उद्धव ठाकरे यांचा गुरुवारी गुहागर आणि दापोलीत जनसंवाद दौरा

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षप्रमुख उद्धव ठाकरे 14 मार्च रोजी रत्नागिरी जिल्ह्यातील गुहागर आणि दापोली येथे जनसंवाद दौऱ्यावर येत आहेत. या जनसंवाद दौऱ्यात पक्षप्रमुख उद्धव ठाकरे शिवसैनिकांशी संवाद साधणार आहेत. रत्नागिरी जिल्ह्यात गुहागर आणि दापोली येथे सभा होणार आहेत. जनसंवाद दौऱ्यामुळे दापोली आणि गुहागर येथील शिवसैनिकांमध्ये भगवे चैतन्य संचारले आहे. सर्वत्र भगवेमय वातावरण झाले आहे.

उद्धव ठाकरे यांच्या जनसंवाद दौऱ्याचा महाराष्ट्रात झंझावात सुरू आहे. उद्या हा झंझावात रत्नागिरी जिल्ह्यात धडकणार आहे. गुरुवार 14 मार्च रोजी सकाळी साडेदहा वाजता गुहागर तालुक्यातील शृंगारतळी येथे जनसंवाद दौरा होणार आहे. यावेळी उद्धव ठाकरे शिवसैनिकांशी संवाद साधणार आहेत. त्यानंतर दुपारी एक वाजता दापोलीतील केळसकर नाका येथील आझाद मैदानावर जनसंवाद यात्रा होणार आहे.

तत्पूर्वी दापोली येथील शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाच्या संपर्क कार्यालयाचे उदघाटन उद्धव ठाकरे यांच्या हस्ते होणार असून ते यावेळी शिवसैनिकांशी संवाद साधणार आहेत. या प्रसंगी माजी केंद्रीय मंत्री अनंत गिते, खासदार विनायक राऊत, आमदार भास्कर जाधव, उपनेत्या सुषमा अंधारे, उपनेते आणि आमदार राजन साळवी, जिल्हाप्रमुख सचिन कदम आणि माजी आमदार संजय कदम उपस्थित राहणार आहेत. जनसंवाद दौऱ्याची शिवसैनिकांनी जय्यत तयारी केली असून सर्वत्र वातावरण भगवेमय झाले आहे.