
इर्शाळवाडी येथे झालेल्या दुर्घटनेनंतर सगळ्या पक्षांनी राजकारण बाजूला ठेवून एकत्र यायला हवं आणि एकत्रितपणे योजना राबवायला हवी, असं प्रतिपादन करताना मला राजकारण करायचं नाही, पण राजकारणी म्हणून ही लाजीरवाणी गोष्ट आहे असा संताप शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी व्यक्त केला. शनिवारी इर्शाळवाडी येथील दुर्घटनाग्रस्तांची भेट घेतल्यानंतर झालेल्या पत्रकार परिषदेत ते बोलत होते.
यावेळी माध्यमांनी विचारलेल्या प्रश्नांनाही उद्धव ठाकरे यांनी उत्तरं दिली. इर्शाळवाडी दुर्घटनाग्रस्तांचं सांत्वन करताना उद्धव ठाकरे म्हणाले की, दोन दिवसांपूर्वी जी दुर्घटना घडली, साधारणतः आपण पाहिलं असेल की दरवर्षी नाहीतर दर एक दोन वर्षांनंतर अशा दुर्घटना घडतात, आपण सगळेजण हडबडून जागे होतो. धावतो, पळतो आणि कालांतराने हे विषय थंडावतात. मी याच्यात राजकारण करू इच्छित नाही पण राजकारणी म्हणून सर्वांनाच लाजीरवाणी गोष्ट आहे. आजदेखील महाराष्ट्रात अशा अनेक वस्त्या आहेत, ज्या डोंगरकपारीत आहेत, डोंगर उतारावर आहेत किंवा उताराखाली आहेत. जिथे कधीही दरडी कोसळू शकतात आणि अक्षरशः मी स्वतः तळिये गावात गेलेलो तेव्हा पाहिलं की होत्याचं नव्हतं होतं. आता सुद्धा या ग्रामस्थांशी बोललो. काय बोलू? कोणत्या भाषेत सांत्वन करू, त्यांच्यासाठी मी करू तरी काय शकतो. आपण नंतर जागे होतो आणि धावपळ केल्यासारखं दाखवतो. त्यापेक्षा माझं मत प्रामाणिकपणाने हेच आहे की, सर्वच पक्षांनी या बाबतीत तरी राजकारण बाजूला ठेवून एकत्र यायला पाहिजे, असं प्रतिपादन उद्धव ठाकरे यांनी केलं.
ते पुढे म्हणाले की, मी आता तुमच्याकडे येत असताना आज देखील मला एक निवेदन दिलं गेलं आणि प्रश्न विचारण्यात आला. त्या प्रश्नाचं उत्तर माझ्याकडे नाही की, देशाच्या स्वातंत्र्याला 75 वर्षं होऊनसुद्धा आज आदिवासी आहेत, इतर अनेक अशी लोकं आहेत. काही प्रकल्पग्रस्त आहेत. त्यांना हे जीवन जगावं लागतं. आयुष्यात टांगती तलवार जशी असते तशी ही कोसळती दरड कधी अंगावर येईल आणि घरदार नेस्तनाबूत होईल काही सांगता येत नाही. याकरिता तातडीने केवळ इर्शाळवाडीच नाही तर आजूबाजूच्या ज्या काही वस्त्या आहेत, त्यांना एकत्रित करून एक योजना करायला हवी. जी योजना मी मुख्यमंत्री असताना करायचा प्रयत्न करत होतो. या महाराष्ट्रात जेवढ्या जेवढ्या वस्त्या आहेत त्यांचं जवळपासच्या गावांमध्ये किंवा परिसरामध्ये पुनर्वसन कसं करू शकतो, हे तिथल्या जिल्हाधिकाऱ्यांना, तहसिलदारांना सांगून एक योजना केली गेली पाहिजे. सरकार कोणाचंही येवो, कोणाचंही जावो तरीही या योजनेला कुणीही स्थगिती देता कामा नये. एवढी माणुसकी आपण शिल्लक ठेवलीच पाहिजे. कारण आता काही दिवसांनंतर मी तळेगावात सुद्धा विचारपूस करणार आहे. त्या दुर्घटनेला आता दोन वर्षं होऊन गेली. खरंच त्यांना आपण किती घरं दिली, किती जणांचं पुनर्वसन केलेलं आहे. आता तर तुम्ही पाहिलं असेल आणि त्याही वेळेला कुटुंबच्या कुटुंबं नाहीशी झालेली आहेत. काही ठिकाणे कर्ती मुलं गेलेली आहेत, काही ठिकाणी आईवडील गेलेले आहेत. हे असं विचित्र, घराचं छप्पर उडवून टाकणारं संकट कोसळल्यानंतर आपण राजकारणी म्हणून यांच्याकडे मत मागायला जातो. आपल्याला लाज वाटली पाहिजे की सरकार बदलल्यानंतर मी कुठेही स्थगिती दिली असं म्हणत नाही. तुफान पावसामुळे मदतकार्यात अडथळे येतात, आताही मी त्या जागेवर जाणार नाही. कारण मी जाणार म्हणजे माझ्यासोबत इतकी लोकं येणार. जे जीव वाचणं शक्य असेल तो वाचवला गेला पाहिजे. त्यामुळे मदतकार्यात कुठेही अडथळे येतील असं मी करणार नाही. पण, पाऊस ओसरून गेल्यानंतर या सगळ्या वस्तीतल्या लोकांना एकत्र करून त्यांच्या पुनर्वसनाची मोठी योजना, जशी पंतप्रधान आवास योजना, तशी योजना करा. या लोकांसाठी करा. गावागावातल्या लोकांना उदरनिर्वाहाची पंचाईत आहे. आता या लोकांना कंटेनरमध्ये राहावं लागेल. पण, यांची विनंती आहे की जिथे उदरनिर्वाहाचं साधन आहे, तिथे हे कंटेनर ठेवावेत. अशा योजना तातडीने आणि दूरगामी आखल्या गेल्या पाहिजेत. आणि सरकार, निवडणुका येवोत, जावोत या योजनांमध्ये कुठेही खंड पडता कामा नये, असा सगळ्यांनी मिळून प्लान तयार करण्याची आवश्यकता आहे, असंही उद्धव ठाकरे यावेळी म्हणाले.
आदिवासींना मुख्य प्रवाहात आणण्यासाठीच्या मागणीवर बोलताना उद्धव ठाकरे म्हणाले की, मी खूप मोठ्या मागण्या करणार नाही. कारण केंद्र फार मोठं आहे, त्यांना मणिपूरच्या प्रश्नातून लक्ष द्यायला वेळ मिळेल तर मी त्यांच्याशी बोलेन. पण मला आता राजकारण करायचं नाही. ही सगळी माणसं, आदिवासीसुद्धा माझेच आहेत. इतर सुद्धा बिगरआदिवासी, शेतकरी, बिगरशेतकरी ही सगळी माणसं आहेत. त्यामुळे त्यांना विभागवारी न लावता या सगळ्या पद्धतीने ज्यांना राहावं लागतंय त्यांना चांगलं आयुष्य आपण देऊ शको, असा प्रयत्न केला पाहिजे, असंही उद्धव ठाकरे आपल्या पत्रकार परिषदेत म्हणाले.



























































