
आम्हाला निवडणुका पाहिजेत, लोकशाहीच्या मार्गाने यांना ठोकायला आम्ही आसुसलेलो आहोत असे विधान शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी केले. तसेच महाराष्ट्राने आवळलेली मूठ मतचोरी करणाऱ्यांच्या टाळक्यात हाणू असा घणाघातही उद्धव ठाकरे यांनी केला.
आज मतचोरी आणि मतदार याद्यांमधील घोळाबद्दल निवडणूक आयोगाचा निषेध नोंदवून लोकशाहीचा आणि खऱ्या मतदारांचा आवाज बुलंद करण्यासाठी आज सर्वपक्षीय महामोर्चा मुंबईत निघाला. यावेळी उद्धव ठाकरे म्हणाले की, माझ्या आठवणीप्रमाणे संयुक्त महाराष्ट्राच्या चळवळीनंतर सर्व राजकीय पक्षांची एकजूट पहिल्यांदाच झालेली असेल. ही विरोधी पक्षांची नव्हे तर लोकशाही आणि लोकशाहीचे प्रतिनिधित्व करणाऱ्या सर्व राजकीय पक्षांची एकजूट आहे. आणि मतचोरी करणाऱ्यांना मी सांगतोय तुम्ही फक्त ठिणगी पाहताय, या ठिणगीचा कधीही वणवा होऊ शकतो. तुमच्या बुडाला आग लावण्याची तागद या ठिणगीमध्ये आहे. मध्यंतरी मी एक शब्द वापरला तो गाजला. जागे रहा नाही तर अॅनाकोंडा आ जाएगा. या अॅनाकोंडाला आपल्याला आता कोंडावंच लागेल. मला एका गोष्टीचं आश्चर्य वाटतं, आज एवढे धडधडीत पुरावे दिले. राज ठाकरे यांनी पुराव्याचा डोंगरच दिला आहे. रोज कुठून ना कुठून तरी पुरावे येतच आहेत. तरीसुद्धा आपले राज्यकर्ते आणि निवडणूक आयोग, निवडणुक आयोग तर यांचा नोकर आहे. यांची भूक शमत नाही. आपला पक्ष चोरला, निशाणी चोरली, नाव चोरलं. माझे वडिल चोरायचे प्रयत्न केले. ते ही पुरेसे नाही म्हणून आता मतं चोरी करायला बघत आहेत. बाकी सगळे इथे एकत्र आलेले आहेत. पण सत्ताधारी आलेले नाहीत. मुख्यमंत्री म्हणाले होते की लोकसभेच्या वेळेला विरोधी पक्षांनी म्हणजे आपण कोणत्या मतदारसंघात कसा लाभ घेतलेला आहे याचा परदाफाश मी करेन. तुमच्या साक्षीने मी मुख्यमंत्र्याना आव्हान देत आहे की, तुम्ही आमचा परदाफाश कराच. एकदाचं काय ते दुध का दुध पानी का पानी होऊ दे. पण जेव्हा मुख्यमंत्री असे बोलतात याचा मुख्यमंत्रीसुद्धा मान्य करतात की मतांची चोरी होत आहे. आज मला एका गोष्टीचा अभिमान आहे. आपण दरवेळी असं म्हणतो की महाराष्ट्र देशाला दिशा दाखवतोय. आज हा संपूर्ण महाराष्ट्र आपल्या रुपामध्ये एकवटला आहे आणि तो देशाला दिशा दाखवतोय. आपण पक्ष बाजूला ठेवून एकत्र आलेलो आहोत. ज्या गोष्टी आता आम्ही करत आहोत, शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे), मनसे, काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार, कम्युनिस्ट, शेकाप या पक्षाचे कार्यकर्ते करत आहेत, तसे मी संपूर्ण देशातील मतदारांना आवाहन करतोय. सर्व मतदारांनी मतदार यादीत आपले नाव आहे की नाही हे तपासा. आणि आपल्या घरात आपली परवानगी न घेता लोक राहत आहेत की नाही हे सुद्धा तपासा. कारण जर शौचालयात 100 माणसं राहत असतील, तर तुमच्या घरात किती राहू शकतात.
तसेच आता मी असा अर्ज दाखवतोय की त्या अर्जाखाली एक शेरा आहे. सदर अर्जदाराची भेट घेऊन अर्जाची पडताळणी केली असता, हा अर्ज आम्ही केलेला नाही, असा अभिप्राय मिळालेला आहे. त्या आधारे हा सदर अर्ज बाद करण्यात आलेला आहे. ज्या अर्जादाराने हा अर्ज केला आहे त्या अर्जदाराने हा अर्ज केलेलाच नाही. आता हा अर्जदार शोधायचा कुठे? त्या अर्जदाराचे नाव आहे उद्धव बाळासाहेब ठाकरे. या माणसाने ऑनलाईन अर्ज केला आहे आणि ते उद्धव बाळासाहेब ठाकरे यांनाच माहित नाही. त्यावर मोबाईल नंबर खोटा आहे.
