
मुख्यमंत्री पद माझ्यासाठी गौण आहे. ‘वर्षा’ निवासस्थान सोडले असले तरी जिद्द सोडलेली नाही, असे ठणकावून सांगतानाच शिवसेना पक्षप्रमुख व राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी ‘सज्ज व्हा! आपल्यासोबत कोणीही नाही असे समजून शिवसेना उभी करूया!’ असे आवाहन आज तमाम शिवसैनिकांना केले. शिवसेना जिल्हाप्रमुख आणि माजी नगरसेवकांची बैठक आज दादर येथील शिवसेना भवनात झाली. त्या बैठकीला उद्धव ठाकरे यांनी ऑनलाईन संबोधित केले. कोणती व्यक्ती कोणत्या वेळी आपल्याशी कशी वागली हे लक्षात ठेवा. ठाकरे आणि शिवसेना ही नावे न वापरता जगून दाखवा, असे आव्हान उद्धव ठाकरे यांनी या वेळी बंडखोरांना दिले.
त्या दिवशी आपण मनातले सर्व सांगितले होते, आज मन मोकळं करणार आहे असे सांगत उद्धव ठाकरे यांनी शिवसैनिकांशी संवाद सुरू केला. काही झालं तरी शिवसेना सोडणार नाही असे म्हणणारेही सोडून गेले. अशा लोकांचे करायचे काय, असा सवाल त्यांनी केला. केवळ आमदार, मंत्र्यांनाच नव्हे तर पक्षाची कामे करण्यासाठी जिल्हाप्रमुखांनाही पुरेसा निधी द्या, अशा सूचना आपण संबंधितांना दिल्या होत्या, असे त्यांनी या वेळी स्पष्ट केले.
हवे तितके आमदार घेऊन जा, माझा शिवसैनिक माझ्यासोबत आहे!
बंडखोरांना बजावताना उद्धव ठाकरे म्हणाले की, ‘‘आमदार न्यायचेत. तुम्हाला हवेत तेवढे आमदार घेऊन जा. तुम्ही झाडाची फुलं, फळं तोडू शकता. पण झाडाची मुळे घेऊन जाऊ शकत नाही. कारण ही मुळे शिवसेनाप्रमुखांनी घट्ट रुजवलेली आहेत आणि ती माझ्यासोबत आहेत. ‘वर्षा’ सोडताना मला काहीच वाईट वाटले नाही. कारण ते माझे नव्हतेच. जे माझे नव्हते ते गेले. त्याचे मला काहीच वाईट वाटत नाही. माझे शिवसैनिक माझ्यासोबत आहेत, अशा भावना उद्धव ठाकरे यांनी व्यक्त केल्या. शिवसेनेमुळे अनेक मोठे झाले. आता त्यांची स्वप्ने मोठी झाली आहेत. पण ती मी पूर्ण करू शकत नाही. त्यांची स्वप्ने पूर्ण करण्यासाठी शिवसेनाप्रमुखांनी माझ्यावर ही जबाबदारी दिलेली नाही, शिवसैनिकांच्या स्वप्नांसाठी ही जबाबदारी दिली आहे,’’ असे उद्धव ठाकरे म्हणाले.
शिवसेनेशी लढण्याची धमक नाही म्हणून माणसे फोडताहेत
शिवसेनेची माणसे फोडणाऱया भाजपाचाही या वेळी उद्धव ठाकरे यांनी समाचार घेतला. ‘‘भाजपाची शिवसेनेशी लढण्याची धमक नाही. म्हणून आपली माणसे फोडायची आणि आपल्यावर सोडायची अशी त्यांची रीत झाली आहे. म्हणजे तुम्ही लढत रहा आणि आम्ही मोकाटपणे चरत राहू, असे भाडोत्री घ्यायचे आणि आपसात मारामाऱया लावायच्या. काय परिणाम झाले तर त्या भाडोत्रींना भोगावे लागतात. भाजपच्या मूळ गाभ्याला काहीच होत नाही,’’ असे उद्धव ठाकरे म्हणाले.
तुमच्या डोक्यावर ‘वीट’ हाणल्याशिवाय राहणार नाही
‘‘प्रत्येक वेळी आपण त्यांना महत्त्वाची खाती दिली. जे नेहमी मुख्यमंत्र्यांकडे असते ते नगरविकास खातेही त्यांना दिले. साधी खाती माझ्याकडे ठेवली. त्यानंतरही आरोप-प्रत्यारोप होत आहेत. या सर्वांचा आता मला वीट आला आहे. पण ही वीट अशा लोकांच्या डोक्यावर हाणल्याशिवाय राहणार नाही,’’ असा इशाराही उद्धव ठाकरे यांनी एकनाथ शिंदे यांचा नामोल्लेख न करता या वेळी दिला. ‘‘आधी बाळासाहेबांना विठ्ठल म्हणायचे आणि मला बडवा म्हणायचे. आता त्यांच्यासाठी आदित्य बडवा झालाय. म्हणजे स्वतःचा मुलगा खासदार आणि माझ्या मुलाने काहीच करायचं नाही का? मी कुठे शिवसैनिकांच्या मुलांना अडवतोय?’’ असा सवाल उद्धव ठाकरे यांनी केला.
विष्ठा निघून जाऊ द्या, निष्ठावंत माझ्यासोबतच राहतील!
