मुख्यमंत्र्यांच्या भेटीनंतर खडसेंची फडणवीसांवर टीका

2784

पाच वर्षांपूर्वी स्वर्गीय गोपीनाथ मुंडे यांच्या स्मारकासाठी संभाजीनगरमध्ये जागादेखील उपलब्ध करून दिली होती. मात्र मी मंत्रिमंडळाबाहेर आल्यानंतर हे स्मारक उभे राहू शकले नाही, अशा शब्दांत भाजपचे ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या भेटीनंतर देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वावर तोफ डागली आहे.

नवी दिल्लीत राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांची सोमवारी भेट घेतल्यानंतर एकनाथ खडसे यांनी मंगळवारी मुंबईत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची मुंबईत विधान भवन येथे भेट घेऊन जवळपास अर्धा तास चर्चा केली. खडसेंच्या अन्य पक्षातील नेत्यांच्या राजकीय भेटीगाठीमुळे भाजपच्या गोटात कमालीची अस्वस्थता वाढली आहे.

या भेटीनंतर पत्रकारांशी बोलताना खडसे यांनी स्वःपक्षाच्या नेत्यांवर जोरदार टीकास्त्र्ा सोडले. गोपीनाथ मुंडे यांच्या स्मारकासाठी 30 ते 40 कोटी रुपयांचा खर्च आहे. पण मुख्यमंत्री पदी राहूनही फडणकीस यांना गेल्या पाच वर्षांत मुंडे यांचे स्मारक उभारता आले नाही. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी या स्मारकासाठी निधी देण्याचे आणि त्या भागात दौरा असेल तेव्हा स्मारकाच्या जागेलाही भेट देण्याचे आश्वासन दिल्याचे खडसे यांनी सांगितले.

जळगावमधील सिंचन प्रकल्पांना मंजुरी देण्याची विनंती

जळगावमधील सिंचन प्रकल्पांना साडेसहा हजार कोटी रुपयांची आवश्यकता आहे. केंद्र सरकार त्यासाठी निधी उपलब्ध करून देण्यासही तयार आहे. मुख्यमंत्री म्हणून आपण जर शिफारस केली तर या सिंचन प्रकल्पाला गती येईल, अशी विनंती मी त्यांना केली आहे. उद्धव ठाकरे यांनी या प्रकल्पांना मदत करण्याचे आश्वासन दिले आहे, असेही खडसे म्हणाले.

दुसऱ्या पक्षात जाण्याचा निर्णय नाही!

गेली अनेक वर्षे राजकारणात असल्याने काँग्रेस-राष्ट्रवादी व शिवसेना या तिन्ही पक्षांत अनेक नेत्यांशी माझी जवळीक आहे. त्यामुळे प्रत्येकाला स्वाभाविकपणे वाटते, राजकीय जीवनात 40-42 वर्षे अनुभव असलेला माझ्यासारखा कार्यकर्ता जर आमच्या पक्षात आला तर बळकटी येऊ शकेल आणि अशा अपेक्षा त्यांनी व्यक्त करणे काही गैर नाही. पण याबाबत मी कोणताही निर्णय घेतलेला नाही, असे त्यांनी सांगितले.

मी नाराज नाही!

मी नाराज आहे ही बातमी मुळात चुकीची आहे. माझी मनधरणी करण्यासाठी पक्षाचे नेते सुधीर मुनगंटीवार किंवा विनोद तावडे माझ्या भेटीला आले यात फारसे तथ्य नाही. गेली अनेक वर्षे मी भाजपच्या नेत्यांसोबत व कार्यकर्त्यांसोबत काम करीत आहे. त्यामुळे ते माझी नाराजी दूर करण्यासाठीच आले, असा त्याचा अर्थ नाही. पण भेटीत  राजकीय चर्चा झाल्याचे मान्य करून ते पुढे म्हणाले की,  राज्यात नव्याने सरकार आले आहे. पण भाजपचे सरकार राज्यात का आले नाही यावर मात्र आमची चर्चा झाली, असेही त्यांनी स्पष्ट केले.

गोपीनाथ गडावरील मेळाव्याचे मुख्यमंत्र्यांना निमंत्रण

12 डिसेंबरला परळी-वैजनाथ येथे गोपीनाथ गडावर पंकजा मुंडे यांनी स्वाभिमान मेळावा आयोजित केला आहे.  दरवर्षी या मेळाव्याला मीसुद्धा हजेरी लावतो. या मेळाव्याचे निमंत्रणही आपण मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना दिले. या मेळाव्यात त्यांनी या स्मारकाची घोषणा करावी. आपल्या कार्यकालात हे स्मारक पूर्ण करावे, अशी विनंती मी त्यांना केली आहे, असे खडसे म्हणाले.

आपली प्रतिक्रिया द्या