दोन दिवसांपूर्वी मी मातोश्रीत लोकांना भेटत होतो. तेव्हा रवीने मला येऊन सांगितले की निवडणूक आयोगाची माणसं आलेली आहेत. म्हणजे निवडणूक आयोगाची लोक साधू संत येती घरा तोची दिवाळी दसरा. आता दसरा झाला, दिवाळी झाली हे कशाला आले? त्यांनी विचारलं टेलिफोन नंबर बरोबर आहे का? मी सांगितलं नंबर खोटा आहे. त्यांनी सांगितलं की तुम्ही अर्ज केला आहे व्हेरिफिकेशनसाठी. मी अनिल परब, अनिल देसाईंना विचारलं तेव्हा कळालं की कुणीही अर्ज केलेला नाही. हा अर्ज केलेला आहे. 23 ऑक्टोबर 2025 रोजी. सक्षम नावाचे अॅप आहे, त्यातून हा अर्ज करण्यात आला आहे. मी रीतसर तक्रार केली आहे. माझ्या खोट्या नावाने ओटीपी काढायचा प्रयत्न झाला आहे. आणि कदाचित आपण हा विषय हाती घेतल्यानंतर अर्ज करण्यात आला आहे. म्हणजे माझ्यासह माझ्या कुटुंबातील चार जणांची नावं मतदारयादीतून बाद करण्याचा प्रयत्न केला आहे का हे आता आपल्याला शोधून काढलं पाहिजे. संपूर्ण कुटुंब मतदान करतायत, एक पक्षप्रमुख म्हणून मी प्रचार करतो या साध्या गोष्टी आम्हाला नाही कळत असे उद्धव ठाकरे म्हणाले.
आम्ही म्हणत नाही की आम्ही निवडणुका होऊच देणार नाही. आम्हाला निवडणुका पाहिजेत. आम्हीसुद्धा लोकशाहीच्या मार्गाने यांना ठोकायला आसुसलेलो आहोत. पण सदोष आणि चोरी करून तुम्ही आधीच निकाल ठरवून निवडणुका घेणार असाल तर जनतेने ठरवावं की निवडणुका घ्यायच्या की नाही. आम्ही नेतृत्व करत आहोत जनतेसाठी. आमच्यातले सगळे मतभेद बाजूला ठेवून देशातली लोकशाही जिवंत ठेवण्यासाठी एकत्र आलेलो आहेत. या देशामध्ये आपल्या डोळ्यादेखत लोकशाहीचा खून होत आहे आणि खून करणारे दिमाखात खुर्चीवर बसले आहेत. त्याच्या चरणी घालीन लोटांगण आमच्या आई वडिलांनी आम्हाला शिकवलेला नाही. एवढी लाचारी करणारी औलाद या महाराष्ट्राने पाहिलेली नाही. आज राज्यातल्या मदारांनी हे केलं पाहिजे. जिथे मतचोर दिसेल तिथेच त्याला फटकावलं पाहिजे. लोकशाही मार्गाने फटकावा. लोकशाहीचा मार्ग तुम्हाला माहित आहे. आम्हाला कायदा हातात घ्यायचा नाहिये. पण कायद्याचा खोटा दांडुका आमच्या डोक्यात मारणार असाल तर त्या दंडुक्याचे काय करायचं हा निर्णय घ्यायला महाराष्ट्रातली जनता सक्षम आहे. आज ही सगळी एकजूट झालेली आहे, अॅनाकोंडा बसलेलाच आहे. जसजशी निवडणूक जवळ येईल तसतशी यांची दडपशाही सुरू होईल. आम्ही प्रामाणिकपणाने कायदेशीर मार्ग अवलंबत आहोतच. येत्या काही दिवसांत सगळे पुरावे घेऊन आपण न्यायालयात जाणार आहोत. न्यायालयातही आपल्याला न्याय मिळतो की नाही याचीही परीक्षा होईल. निवडणूक आयोग तिकडे लाचार तर झालेलाच आहे, शिवसेनेची केस तिथे तीन चार वर्ष सुरूच आहे, पण आता मात्र सर्व साक्षी पुरावे दिल्यानंतर आम्हाला न्याय हवाय. त्या न्यायालयात आम्हाला न्याय मिळेल याची खात्री आम्हाला आहेच, पण जनतेच्या न्यायालयात या मतचोरांचं काय करायचं याचा निर्णय घ्यायला सक्षम आहेत. तुमच्यासाठी आम्ही एकत्र आलेलो आहोत. आम्ही मराठीसाठी, हिंदुंसाठी आणि महाराष्ट्रासाठी एकत्र आलेलो आहोत. पण अशावेळी आम्ही पुढे जात असताना भक्कमपणे साथ देणं हे तुमचं कर्तव्य आहे. ही मूठ महाराष्ट्राने आवळलेली आहे, जर मतचोरी करून तुम्ही निवडणूक घेण्याचा प्रयत्न करणार असाल तर ही मूठ तुमच्या टाळक्यात हाणल्याशिवाय राहणार नाही असेही उद्धव ठाकरे या वेळी म्हणाले.




























































