
सामना ऑनलाईन । मुंबई
फायबर केबलच्या माध्यमातून रिलायन्स केबल सेवा मोफत सेवा देत असल्याने केबलचालकांवर बेकारीची कुर्हाड कोसळणार आहे या पार्श्वभूमीवर शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी केबलचालकांसोबत बैठक घेतली. केबल चालकांना न्याय देण्याचा निर्धार उद्धव ठाकरे यांनी व्यक्त केला. यावेळी बोलताना उद्धव ठाकरे यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावरही कडाडून टीका केली.
“ही मोफत सेवा म्हणजे एक सापळा आहे. यात माणूस फसत जातो आणि नंतर या सेवेची सवय लागल्यानंतर पैसे वाढवले जातात” असे उद्धव ठाकरे यावेळी म्हणाले. तसेच “जर इंटरनेट मोफत देत असाल तर रेशन आणि पेट्रोलही मोफत द्या. फुकट इंटरनेटमुळे पोट भरत नसून हे डिजिटल इंडिया काही उपयोगाचे नसल्याचे” त्यांनी सांगितले.
जियो फायबर आता केबल नेट व्यवसायात शिरकाव करणार आहे. या अन्यायकारक स्पर्धेत केबल चालकांच्या व्यवसावर परिणाम होणार असल्याने केबल चालकांनी शिवसेनेकडे धाव घेतली आहे. शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंनीही न्याय दिल्याशिवाय आपण स्वस्थ बसणार नाही अशी ग्वाही दिली. केंद्र सरकारने 2003 मध्ये कंडिशन अॅक्सेस सिस्टम (सीएएस)आणली होती. त्यामुळे देशातील केबल चालक उद्ध्वस्त होणार होता. तेव्हा हिंदुहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी केंद्र सरकारच्या धोरणाला विरोध करत सीएएस सिस्टम मागे घेण्यास भाग पाडले होते, अशी आठवणही त्यांनी यावेळी सांगितली.




























































