
शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांचा देदीप्यमान शपथविधी सोहळा शिस्तबद्ध पार पडावा यासाठी पोलिसांनी नागरिकांना वाहन तसेच सुरक्षा व्यवस्थेबाबत सूचना केल्या आहेत.

नागरिकांना गेट क्र. 5, स्व. माँसाहेब सौ. मीनाताई ठाकरे स्मारक गेट, गेट क्र. 4(अ), शिवाजी पार्क जिमखाना टेनिस कोर्ट गेट, गेट क्र. 5(अ), शिवाजी पार्क खुली व्यायामशाळा गेट येथून प्रवेश देण्यात येईल. नागरिकांना कार्यक्रमस्थळी अथवा आजूबाजूला कोणतीही संशयास्पद व्यक्ती अथवा वस्तू आढळल्यास त्याबाबतची माहिती पोलिसांना द्यावी, अशा विविध सूचना पोलिसांनी केल्या आहेत. तसेच स्वातंत्र्यवीर सावरकर मार्ग (सिद्धिविनायक मंदिर जंक्शन ते कापड बाजार जंक्शन), राजा बढे चौक जंक्शन ते केळूसकर मार्ग उत्तर जंक्शनपर्यंत, ले. दिलीप गुप्ते मार्ग, पांडुरंग नाईक मार्ग जंक्शन येथून दक्षिण वाहिनी, गडकरी चौक येथून केळूसकर रोड दक्षिण व उत्तर, दादासाहेब रेगे मार्ग, सेनापती बापट पुतळा येथून गडकरी जंक्शनपर्यंत, बाळ गोविंददास मार्ग, पद्माबाई ठक्कर मार्ग जंक्शन सेनापती बापट रोडपासून पश्चिम दिशेला एल.जे. मार्गापर्यंत वाहनांना प्रवेश करण्यास बंदी घालण्यात आली आहे.

पार्किंग व्यवस्था
पश्चिम आणि उत्तर उपनगरांतून येणाऱ्या बसेससाठी कामगार मैदान-सेनापती बापट मार्ग व लोढा पे ऍण्ड पार्क येथे व्यवस्था. हलकी वाहने सेनापती बापट मार्ग येथील इंडिया बुल्स सेंटर, इंडिया बुल्स फायनान्स सेंटर व वर्ल्ड टॉवर पे ऍण्ड पार्क येथे पार्क करू शकतात. ठाणे, नवी मुंबईतून येणारी वाहने वडाळ्यातील आरएके मार्ग आणि माटुंगा येथील पाच गार्डन येथे पार्क करावीत.वीर सावरकर रोडने दक्षिण मुंबईकडून येणारी वाहने इंडिया बुल्स फायनान्स सेंटर, लोढा पे ऍण्ड पार्क, सयानी रोड येथे पार्क करावीत.

























































