हे शेवटचे आव्हान आहे, मोडून काढावेच लागेल! उद्धव ठाकरे यांनी शिवसैनिकांना दिली हाक

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

‘‘जागरूक राहा… निवडणुकीच्या तयारीला लागा… आपल्याला ही मोठी संधी चालून आली आहे. हे आपल्या राजकीय आयुष्यातलं शेवटचं आव्हान आहे असे समजा. हे आव्हान मोडायचं म्हणजे मोडायचंच. हे आव्हान एकदा का मोडून काढलं की संपूर्ण देशात शिवसेनेला आव्हान देणारं कुणीही शिल्लक राहिलेलं नसेल… नड्डाही नसेल,’’ अशी साद शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी आज शिवसैनिकांना घातली.

मुंबईतील बिर्ला मातोश्री सभागृहात स्थानीय लोकाधिकार समिती महासंघाच्या वतीने मराठी भाषा दिनानिमित्त आयोजित विशेष कार्यक्रमात उद्धव ठाकरे बोलत होते. या वेळी उद्धव ठाकरे यांनी मिंधे गट आणि भाजपवर तोफ डागली.

देशात भाजपशिवाय दुसरा पक्ष राहणार नाही, असे भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जे.पी. नड्डा म्हणाले होते. त्याचा उद्धव ठाकरे यांनी पुन्हा एकदा समाचार घेतला. अहो, नड्डाजी निवडणुकीला सामोरे जा. बघा तुम्हीच शिल्लक राहणार नाही, एवढी आग तुम्ही आमच्या मनात भरलीय, असे आव्हानच उद्धव ठाकरे यांनी दिले. आता जी लढाई होणार आहे ती लोकन्यायालयातही होणार आहे. त्यासाठी आपण सर्वांनी तयार राहा, असे आवाहनही उद्धव ठाकरे यांनी केले.

आपलं काय होणार आणि काय होईल याची चिंता मला कधीच नव्हती. हे सगळे कट्टर शिवसैनिक आजही माझ्यासोबत आहेत. शिवसेनेची जी निष्ठsची परंपरा आहे त्यात कुठेही खंड पडलेला नाही, अशा शब्दांत उद्धव ठाकरे यांनी एकनिष्ठ शिवसैनिकांची पाठ थोपटली.

ज्याच्यावर संस्कार नसतात त्याला चोरीचा माल लागतो

मातृभाषा ही आईची भाषा असते. आई केवळ आपल्याला भाषा नाही शिकवत. त्यातून ती संस्कार शिकवते. बाकी काहीही चोरीला जाऊ शकतं, पण हे संस्कार चोरता येऊ शकत नाहीत. म्हणूनच ज्याच्यावरती संस्कार नसतात त्याला चोरीचा माल लागतो, अशी तोफ उद्धव ठाकरे यांनी डागली.

गद्दारांनी स्वतःच्या हातानेच कपाळावर लिहिलेय -‘मेरा पुरा खानदान चोर है’

दिवार चित्रपटात ‘मेरा बाप चोर है’ असे अमिताभ बच्चन यांच्या हातावर लिहिण्यात आले होते. त्याचा उल्लेख करत आताचे जे चोर आणि गद्दार आहेत ते स्वतःच्या हातानेच स्वतःच्या कपाळावर ‘मेरा पुरा खानदान चोर है’ लिहिताहेत असा टोलाही त्यांनी लगावला.

उद्धव ठाकरे यांनी या वेळी गद्दारांना बांडगुळाची उपमा दिली. ते म्हणाले की, ‘‘शिवसेनेची मुळं जमिनीत घट्ट रुजलेली आहेत. काहींना वाटेल की फुलं तोडली म्हणजे झाड मेलं. अजिबात नाही. काही वेळा बांडगुळे छाटावी लागतात आणि काही वेळा आपोआप गळून पडतात. अनेकदा बांडगूळ इतके वाढते की त्याला वाटते तोच वृक्ष झालाय. पण रस शोषणारी पाळेमुळे जमिनीत खोल रुजलेली असतात. फांद्यांवरची पाळेमुळे त्या फांद्या छाटल्यावर पडून जातात.’’

