नागरिकत्व कायदा सावरकरांच्या तत्त्वांविरोधात! मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचा भाजपवर घणाघात

1313

स्वातंत्र्यवीर सावरकरांबद्दल आम्हालाही निश्चित आदर आहे आणि शिवसेनेच्या भूमिकेत कदापि बदल होणार नाही. मात्र आमच्या विरोधकांना फक्त भांडणे लावायची आहेत. जर त्यांना सावरकरांबद्दल इतकाच आदर वाटत असेल तर त्यांनी सावरकरांच्या स्वप्नातील सिंधू ते सिंधुसागर असा एक देश घडवायला हवा होता. मात्र तसे न करता आधीच विभक्त झालेल्या देशाच्या भागातून तिथले हिंदू नागरिक आपल्या देशात ते आणून ठेवत आहेत. नागरिकत्व कायदा हा सावरकरांच्या तत्त्वाविरोधी आहे, असा घणाघात मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी रविवारी भाजपवर केला.

विधिमंडळाच्या हिवाळी अधिवेशनाच्या पूर्वसंध्येला नागपुरात पत्रकारांशी बोलताना मुख्यमंत्री उद्धव ठाकरे म्हणाले की, शेजारच्या देशांतील हिंदूंबद्दल आमच्या विरोधकांना इतकीच काळजी होती तर आमच्या पंतप्रधानांनी त्या देशांच्या प्रमुखांना ठणकवायला हवे होते आणि आपल्या हिंदू बांधवांना तिथेच राहून संरक्षण कसे मिळेल याची व्यवस्था करायला हवी होती. मात्र तसे न करता त्यांनी तिथल्या हिंदूंनाच इथे आणून ठेवले आहे अशी टीका त्यांनी केली.

नागरिकत्वविरोधी कायदा महाराष्ट्रात लागू करणार काय असे विचारले असता सर्वप्रथम तो कायदा घटनात्मक आहे की घटनाबाह्य हे तर न्यायालयाला ठरवू द्या ना असे मुख्यमंत्री म्हणाले. या विधेयकावरील चर्चेत आम्ही ज्या शंका उपस्थित केल्या होत्या त्यातील एकाही शंकेला केंद्रीय गृहमंत्र्यांनी उत्तर दिले नाही याकडे त्यांनी लक्ष वेधले.

देशापुढे अनेक गंभीर प्रश्न आहेत. महिलांवरील अत्याचार, शेतकऱयांचे प्रश्न आहेत, रोजगाराचा प्रश्न आहे. हे सर्व बाजूला ठेवून जनतेचं लक्ष
विचलित केलं जातंय हे दुर्दैवी आहे.

शिवस्मारकाच्या कामात भ्रष्टाचार असेल तर कारवाई करणार!
छत्रपती शिवाजी महाराज स्मारकाविषयी कॅगने ठेवलेल्या ठपक्याबाबत बोलताना मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी रोखठोक भूमिका मांडली. मुख्यमंत्री म्हणाले, आमच्याकडेही तक्रारी आलेल्या आहेत. सरकार म्हणून आम्ही त्याची माहिती घेणार आणि यात जो कोणी गुन्हेगार किंवा दोषी असेल, जर भ्रष्टाचार झाला असेल तर कारवाई करणार असे सांगतानाच यात जर काही काळंबेरं असेल तर ते दूर करून संपूर्ण देशाला अभिमान वाटेल असं स्मारक उभारणार, अशी ग्वाहीही उद्धव ठाकरे यांनी दिली.

उपराजधानीत जंगी स्वागत
मुख्यमंत्री या नात्याने शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांचे आज नागपुरात प्रथमच आगमन झाले. मुख्यमंत्र्यांचे दुपारी डॉ. बाबासाहेब आंबेडकर विमानतळावर आगमन होताच महाविकास आघाडीतर्फे जंगी स्वागत करण्यात आले. ढोलताशांचा एकच गजर झाला, तिन्ही पक्षांच्या कार्यकर्त्यांनी जल्लोष केला. ‘कोण आला रे कोण आला, शिवसेनेचा वाघ आला…’, ‘जय भवानी, जय शिवाजी’च्या घोषणांनी विमानतळ परिसर दुमदुमून गेला.

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या स्वागताची जोरदार तयारी करण्यात आली होती. विमानतळ परिसरातच एक व्यासपीठ उभारण्यात आले होते. विमानतळ परिसरात शिवसेना, काँग्रेस आणि राष्ट्रवादी या तिन्ही पक्षांचे झेंडे डौलाने फडकत होते. कार्यकर्त्यांचे मोहोळ स्वागतासाठी उत्सुक होते, तर नेत्यांचीही गर्दी होती.

