
राज्यभरातील छत्रपती शिवाजी महाराजप्रेमी, महाराष्ट्रप्रेमी हे एकत्र येणं गरजेचं असून त्याची सुरुवात झाली असल्याचे शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव बाळासाहेब ठाकरे यांनी म्हटले आहे. ठाकरे यांनी छत्रपती शिवाजी महाराजांचा अपमान करणाऱ्यांविरोधात खासदार उदयनराजे भोसले यांनी घेतलेल्या भूमिकेबद्दल धन्यवाद दिले. मुंबईमध्ये आयोजित एका पत्रकार परिषदेत बोलताना उद्धव ठाकरे म्हणाले की,’आताच्या महाराष्ट्रातील गद्दारीची तुलना छत्रपतींच्या आग्र्याहून सुटकेशी केली जात असेल आणि ते जर मंत्री राहात असतील तर मग महाराष्ट्राला महाराष्ट्र काय आहे हे दाखवण्याची वेळ आलेली आहे. लवकरच आम्ही ते दाखवल्याशिवाय राहणार नाही.’
शिवसेनापक्षप्रमुख उद्धव ठाकरे म्हणाले की ,’चांगलं सांगून राज्यपाल जात असतील तर ठीक आहे असं म्हणून आम्ही अवधी दिला होता. दिलेल्या अवधीत त्यांच्यात सुधारणा नाही झाली तर मग आम्हाला आमच्या मार्गाने त्याचा निषेध करावा लागेल, लवकरच आम्ही कार्यक्रम जाहीर करू.’ बंजारा समाजाचे नेते अनिल राठोड यांनी शनिवारी शिवसेनेत प्रवेश केला. त्यानिमित्ताने आयोजित पत्रकार परिषदेत उद्धव ठाकरे बोलत होते.
उद्धव ठाकरे म्हणाले की ‘राज्यपाल हे राष्ट्रपतींचे प्रतिनिधी, दूत असतात. जशी सर्वोच्च न्यायालयात केस सुरू आहे, निवडणूक आयुक्तांच्या नेमणुकीबाबत प्रश्नचिन्ह निर्माण केलं गेलं आहे; तसंच मला वाटतं की राज्यपालांची नियुक्ती ही कोणत्या आधारावर केली जावी याचेही निकष ठरवले गेले पाहिजे. त्या दर्जाची लोकं पाहिजेत. सर्व पक्षांमध्ये चर्चा सुरू आहे. जे महाराष्ट्र प्रेमी आहे, शिवछत्रपतीप्रेमी आहेत त्यांनी एकत्र आलं पाहिजे.’
महाराष्ट्र-कर्नाटक सीमावादाबाबत बोलताना ठाकरे म्हणाले की, टआजच पेपरला बातमी वाचली की कर्नाटकने महाराष्ट्रातील मंत्र्यांना यायला मज्जाव केला आहे. आपल्या सरकारकडून आणि मुख्यमंत्र्यांकडून याबाबत साधार ब्र देखील काढण्यात आलेला नाही. कर्नाटकचा मुख्यमंत्री आक्रमक होत असतील तर महाराष्ट्राचा मुख्यमंत्री गुवाहाटीला बेळगावसाठी नवस करायला का जात नाही. सगळ्या मंत्री-आमदारांना घेऊन गुवाहाटीला चला बेळगाव महाराष्ट्रात आलंच पाहिजे म्हणून नवस करा. असं जर बेळगाव पदरात पडत असेल तर सगळे प्रश्न नवसानेच सोडवा. कर्नाटकाने आपल्या तलावात पाणी सोडलंय आणि इथलं सरकार सत्तेच्या पाण्यात गटांगळ्या खातंय. या नेभळटपणाविरोधात सगळ्यांनी उभे राहिले पाहिजे.’

































































