नाशिकमध्ये आज उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे यांची संयुक्त सभा, तपोभूमीतून प्रचाराचा झंझावात

महाराष्ट्राच्या हितासाठी एकत्र येत विरोधकांना धडकी भरवणाऱ्या ठाकरे बंधूंच्या प्रचाराचा झंझावात आजपासून तपोभूमी नाशिकमधून सुरू होणार आहे. शिवसेना-मनसे युतीची पहिली संयुक्त प्रचार सभा शुक्रवारी नाशिकमध्ये होणार आहे. शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे व मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या तोफा धडाडणार असून या सभेकडे अवघ्या महाराष्ट्राचे लक्ष लागले आहे.

नाशिकच्या हुतात्मा अनंत कान्हेरे मैदानावर सायंकाळी 5 वाजता ही जाहीर सभा होणार आहे. सभेच्या पार्श्वभूमीवर शिवसैनिक, मनसैनिक व मित्रपक्षाच्या कार्यकर्त्यांमध्ये चैतन्याचे वातावरण असून सभेची जय्यत तयारी करण्यात आली आहे. शिवसेना नेते-खासदार संजय राऊत हेदेखील या सभेला उपस्थित राहणार आहेत. ही सभा मराठी माणसाच्या भक्कम एकजुटीचे दर्शन घडवणारी ठरणार आहे.

नेते, पदाधिकारी सज्ज शिवसेना नेते-खासदार अरविंद सावंत, उपनेते व उत्तर महाराष्ट्र समन्वयक रवींद्र मिर्लेकर हे मागील तीन दिवसांपासून सभेच्या तयारीवर लक्ष ठेवून आहेत. सर्व पदाधिकाऱ्यांना आवश्यक त्या सूचना करण्यात आल्या आहेत. खासदार राजाभाऊ वाजे, उपनेते दत्ता गायकवाड, जिल्हाप्रमुख डी. जी. सूर्यवंशी, माजी आमदार वसंत गीते, संपर्कप्रमुख जयंत दिंडे, महानगरप्रमुख प्रथमेश गीते यांच्यासह पदाधिकाऱ्यांनी सभेची जोरदार तयारी केली आहे.

उद्या छत्रपती संभाजीनगरात उद्धव ठाकरेंची जाहीर सभा

छत्रपती संभाजीनगर महापालिका निवडणुकीच्या प्रचारासाठी शनिवार, 10 जानेवारी रोजी उद्धव ठाकरे यांची जाहीर सभा होणार आहे. खडकेश्वर येथील ऐतिहासिक मराठवाडा सांस्कृतिक मंडळाच्या मैदानावर सायंकाळी सहा वाजता ही सभा होईल. सभेची जोरदार तयारी सुरू आहे.

स्थळ – हुतात्मा अनंत कान्हेरे मैदान

वेळ – सायंकाळी 6 वाजता