मोगँबोसारखा काळाबाजार चालणार नाही

शिवसेना म्हणजे केवळ धनुष्यबाण आणि नाव नाही तर धगधगते विचार म्हणजे शिवसेना! कारण हिंदुहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी जे आमच्या रगारगात, नसानसात पेरलेले आहे, जे आमच्या रक्तात भिनलेलं आहे ते तुम्ही कसे काढू शकणार? तुमच्यासारख्या मोगँबोच्या किती पिढय़ा उतरल्या तरी ते जमणार नाही, असा ठाम विश्वासही त्यांनी व्यक्त केला. मिस्टर इंडियातल्या मोगँबोसारखा कितीही काळाबाजार करा, किमती वाढवा, माणसे आपापसात लढवत रहा. पण खरा शत्रू कोणता हे आता सर्वांना माहीत आहे. मोगँबोसारखा काळाबाजार आता चालणार नाही. हे असले आमचे हिंदुत्व नाही, ‘मराठीपण’ नाही.

दूध का दूध, पानी का पानी आम्हीच करणार

सध्याच्या स्थितीत भगव्याने जर आत्मचरित्र लिहिले तरी कुठल्याकुठल्या दुःखातून, संकटातून, गद्दारीतून जावे लागले हेदेखील लिहील. मात्र हा भगवा आजही तळपतोय. तेच तेज घेऊन आपल्याला पुढे जायचे आहे. ही लढाई सोपी नाही. मोगँबो म्हणाला होता की, दूध का दूध पानी का पानी आम्ही करणार. पण आता दूध का दूध आणि पानी का पानी आम्हीच करणार आणि तुमचे गोमूत्र कसले आहे हेदेखील आम्हीच दाखवणार, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला.

धनुष्यबाण चोरणाऱयांना आता मी आव्हान देतो की, चोरलेले धनुष्यबाण घेऊन निवडणुकीच्या मैदानात या. मी आपली मशाल घेऊन मैदानात येतो. अनिल देसाईंनी चांगले चिन्ह दिले. धनुष्यबाणावरती मशाल! पण आता अन्याय जाळण्यासाठी बाणावर पलिता लावण्याची वेळ आली, असा टोलाही यावेळी उद्धव ठाकरे यांनी लगावला.

आजपासून सुरू झालेल्या अधिवेशनात राज्यपालांनी हिंदीतून भाषण केल्याबद्दल त्यांनी खंतही व्यक्त केली. किमान आज मराठी भाषा दिवस असल्यामुळे तरी मराठीतून भाषण करायला हवे होते असे ते म्हणाले.
यावेळी शिवसेना नेते सुभाष देसाई, खासदार अरविंद सावंत, स्थानीय लोकाधिकार समिती महासंघाचे अध्यक्ष शिवसेना सचिव खासदार अनिल देसाई यांचीही भाषणे झाली.

मराठी भाषा दिनाचा दिमाखदार कार्यक्रम

स्थानीय लोकाधिकार समिती महासंघाने आज कविश्रेष्ठ कुसुमाग्रज यांचा जन्मदिवस म्हणजेच मराठी भाषा दिवस मोठय़ा दिमाखात साजरा केला. न्यू मरीन लाइन्स येथील बिर्ला मातोश्री सभागृहात पार पडलेल्या या मरोठमोळ्या कार्यक्रमात जागर अभिजात मराठी भाषेचा झाला. मुक्ताबाई यांच्यापासून आजपर्यंतच्या सुप्रसिद्ध कविवर्य आणि गीतकारांच्या वेचक कविता, गीतांचा बहारदार कार्यक्रम झाला. नचिकेत देसाई, अपूर्वा पेंढारकर, विद्या करंदीकर यांनी मंत्रमुग्ध करणारी अनेक मराठी गाणी सादर केली. या कार्यक्रमाला ज्येष्ठ संगित संयोजक पंडित आप्पा वढावकर यांचे संगित संयोजन लाभले.

