई-ठाण्यात मराठी मतं फोडण्यासाठी वापरत आहेत. म्हणून तर त्यांना शिवसेना आणि आमचं चिन्ह दिलंय! – उद्धव ठाकरे
आम्ही सातत्याने सांगतोय की मुंबईचा महापौर हा मराठीच होईल. भाजप काय म्हणतेय की मुंबईचा महापौर हा हिंदू होईल. म्हणजे याचा अर्थ भाजप मराठी माणसाला हिंदू समजत नाही का? मग देवेंद्र फडणवीस हिंदू आहेत की नाहीत? संयुक्त महाराष्ट्राच्या लढ्यात मराठी माणसांवर गोळ्या घालणारा माणूस मोरारजी देसाई हा हिंदू होता की नव्हता? – उद्धव ठाकरे
प्रदूषणाचा त्रास सर्वांनाच होतोय. त्यात आम्ही मराठी तर आहोतच, पण जे आदळलेले लोंढे आहेत, जे पिढय़ान्पिढय़ा इथे राहतात, त्यांचेही घसे बसले आहेत. त्यांनाही आजारपण भोगावं लागतंय आणि तरीसुद्धा ते लोक केवळ आमच्याविरोधात भाजपला मतदान करणार असतील तर त्यांनी हे लक्षात ठेवायला हवं की, त्यांना वाचवायला भाजपवाले येणार नाहीत. – उद्धव ठाकरे
मराठी म्हणून या गोष्टीचा विचार करावाच लागेल. मतभेद असतील… भांडणं असतील, जे काही असेल ते मिटवा. महाराष्ट्रापुढे काहीही नाही. भाजपातील लोक असतील किंवा त्यांच्या बरोबर इतर पक्षांचे जे कोणी सहकारी लोक असतील किंवा अजून कोणी असेल… प्रत्येकानं या गोष्टीचा विचार करणे गरजेचे आहे… नाहीतर महाराष्ट्र आपल्याला माफ करणार नाही. – राज ठाकरे
आता तेलंगणा आणि पंजाबमध्ये जिल्हा परिषदेच्या निवडणुका झाल्या. तिथे मतदान बॅलेट पेपरवर झालं. तेलंगणात भारतीय जनता पक्ष सातव्या नंबरवर गेला आणि पंजाबमध्ये चार नंबरवर गेला. हे बॅलेट पेपरवर सिद्ध झालंच ना. कर्नाटकातही तेच झाले. बॅलेट पेपरवर निकाल भाजपच्या बाजूने लागत नाहीत. – राज ठाकरे
मी महाराष्ट्राला आवाहन म्हणजे विनंती करेन की, आजपर्यंत आपण यांच्या नादी लागलो आणि आपलं आयुष्य यांनी बरबाद केलं. आता महाराष्ट्राने त्यांना दाखवून दिलं पाहिजे, जो देशाला दिशा दाखवणारा महाराष्ट्र आहे तो महाराष्ट्र आता दिसला पाहिजे. यांचं हिंदुत्व आणि यांचं देशप्रेम… खरं ते खरं आणि खोटं ते खोटं. एक लक्षात घ्या, देशभक्ती आणि भाजप भक्ती ही एक नाही. – उद्धव ठाकरे
कोरोनाच्या काळात मुंबईत किंवा महाराष्ट्रात आपण जेव्हा लोकांची काळजी घेत होतो तेव्हा गंगेमध्ये प्रेतं वाहत होती ती कोणाची होती? हिंदूंची होती, मुसलमानांची होती, ख्रिश्चनांची होती, कोणाची होती? गुजरातमध्ये सार्वजनिक चिता पेटल्या होत्या. ते का नाही सांगत ही लोपं? मुंबई मॉडेलमध्ये मला खरंच एका गोष्टीचं समाधान आहे की, चीनने पंधरा दिवसांत फील्ड हॉस्पिटल बांधलं. आपण मुंबईमध्ये 18 दिवसांत फील्ड हॉस्पिटल बांधून दाखवलं. किती तरी कामे आहेत… मी तर त्यावर पुस्तिकाच केली आहे. तुम्ही म्हणालात की या पुस्तिकेवर बंदी आणली आहे. पण ती बंदी मी मानत नाही. निवडणूक आयोगाला जे करायचं ते करू द्या. – उद्धव ठाकरे
लोकसभेच्या निवडणुकीत आपल्या गाण्यातले ‘जय भवानी’, ‘जय शिवाजी’ हे शब्द काढायला सांगितले. हिंदू हा तुझा धर्म… यावर आक्षेप घेतला आणि हे आम्हाला हिंदुत्व शिकवणार? – उद्धव ठाकरे
सोल्युशन एकच आहे ते म्हणजे समाज जागृत होणं गरजेचं आहे. ते चुकत असतील तर त्यांना माफ करू नका. आम्ही चुकत असू तर आम्हाला माफ करू नका. पण योग्य कोण, काम कोण करतंय त्याआधारे मतदान होणार आहे की नाही? आणि जर चुकीच्याच गोष्टी करणाऱया लोकांच्या मागे तुम्ही मतदान करत राहिलात तर समोरचे जे चुका करताहेत त्यांना कधीच कळणार नाही की, या आपल्या चुका आहेत म्हणून. – राज ठाकरे
अदानी आणि अंबानी यांच्यातील मोठा फरक बघायचा असेल तर तो हा आहे की, मोदी मोठे व्हायच्या आधीपासून अंबानी मोठे होते, पण अदानी हा मोदी मोठे झाल्यानंतरच मोठा झाला आहे. अदानीचा विस्तार हे मोदी मोठे झाल्यानंतरचाच आहे. मोदी ज्या वेळी गुजरातचे मुख्यमंत्री झाले त्याच वेळी अदानीला मुंद्रा पोर्ट मिळाला आणि मोदी पंतप्रधान झाल्यानंतर तर अदानीला अनेक गोष्टी मिळाल्या आहेत. – राज ठाकरे
मला नेहमी एक प्रश्न पडतो. भारतीय जनता पक्षाला मला हा प्रश्न विचारायचाय की, समजा तिथे भारतीय जनता पक्षाऐवजी काँग्रेसचे सरकार किंवा दुसऱ्या कुठल्या तरी पक्षाचं सरकार असतं आणि एखाद्या केंद्रात बसलेल्या सरकारने काँग्रेस किंवा इतर कोणत्याही पक्षाने जर एकाच उद्योगपतीवर मेहरबानी केली असती, तर भारतीय जनता पक्ष कशा प्रकारे रिअॅक्ट झाला असता? – राज ठाकरे






























































