महायुतीला महाजनादेश मिळेल! उद्धव ठाकरे, देवेंद्र फडणवीस यांचा विश्वास

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

महाराष्ट्राच्या मनातील महायुती मैदानात उतरली असून या महायुतीला विधानसभा निवडणुकीत निर्विवाद बहुमताचा महाजनादेश मिळेल असा ठाम विश्वास शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज व्यक्त केला. यावेळी पक्षादेश डावलून बंडखोरी करणाऱयांनाही त्यांनी दोन दिवसांचा अल्टिमेटम दिला असून तरीही हे बंडखोर उमेदवारीवर ठाम राहिले तर महायुतीतील कोणत्याच पक्षात त्यांना थारा मिळणार नाही, असा सज्जड इशाराही या दोन नेत्यांनी दिला.

विधानसभा निवडणुकीसाठी शिवसेना, भाजप आणि मित्रपक्षांची महायुती झाल्यानंतर उद्धव ठाकरे आणि देवेंद्र फडणवीस यांची पहिलीच संयुक्त पत्रकार परिषद झाली. या परिषदेत हे दोन्ही नेते काय भूमिका मांडणार याबद्दल प्रसारमाध्यमांमध्ये कमालीची उत्सुकता होती. त्यामुळे नरीमन पॉइंट येथील महिला आर्थिक विकास महामंडळाच्या सभागृहात पत्रकारांनी एकच गर्दी केली होती.

मुख्यमंत्र्यांनी यावेळी महायुतीचा फॉर्म्युला जाहीर करताना भाजप 150, शिवसेना 124 (अधिक 2 विधान परिषद) आणि मित्रपक्ष 14 जागा लढवणार असल्याचे सांगितले. जागावाटपात महायुतीतील सर्वच घटकपक्षांना तडजोड करावी लागली असली तरी महायुतीला प्रचंड बहुमत मिळणार असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.

तिकीट कापले नाही; पक्षात जबाबदारी बदलते
एकनाथ खडसे, विनोद तावडे, बावनकुळे, प्रकाश मेहता, राज पुरोहित या पाच दिग्गजांना यावेळी तिकीट मिळाले नाही. त्याबाबत पत्रकारांनी किचारले असता कोणाचे तिकीट कापले असे म्हणणे योग्य ठरणार नाही. पक्षात जबाबदाऱ्या बदलत असतात. आता त्यांची भूमिका बदलली आहे. काहीजण आतापर्यंत विधानसभेत होते तर काही बाहेर होते. आता बाहेरची मंडळी विधानसभेत येईल, असे मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले.

यावेळी शिवसेना नेते मनोहर जोशी, उद्योगमंत्री सुभाष देसाई, खासदार गजानन कीर्तिकर, आरोग्यमंत्री एकनाथ शिंदे, विधान परिषद उपसभापती नीलम गोऱहे, भाजप प्रदेशाध्यक्ष महसूलमंत्री चंद्रकांत पाटील, शिक्षणमंत्री आशीष शेलार, शिवसेना सचिव मिलिंद नार्वेकर, भाजप मुंबई अध्यक्ष आमदार मंगलप्रभात लोढा आदी उपस्थित होते.

आदित्य मुख्यमंत्री व्हावा हे शिवसैनिकांचं स्वप्न असेल तर त्यात गैर नाही
आदित्य ठाकरे हे मुख्यमंत्री व्हावेत हे शिवसैनिकांचं स्वप्न असल्याबाबत पत्रकारांनी विचारलेल्या प्रश्नावर उद्धव ठाकरे म्हणाले, ते जर शिवसैनिकांचं स्वप्न असेल तर त्यात गैर काहीच नाही. आदित्यचं पहिलं पाऊल हे सक्रिय राजकारणात पडलं आहे. निवडणुकांतलं हे पहिलं पाऊल म्हणजे तो विधिमंडळात येणं महत्त्वाचं आहे. त्याचं महाराष्ट्राबद्दलचं स्वप्न अधिक महत्त्वाचं असून त्याला सुजलाम् सुफलाम् महाराष्ट्र घडवायचा आहे.

एखादी गोष्ट करायची म्हटलं तर ती करायचीच. महाराष्ट्र चांगला घडवायचा असेल तर तुझं-माझं करण्यापेक्षा महाराष्ट्राचं काय याचा विचार करायला हवा. – उद्धव ठाकरे

आमच्यात काही विषयांबाबत मतभेद असतील, मतभिन्नताही असेल पण हिंदुत्वाच्या समान धाग्यावर आमची महायुती आधारित आहे.- देवेंद्र फडणवीस

लहान भाऊ, मोठा भाऊ कोण यापेक्षा नातं महत्त्वाचं!
महायुतीत शिवसेनेच्या वाटय़ाला आलेल्या जागांवरून आता लहान भाऊ, मोठा भाऊ कोण असा प्रश्न उद्धव ठाकरे यांना पत्रकारांनी विचारला. यावर सडेतोड उत्तर देताना उद्धव ठाकरे म्हणाले, आकड्यांवर सर्व अवलंबून नसते. लोकसभेनंतर वातावरण बदलले आहे. जे काही होतेय ते उघड आहे. एकदा मनापासून युती केली की सर्व प्रश्न बसून सोडवता येतात. तसाच युतीचा प्रश्न समजूतदारपणे सोडवला असून लहान भाऊ, मोठा भाऊ यापेक्षा भावाचं नातं निभावणं महत्त्वाचं आहे. ते भावाचं नातं आम्ही टिकवलं आहे.

आदित्य मुंबईतून सर्वाधिक मते मिळवून जिंकतील!
पत्रकार परिषद सुरू असतानाच शिवसेना नेते, युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे यांचे आगमन झाले तेक्हा मुख्यमंत्री देकेंद्र फडणवीस यांनी ‘या आदित्य’ असे म्हणत त्यांना व्यासपीठावर बोलावले. आदित्य ठाकरे यांचे विशेष स्वागत करतो. कारण लवकरच ते आमच्यासोबत विधानसभेत दिसणार आहेत. मुंबईत ते प्रचंड मताधिक्याने निवडून येतील असा विश्वास व्यक्त करतानाच आदित्य यांच्या रूपाने नवे नेतृत्व उदयास येत असल्याचे मुख्यमंत्री म्हणाले.