नोटाबंदी क्षणात होते, मग राम मंदिर का नाही? उद्धव ठाकरे यांची सणसणीत टीका

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

आधी विकासाचा मुद्दा; आता पुन्हा स्वप्न दाखवत आहेत

सामना ऑनलाईन, पुणे

“राम मंदिर उभारणीला निवडणुकीपूर्वी सुरुवात करू, असे भाजपचे लोक म्हणत आहेत. पण कोणत्या निवडणुकीपूर्वी, २०१९ की २०५० हे ते सांगत नाहीत. नोटाबंदी एका क्षणात केली. त्याप्रमाणे राम मंदिर उभारणीचा निर्णयही एका क्षणात घेऊ शकता. तुमच्याकडे बहुमत आहे. मग राम मंदिर का होत नाही?”, अशी सणसणीत टीका शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी भाजपवर केली. दरम्यान, आधी दाखविलेला विकासाचा मुद्दा बाजूला पडला असून, आता जनतेला स्वप्न दाखविण्याचे काम सुरू आहे. जनतेच्या भावनांशी खेळण्याचा हा प्रकार आहे, असेही उद्धव ठाकरे यांनी स्पष्ट केले.

शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी आज पुण्यात पश्चिम महाराष्ट्रातील लोकसभा मतदारसंघनिहाय आढावा बैठका घेतल्या. त्यानंतर आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते. शिवसेना नेते, खासदार संजय राऊत, शिवसेना नेते, खासदार गजानन कीर्तिकर, शिवसेना सचिव मिलिंद नार्वेकर, दगडूदादा सकपाळ, शिवसेना उपनेते रघुनाथ कुचिक, नितीन बानुगडे-पाटील, शिवसेना उपनेत्या, आमदार डॉ. नीलम गोर्‍हे, खासदार श्रीरंग बारणे, नाशिकचे सहसंपर्कप्रमुख भाऊ चौधरी, पुण्याचे सहसंपर्कप्रमुख बाळा कदम आदी यावेळी उपस्थित होते.

उद्धव ठाकरे म्हणाले, “राम मंदिर, समान नागरी कायदा,  कश्मीरमधील ३७० कलम काढणे, हे सर्व केव्हाच व्हायला हवे होते. मात्र, यातील काहीही झाले नाही. भाजपने आता राम मंदिराचे काम सुरू करणार असा प्रचार सुरू केला आहे. भाजपच्या एकूण कारभाराकरून वाटतंय की, ते स्वप्न दाखवत आहेत. आधी विकासाचा मुद्दा पुढे केला, आता विकासाचा मुद्दा बाजूला पडला असून, राम मंदिराचे स्वप्न पुढे येत आहे.

जनतेच्या अपेक्षा पूर्ण करू शकतील अशा उमेदवारांना जनता आशीर्वाद देत असते. काही वेळेला जनतेची फसगत होऊ शकते, विश्वासाने मतदान केल्यानंतर अपेक्षाभंग होऊ शकतो. असाच अपेक्षाभंग केवळ पश्चिम महाराष्ट्रातच नाही, तर संपूर्ण महाराष्ट्रात झाला आहे”, असा टोला लगावत, “शिवसेना म्हणून आमची भूमिका नेहमी जनतेसोबत राहण्याची आहे, असेही उद्धव ठाकरे यांनी सांगितले. तसेच ज्या गोष्टी पटत नाहीत, त्या सरकारला सांगणे आमचे कर्तव्य आहे. जे मुद्दे आम्ही उचलले आहेत, त्यातील एकही मुद्दा माझ्या वैयक्तिक स्वार्थाचा किंवा शिवसेनेच्या स्वार्थाचा नाही. प्रत्येक मुद्दा जनतेच्या हिताचा आहे. मग तो जिल्हा परिषदेत अडकलेल्या सर्वसामान्यांचा पैशांचा प्रश्न असू देत किंवा जीएसटीचा. जीएसटीमुळे महापालिकांचा निधी बुडाला असता, आम्ही लढा दिला म्हणून २७ महापालिकांचा निधी अबाधित राहिला आहे” असेही त्यांनी सांगितले.

ती भगवद्गीता संस्कृतमध्ये आहे की गुजरातीत…

महाविद्यालयांमध्ये भगवद्गीतावाटपाच्या प्रश्नावर उद्धव ठाकरे यांनी, मला ही भगकद्गीता चाळायची आहे, ती नक्की संस्कृतमध्ये आहे की गुजरातीमध्ये हे पाहायचं आहे, असा टोला लगावला. महाविद्यालयांमध्ये आजच्या युगाचे शिक्षण मिळायला हवे, परीक्षा वेळेवर व्हायला हव्यात, निकाल वेळेवर लागायला हवा, पेपर फुटता कामा नये, या विषयांकडे अधिक लक्ष द्यायला हवे. विद्यापीठांमध्ये चाललेला भोंगळ कारभार झाकण्याचा हा प्रयत्न आहे का? हा महत्त्वाचा प्रश्न आहे. सर्व कारभार सुधारायला हवा, हे जास्त महत्त्वाचे आहे, असेही त्यांनी सांगितले. तसेच जिओ इन्स्टिट्यूटबद्दल विचारले असता, मीही जिओ इन्स्टिट्यूटचा शोध घेत आहे, असे त्यांनी सांगितले.

नाणारचा विध्वंसक प्रकल्प होऊ देणार नाही

नाणारमध्ये जी रिफायनरी येणार आहे, तिच्यामुळे संपूर्ण कोकणपट्टीच्या पर्यावरणाचा र्‍हास होणार आहे. हा विध्वंसक विकास परवडणारा नाही. त्यामुळेच जनतेने या प्रकल्पाला विरोध केला आहे. आम्हीही जनतेबरोबरच असल्याने आमचाही या प्रकल्पाला विरोध आहे. रिफायनरीसाठी मुख्यमंत्र्यांना वेळ काढायचा असेल तर ते काढू शकतात. मात्र, आम्ही हा प्रकल्प होऊ देणार नाही, अशी ठाम भूमिका पुन्हा एकदा शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी मांडली. 

पश्चिम महाराष्ट्रातील लोकसभा मतदारसंघनिहाय आढावा बैठका संपन्न

शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी पश्चिम महाराष्ट्रातील शिरूर, पुणे, बारामती, मावळ, सातारा, सांगली, कोल्हापूर, हातकणंगले या लोकसभा मतदारसंघांतील पदाधिकार्‍यांबरोबर आढावा बैठक घेतली. आज सकाळी साडेनऊ ते दुपारी साडेचार या कालावधीत या बैठका पार पडल्या. बैठकांमध्ये प्रत्येक लोकसभा मतदारसंघाच्या पदाधिकार्‍यांनी मतदारसंघाची परिस्थिती, पक्षाचे प्राबल्य तसेच पक्षबांधणीसंदर्भातील माहिती दिली. त्यानंतर पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी प्रत्येक मतदारसंघातील पदाधिकार्‍यांना मार्गदर्शन केले.

खड्ड्यांची जबाबादारी सर्वांनी घ्यावी

मुंबईतील खड्ड्यांबाबत प्रश्न विचारला असता, मुंबईतील खड्ड्यांची जबाबदारी सर्वांनी घ्यायला हवी. एकट्या पालिकेने किंवा सरकारने नाही. खड्ड्यांना सरकारपण जबाबदार आहे आणि पालीकापण जबाबदार आहे. सर्वांनी ही जबाबादारी घ्यायला हवी. एक सुद्धा बळी जाऊ नये. हीच सर्वांची भावना आहे, असे शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी सांगितले.