उद्धव ठाकरे यांचा सस्पेन्स! आता दसऱ्यालाच बोलेन!

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

निवडणुकीचे अर्ज भरले जात आहेत. तिकीट वाटपात खेचाखेची नाही, मात्र काही ठिकाणी निर्णय होणे आवश्यक आहे. ते निर्णय आम्ही घेत आहोत. 4 तारखेला यातून सर्व मोकळे होतील. बाकी जे काही बोलायचे आहे ते 8 ऑक्टोबर रोजी शिवसेनेच्या परंपरेप्रमाणे जो दसरा मेळावा होणार आहे तेव्हाच बोलेन असे शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी आज येथे स्पष्ट केले.

शिवसेना-भाजप युतीची घोषणा झाल्यानंतरही प्रसारमाध्यमांतून अनेक चर्चा रंगत आहेत. युती झाली मात्र ती कोणताही गाजावाजा न करता पत्रकाद्वारे युती झाल्याचे जाहीर करण्यात आले. यामुळे युतीचे जागावाटप, मुख्यमंत्री कुणाचा तसेच होणारी बंडखोरी याबाबत तर्कवितर्क लावले जात आहेत. नंदुरबार येथील काँग्रेसचे माजी आमदार चंद्रकांत रघुवंशी यांनी आपल्या समर्थकांसह मातोश्री निवासस्थानी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या उपस्थितीत शिवसेनेत प्रवेश केला. यावेळी पत्रकारांनी जागावाटपाबाबत समाधानी आहात का, असा प्रश्न केला असता उद्धव ठाकरे यांनी जे काही बोलायचे ते मी दसरा मेळाव्यातच बालेन असे स्पष्ट केल्याने प्रसारमाध्यमांतला सस्पेन्स मात्र अधिकच वाढला.

शिवसेनेने राष्ट्रवादीच्या खासदार सुप्रिया सुळे यांच्या विरोधात उमेदवार दिला नव्हता. त्यानुसार आदित्य ठाकरे यांची निवडणूक बिनविरोध करण्यासाठी प्रयत्न करणार का, या प्रश्नावर उद्धव ठाकरे म्हणाले, ज्या ज्या वेळी असे झालेय त्या त्या वेळी शिवसेनेने कधीच विरोध केलेला नाही. त्यामुळे आदित्यसमोर उमेदवार उभा न करण्याबाबत मी कुणालाही सांगितलेले नाही. शिवसेनेची एक परंपरा आहे त्यानुसार इतरांचीही असून त्यांनी कसे वागावे मी सांगणार नाही, असेही उद्धव ठाकरे यांनी स्पष्ट केले.

आदित्यला शिवसैनिकांनी स्वीकारलंय

शिवसेना नेते, युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे हे निवडणूक लढवत असल्याबाबत पत्रकारांनी विचारले असता उद्धव ठाकरे म्हणाले, माझ्या वडिलांनी ज्याप्रमाणे मला शिवसैनिकांवर लादले नाही त्याचप्रमाणे आज शिवसैनिकांनी ठरवले म्हणून आदित्य निवडणूक लढवत आहे. आता ती जबाबदारी शिवसैनिकांची आहे. आदित्य मनापासून जिद्दीने, चिकाटीने काम करतो आहे. तो माझ्यापेक्षाही जास्त मेहनत घेतोय. शिवसैनिकांनी त्याला स्वीकारले आहे. आमची ठाकरे घराण्याची सेवा करण्याची परंपरा आहे ती पुढच्या पिढीमध्ये सुरू राहत आहे त्याबद्दल मला आनंद आहे आणि मी त्यासाठी शिवसैनिकांना धन्यवाद देतो.

युवकांनी राज्याचे, देशाचे राजकारण हाती घ्यायला हवे!

आदित्य मैदानात उतरलाय ते महाराष्ट्राच्या हितासाठी, विकासासाठी. युवकांचीही काही स्वप्ने असतात. मी नुसतेच मंत्री किंवा मुख्यमंत्री होण्याबाबत बोलत नाही तर देश घडविण्याची स्वप्ने युवा पिढी पाहत असते. मी तर म्हणेन या युवकांनीच आता पुढे येऊन राज्याचेच नाही देशाचेही राजकारण हाती घ्यायला हवे, असे उद्धव ठाकरे म्हणाले.