370 प्रमाणेच राममंदिराचा निर्णय घ्या! उद्धव ठाकरे यांनी केंद्र सरकारला ठणकावले

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा
uddhav thackeray

कश्मीरमधील 370 कलम रद्द करण्याचा धाडसी निर्णय जसा घेतलात तसाच अयोध्येतील राममंदिराबाबतही घ्या, अशा शब्दांत शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी आज केंद्र सरकारला ठणकावले. राममंदिर हा हिंद्च्यां श्रद्धेचा आणि अस्मितेचा प्रश्न असून तो आम्ही सोडणार नाही असे सांगतानाच अयोध्येत राममंदिरासाठी पहिली वीट लावण्याचे कामही आम्ही करू असे ते म्हणाले.

उद्धव ठाकरे यांनी आज पत्रकारांशी संवाद साधला. ते म्हणाले की, अयोध्येतील बाबरी मशीद पाडली गेली तेव्हा देशामध्ये फक्त हिंदुहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी त्याची जबाबदारी घेतली होती. अयोध्येतील राममंदिराचा प्रश्न 1990 पासून प्रलंबित आहे. पण न्यायालयाकडून निर्णय घ्यायला उशीर लागत असेल तर केंद्र सरकारने विशेष कायदा बनवून राममंदिर निर्मितीचा निर्णय घ्यावा असा आमचा आग्रह आहे असे उद्धव ठाकरे म्हणाले.

उदयनराजेंचा अपमान नाही
उदयनराजे भोसले यांच्या भाजपा प्रवेशाबाबतही उद्धव ठाकरे यांनी यावेळी प्रतिक्रिया दिली. दैनिक ‘सामना’तून छापून आलेल्या अग्रलेखात यासंदर्भात विस्तृत भूमिका मांडण्यात आली असून वेगळा खुलासा करण्याची गरज नाही असे ते म्हणाले. उदयनराजेंचा अपमान करण्याचा आमचा हेतू नव्हता. फक्त त्यांच्याकडून काही गोष्टींची मात्र अपेक्षा आहे असे सांगतानाच आपल्या माणसांकडून अपेक्षा करायच्या नाहीत तर कोणाकडून करायच्या, असा सवाल उद्धव ठाकरे यांनी केला.

नाणारचे झाले तेच आरेचे होणार
मेट्रो कारशेडसाठी आरेमध्ये हजारो झाडे तोडली जाणार आहेत. त्याला पर्यावरणप्रेमींकडून जोरदार विरोध होत आहे. त्यासंदर्भात यावेळी पत्रकारांनी उद्धव ठाकरे यांना विचारले त्यावर उद्धव ठाकरे म्हणाले की, नाणार प्रकल्पासाठीही त्यावेळी असाच आग्रह धरण्यात आला होता आणि नंतर काय झाले हे सर्वांना माहीत आहे. लोकांच्या विरोधामुळे सरकारला नाणार प्रकल्प रद्द करावा लागला होता याची उद्धव ठाकरे यांनी आठवण करून दिली.