‘‘अनेकदा आपल्या माथी पराभव आलेत पण शिवसेना कधीच खचून गेली नाही. हार-जीत ही मनावर अवलंबून असते. कारण मन खंबीर असले तर उद्याची निवडणूक जिंकण्याची जिद्द देऊ शकते,’’ असे सांगतानाच उद्धव ठाकरे यांनी या वेळी शिवसेनेचे पहिले आमदार प्रिन्सिपल वामनराव महाडिक यांच्या वक्तव्याचा दाखला दिला. ‘बुडते ती निष्ठा आणि तरंगते ती विष्ठा’ असे वामनराव म्हणायचे. ही विष्ठा त्यांच्यासोबत तरंगतेय, ती विष्ठा तरंगत-तरंगत जाऊ द्या, निष्ठावंत कायम माझ्यासोबत राहतील,’’ असा टोला उद्धव ठाकरे यांनी बंडखोरांना लगावला.
पुन्हा भाजपसोबत जायला मी षंढ नाही!
भाजपसोबत जाण्यासाठी आमदारांचा आपल्यावर दबाव असल्याचा दावा एकनाथ शिंदे यांनी काही दिवसांपूर्वी खासगीत केला होता. त्यासंदर्भात बोलताना उद्धव ठाकरे म्हणाले की, ‘‘ज्या भाजपाने आपल्या कुटुंबियांवर घाणेरडय़ा शब्दांत आरोप केले त्यांच्यासोबत जायचे? माझ्या कुटुंबियांवर, मातोश्रीवर आरोप करणाऱयांच्या पुन्हा मांडीला मांडी लावून बसू? आणि माझ्या बाजूला कोण तो तोतला बसणार? अजिबात नाही. त्यापेक्षा मी जनतेसोबत जाईन. मी शांत आहे, पण षंढ नाही,’’ असे उद्धव ठाकरे यांनी ठामपणे सांगितले.
आमदार फोडाल, पण त्यांना निवडून दिलेल्या शिवसैनिकांना नाही! उद्धव ठाकरे यांनी भाजपाला ठणकावले
‘दाखवले असे जातेय की शिवसेना राहिलीच नाही पण शिवसेना ही संपणारी नाही, ती मर्दांची सेना आहे. पात्रता नसतांनाही ज्यांना आपण जागा दिली, निवडून आणले ते सोडून गेले आणि तुम्ही कायम सोबत आहात.’ अशा शब्दांत उद्धव ठाकरे यांनी सर्व माजी नगरसेवकांबद्दल कृतज्ञता व्यक्त केली. ‘मला एकटे पाडण्याचा भाजपचा डाव आहे. पण तुम्ही निवडून आलेल्यांना घेऊन जाऊ शकता, फोडू शकता, पण ज्यांनी निकडून दिलं त्या शिवसैनिकांना फोडू शकत नाही.’ असे त्यांनी भाजपला ठणकावून सांगितले.
महाविकास आघाडी बनवताना शिवसेना विष प्राशन करतेय असे म्हटले जात होते. काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस पाठीत खंजीर खुपसतील असेही म्हटले जात होते. पण आज शरद पवार आणि सोनियाजी पाठीशी उभ्या राहिल्या आहेत आणि जवळचे सोडून गेले आहेत, अशी खंतही उद्धव ठाकरे यांनी यावेळी व्यक्त केली.
आम्ही हिंदुत्व सोडलेलं नाही
‘शिवसेना हिंदुत्वापासून दूर गेली असे म्हणणाऱया भाजपने कश्मीरात मेहबूबा मुफ्तीबरोबर सरकार स्थापन केले. नितीश कुमारांसोबत युती केली. त्या नितीश कुमारांना विचारा, ते हिंदुत्ववादी आहेत का?’ असा सवाल उद्धव ठाकरे यांनी केला. ‘देशाच्या राजकारणात भाजपचे हिंदुत्व अस्पृश्य होते तेव्हा शिवसेनेने त्यांना सोबत घेतले. आपला हात धरून ते पुढे आले. त्यावेळी हिंदुत्वाच्या मुद्दय़ावर आपण भाजपला हाक दिली, त्याचीच फळे आज भोगतोय.’ अशा शब्दांत उद्धव ठाकरे यांनी भाजपवर टीका केली.
राज्यभरात सभा घेणार
शिवसैनिकांच्या साथीने आपण पुन्हा राज्यभरात सभा घेणार आहोत असे उद्धव ठाकरे यावेळी म्हणाले. ‘जी पदं भोगलीत, जे तुम्हाला स्कातंत्र्य दिलं. भाजपमध्ये जाऊन जर तुम्हाला ते मिळत असेल तर जा. तिकडे जाऊन मुख्यमंत्री होत असाल तर बिनधास्त जा. तिथे जाऊन उपमुख्यमंत्री क्हायचं असेल तर मला आधीच सांगायचं मी केलं असतं इथे. मी या सगळ्यामागे आहे सांगतात, मी एकढा षंढ नाही, मी मागून कार करणारा नाही.’
सावध रहा, हा भाजपचा डाव!
‘‘आमदारांनंतर आता जिल्हाप्रमुख, विभागप्रमुख, माजी नगरसेवकांना फोन येऊ लागले आहेत. दमदाटय़ा होताहेत. ठाण्यातील पदाधिकाऱयांना तर आम्हाला उद्धव ठाकरेंनी सांगितलेय असे सांगून त्यांना बंडखोरांसोबत जायला सांगितले जात आहे. परंतु असे काही नाही. हा उघडउघड भाजपचा डाव आहे. आता त्यांच्या कैदेतील आमदारांची सुटका कशी करायची ते बघायला हवे. जोपर्यंत कुणी माझ्यासमोर येत नाही तोपर्यंत मी विश्वास ठेवायला तयार नाही,’’ असेही उद्धव ठाकरे म्हणाले.























































