पाहा फोटो : उद्धव ठाकरे यांचा वाढदिवस उत्साहात आणि जल्लोषात

64

सामना ऑनलाईन । मुंबई

देशभरातील मान्यवरांनी उद्धव ठाकरे यांचे अभीष्टचिंतन केले. राजकारण, उद्योग, कला अशा विविध क्षेत्रांतील मान्यवरांनी प्रत्यक्ष भेटून तसेच दूरध्वनी व ट्विटरद्वारे उद्धव ठाकरे यांना शुभेच्छा दिल्या. ‘समाजसेवेसाठी दीर्घ आणि निरोगी आरोग्य तसेच आनंदी जीवन लाभो!’ अशा अनेक अनेक शुभेच्छा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासह काँग्रेसचे अध्यक्ष राहुल गांधी, पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासह अनेक मान्यवरांनी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांना वाढदिवसानिमित्त दिल्या. ‘ट्विटर’ या सोशल नेटवर्किंग साईटवर या मान्यवरांनी आपल्या शुभेच्छा पोस्ट केल्या आहेत. केंद्रीय वाहतूकमंत्री नितीन गडकरी, उद्योगमंत्री सुरेश प्रभू, महानायक अमिताभ बच्चन, ज्येष्ठ गीतकार जावेद अख्तर, ज्येष्ठ अभिनेते विक्रम गोखले, उद्योगपती मुकेश अंबानी, अनिल अंबानी, ‘कालनिर्णय’चे जयराज साळगावकर यांनी उद्धव ठाकरे यांना दूरध्वनीवरून शुभेच्छा दिल्या. तर शिक्षणमहर्षी डॉ. डी. वाय. पाटील, सारस्वत बँकेचे अध्यक्ष गौतम ठाकूर, भाजप आमदार सरदार तारासिंग यांनी ‘मातोश्री’ निवासस्थानी भेट देऊन उद्धव ठाकरे यांना शुभेच्छा दिल्या.

 शिवसैनिकांची  अनोखी भेट

विठ्ठलमूर्ती, गणेशमूर्ती, साईबाबांच्या मूर्ती, छत्रपती शिवरायांच्या तसबिरी, शिवसेनाप्रमुखांच्या तसबिरी, विधान भवनाचे चित्र असलेला ५७ किलो वजनाचा केक, डरकाळी फोडणारा वाघ आणि धनुष्यबाणाचे चित्र असलेली शाल, तुळशी वृंदावन, ढाल-तलवार, अश्वारूढ शिवरायांची मूर्ती, अयोध्येच्या पार्श्वभूमीवरील प्रभू रामचंद्रांची प्रतिमा अशा विविध अनोख्या भेटी शिवसैनिकांनी उद्धव ठाकरे यांना वाढदिवसानिमित्त भेट दिल्या. चाफ्याचे हार, तुळशीहार तसेच शाली घालूनही उद्धव ठाकरे यांच्याबद्दल आदर व्यक्त केला गेला.

आपली प्रतिक्रिया द्या