तर 2024 शेवटची निवडणूक ठरेल

शिवसेनेला मोठा पाठिंबा आहे. दिल्लीचे मुख्यमंत्री केजरीवाल येऊन गेले, नितीश कुमार, ममता बॅनर्जी यांचा पह्न येऊन गेला. ही एकजूट दाखवावी लागेल. जागरूक रहावे लागेल. आता आपले डोळे उघडले नाहीत तर 2024 शेवटची निवडणूक ठरेल, असा इशाराही उद्धव ठाकरे यांनी यावेळी दिला. न्यायालयात कपील सिब्बल म्हणाले, मी जिंकेन पिंवा हरेन, मात्र मी देशाची लोकशाही वाचवण्यासाठी उभा आहे. सर्वोच्च न्यायायलयत सुनावणी सुरू असल्याने मी जास्त बोलणार नाही. सध्या वृत्तपत्रांचे स्वातंत्र्य हिरावून घेतले जात आहे. पेंद्रीय कायदा मंत्री रीजीजूही म्हणाले, राज्यसभेचे अध्यक्षही बोलके, ज्यावरून पेंद्राला काहीही वेगळे स्वतंत्र ठेवायचे नाही, असेच दिसते. मात्र न्यायालयेही बुडाखाली घेतली तरी लोकशाही जिवंत कशी राहणार, असा सवाल त्यांनी केला. पण ‘तो’ निर्णय स्वतःच्या विरोधात जाऊ शकेल, पेंद्र सरकार थेट बोलू शकत नाही म्हणून आणि न्यायालयात रामशास्त्री बाण्याचे न्यायमूर्ती आहेत म्हणून पेंद्र सरकारला काय पाहिजे हे सांगण्यासाठी हा निर्णय आयोगाने दिला नसेल ना, अशी शंकाही उद्धव ठाकरे यांनी व्यक्त केली.

निवडणूक आयोग बोगस आहे. हा चुनाव आयोग नाही, चुना लावणारा आयोग आहे. आमचा त्यावरचा विश्वास उडाला आहे. सर्वोच्च न्यायालयात सुनावणी सुरू असताना निवडणूक आयोगाने असा निकाल देण्याचा चोंबडेपणा करण्याची गरज नव्हती.

मातृदेवो भवः, पितृदेवो भवः, गुरुदेवो भवः ही आपली संस्कृती आहे. स्वतःच्या आईवडिलांना अडगळीत टाकून दुसऱयाचे आईवडील चोरणाऱयांना काय म्हणायचे?

‘मराठी काका’ अनिल गोरे यांचा ज्ञानभाषा संवर्धन पुरस्काराने गौरव

मराठी भाषेच्या प्रचार, प्रसाराबरोबरच संवर्धनासाठी काम करणाऱयांना स्थानीय लोकाधिकार समिती महासंघाच्या वतीने ज्ञानभाषा संवर्धन पुरस्कार दिला जातो. त्यानुसार ‘मराठी काका’ अशी ओळख असलेल्या पुण्याच्या अनिल गोरे यांचा उद्धव ठाकरे यांच्या हस्ते ज्ञानभाषा संवर्धन पुरस्कार देऊन गौरव करण्यात आला. 50 हजार रुपये रोख रक्कम, ताम्रपट, सन्मानचिन्ह असे या पुरस्काराचे स्वरूप होते. यंदाचा हा पहिला पुरस्कार होता.

न्यायालयाचा निर्णय देशाच्या भविष्याचा असेल

सर्वोच्च न्यायालय ही शेवटची आशा आहे. हा निर्णय केवळ शिवसेनेच्याच नव्हे तर देशाच्या भविष्याचा असेल, असे उद्धव ठाकरे म्हणाले. ज्यांचा स्वातंत्र्यलढय़ाशी तीळमात्र संबंध नव्हता तेच लोक आज स्वातंत्र्य मारायला निघाले आहेत. त्यांनीच लोकशाहीला आदरांजली वाहायची वेळ आणली आहे, अशी तोफ उद्धव ठाकरे यांनी भाजपवर डागली.