शहरभर स्वागताचे फलक
मुख्यमंत्र्यांचे स्वागताचे फलक अवघ्या नागपूर शहरात झळकत होते. जागोजागी स्वागताच्या कमानी लावण्यात आल्या होत्या. नागपुरात उत्साहाचेच वातावरण पाहायला मिळत होते. शहरातील प्रमुख चौकांमध्ये, विधान भवनाच्या दिशेने जाणाऱ्या मुख्य मार्गांवर मोठमोठे बॅनर्स, फ्लेक्स लावण्यात आले होते.

हे सरकार जनतेचे; 50 वर्षे चालवू! मुख्यमंत्र्यांचा विश्वास
हे सरकार आमचे नसून जनतेचे आहे. आम्ही सर्व एकदिलाने एकत्र आलो आहोत. त्यामुळे हे सरकार पाच वर्षेच काय, तर पुढील 50 वर्षे चालवू, असा जबरदस्त विश्वास मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी व्यक्त केला. मी नागपुरात पाऊल ठेवताच पावसाचेही आगमन झाले. हे शुभचिन्ह असते. मात्र वरुणराजाला प्रार्थना करतो की, आता निसर्गाचे फटके महाराष्ट्राला देऊ नकोस. महाराष्ट्रासह संपूर्ण देशाला एक वेगळी दिशा दाखवत असताना हे निसर्गराजा तुझी मला साथ पाहिजे, आशीर्वाद पाहिजे, असेही मुख्यमंत्री म्हणाले.

माझी मुख्यमंत्रीपदाच्या वाटचालीची सुरुवात उपराजधानीतून होतेय. उद्यापासून अधिवेशन सुरू होत आहे. मला प्रशासकीय कामकाजाचा अनुभव नाही हे खरे असले तरी माझ्या मायबाप जनताजनार्दनाचे आशीर्वाद ठामपणे पाठीशी आणि खंबीरपणे सोबत आहेत असे सांगून उद्धव ठाकरे म्हणाले, हा संपूर्ण महाराष्ट्र एक आहे आणि या आपल्या महाराष्ट्राचा अवघ्या देशाला अभिमान वाटेल असे सरकार आम्ही चालवू.

यावेळी शिवसेना नेते-युवासेना प्रमुख-आमदार आदित्य ठाकरे, उद्योगमंत्री सुभाष देसाई, विदर्भ संपर्कप्रमुख खासदार गजानन कीर्तिकर, आदिवासी विकासमंत्री नितीन राऊत, खासदार भावना गवळी, माजी खासदार गेव्ह आवारी, माजी खासदार आनंदराव अडसूळ, माजी मंत्री डॉ. दीपक सावंत, माजी खासदार प्रकाश जाधव, माजी मंत्री अशोक शिंदे, रामटेकचे आमदार आशीष जयस्वाल, माजी आमदार आशीष देशमुख, राकाँचे नेते, माजी मंत्री रमेश बंग, माजी मंत्री दिवाकर रावते, शिवसेनेचे प्रतोद सुनील प्रभू, माजी मंत्री व काँग्रेसचे ज्येष्ठ नेते सतीश चतुर्वेदी, माजी उपमहापौर शेखर सावरबांधे, माजी उपमहापौर किशोर कुमेरिया, नागपूर जिल्हा संपर्कप्रमुख सुधीर सूर्यवंशी, अरविंद नेरकर, दुष्यंत चतुर्वेदी आदी उपस्थित होते.

माझ्या कारकीर्दीला तुमचे आशीर्वाद द्या!
जे कोणी स्वतःला राज्यकर्ते समजत होते त्यांचे गैरसमज जनतेने मोडून काढले आहेत. कारण या महाराष्ट्राचा खरा राजा जो आहे गावात, खेडय़ापाडय़ात आणि माझ्यासमोर बसला आहे. मुख्यमंत्री, मंत्रिमंडळ आहेच, पण ते तुमच्या सेवेसाठी. गेल्या अनेक वर्षांचा जो अनुभव आहे तो पूर्ण अनुभव पणाला लावून गोरगरीब जनतेला समाधान दिल्याशिवाय राहणार नाही, असेही मुख्यमंत्री उद्धव ठाकरे म्हणाले.

आपली प्रतिक्रिया द्या