भाजपच्या ‘ईडी’ हत्याराविरोधात उद्धव ठाकरेंचा तानाजी लढतोय!

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

>> हेमंत देसाई

शिवसेना नेते-खासदार संजय राऊत यांच्या अटकेमुळे महाराष्ट्रात संताप व्यक्त झाला हे वास्तव असून संजय राऊत यांच्या या बाणेदारपणामुळे शिवसैनिक आणि शिवसेनेच्या नेत्यांचा आत्मविश्वास निश्चितच वाढला आहे. भाजपकडे ईडीचे हत्यार आहे आणि त्या हत्याराविरोधात शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांचा तानाजी लढतो आहे असेच आजचे चित्र आहे.

शिवसेना नेते-खासदार संजय राऊत यांना अटक झाल्यानंतर महाराष्ट्रातच नव्हे तर देशभरात प्रतिक्रिया उमटली. संजय राऊत हे जनाधार नसलेले नेते असल्याची टीका एकनाथ शिंदे गटाचे आमदार करत असले तरी राऊत यांच्या अटकेने महाराष्ट्रात कोल्हापूर ते नागपूर आणि पुणे ते नाशिकपर्यंत संताप व्यक्त झाला हे वास्तव कुणालाही नाकारता येणार नाही. अटकेनंतरही खासदार राऊत हे कुठेही खचले नाहीत.

शिवसेना म्हणजे महाराष्ट्र नव्हे असा डायलॉग फडणवीस म्हणतात. पण मराठी माणसाची संघटना, पक्ष कुठला आहे? मराठी माणसांच्या प्रश्नांवर आवाज उठवतो तो पक्ष म्हणजे शिवसेना. प्रादेशिक अस्मिता बाळगणारा पक्ष, बाळासाहेब ठाकरे यांचा पक्ष म्हणून शिवसेनेचाच उल्लेख करावा लागेल. शिवसेनेच्या उदरातून आलेला पक्ष मनसे हा आता भाजपकडे वळला आहे. काँग्रेसच्या उदरातून आला आहे तो राष्ट्रवादी काँग्रेस.

राऊतांमुळे शिवसैनिकांना मिळाली भाजपविरुद्ध आवाज उठवण्याची हिंमत

संजय राऊत यांनी जी हिंमत दाखवली त्यामुळे शिवसैनिकांना भाजपच्या अन्यायाविरुद्ध आवाज उठवण्याची हिंमत मिळाली आहे. महाविकास आघाडी सरकारची स्थापना, त्या सरकारचा सातत्याने बचाव, शिवसेनेची भूमिका राज्यसभेत प्रभावीपणे मांडणे, सोनिया गांधी आणि राहुल गांधी यांच्याशी संपर्क वाढवणे हे संजय राऊत यांनी चांगल्या पद्धतीने केले.

उद्धव व राऊत यांच्यात फूट पाडण्याचा प्रयत्न भाजप करतेय, पण दोघांनीही त्याला भीक घातलेली नाही. सर्वसामान्य मराठी माणूस, सामाजिक कार्यकर्ते, लेखक, पत्रकार हे उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेच्या पाठीशी ठामपणे उभे आहेत.

उद्धव ठाकरे यांचा तानाजी लढतोय

संजय राऊत म्हणजे उद्धव ठाकरे यांचे तानाजी आहेत. तानाजी लढतोय. राऊत यांना मी रावडी राऊत म्हणतो. त्यांनी जी हिंमत दाखवली त्याबद्दल त्यांचे अभिनंदन. ही राजकीय लढाई आहे.  ईडी हे हत्यार भाजपने हाती घेतले आहे. त्यामुळे शिवसेनेला ही लढाई रस्त्यावर आणि न्यायालयातही लढावी लागेल. या लढाईत काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसनेही शिवसेनेला पाठिंबा दिला आहे. या लढाईत तिन्ही पक्षांनी मिळून एकमेकांना साथ दिली पाहिजे.

भाजपकडून होलसेल करप्शन

प्रूडंट इलेक्टोरल ट्रस्ट. हा ट्रस्ट राजकीय पक्षांना निवडणुकीसाठी देणग्या देणारा सर्वात मोठा ट्रस्ट आहे. 2018 मध्ये या ट्रस्टकडून 85 टक्के देणग्या भाजपला मिळाल्या. या ट्रस्टमध्ये आयटीसी, बी. जी. शिर्के, डीएलएफ म्हणजे भारती ग्रुप, कॅडिला, टोरँट पॉवर, डीसीएम श्रीराम या कंपन्यांनी पैसे दिल्याची माहिती मी काढलेली आहे. या कंपन्यांना सरकारने धोरणाच्या माध्यमातून काय फेव्हर केलेय ते बघायला हवे. लोकं म्हणतात यूपीए सरकार भ्रष्ट होते. भाजप सरकारच्या काळात वैयक्तिक पैसे घेतले जात नाहीत, पण धोरणांच्या माध्यमातून विशिष्ट क्षेत्रातील विशिष्ट कंपन्यांना मदत केली जाते. याला होलसेल करप्शन म्हणतात. स्टेट बँकेने अदानीला ऑस्ट्रेलियातील खदानीसाठी सहा हजार कोटींचे कर्ज ताबडतोब मंजूर केले. हे झुकते माप देणे हा मोठा भ्रष्टाचार आहे. भाजपवाले छोटी भेसळ करणाऱयांना पकडून देशात गाजावाजा करणार, पण जे मोठे कारखानदार, व्यापारी भ्रष्टाचार करतात त्याकडे दुर्लक्ष करणार. ही मोठी लबाडी आहे.

वाधवान यांच्यावर भाजपने कारवाई केली का?

डीएचएलएफ कंपनीचे वाधवान यांना सनदी अधिकारी अमिताभ गुप्ता यांनी कोरोनाच्या काळात जेव्हा वाहतुकीवर निर्बंध होते तेव्हा खंडाळा ते महाबळेश्वर जायला मुभा दिली. त्यावेळी भाजपने बोंबाबोंब केली. अमिताभ गुप्ता यांच्यावर कारवाईही झाली. त्यांची बदली झाली. पण वाधवान यांच्यावर काही कारवाई भाजपने केली का? ती कठोर कारवाई का केली नाही?

वाधवान यांच्या आरकेडब्ल्यू डेव्हलपर्स, स्कील रिऍल्टर्स, दर्शन डेव्हलपर्स यासुद्धा कंपन्या आहेत. यातील वाधवान यांच्या कंपनीने भाजपला 20 कोटी रुपये देणगी म्हणून दिले होते. त्याअगोदरच्या तीन वर्षांत त्या कंपनीला समाधानकारक नफा मिळाला नव्हता, पण त्यानंतरही त्यांनी देणगी दिली. ती कशाच्या बदल्यात दिली हा प्रश्न भाजपला विचारायला हवा.

वाधवान कंपनीची सबसिडीरी कंपनी प्रिव्हिलेज हायटेकर्सला विजयदुर्ग बंदर विकसित करण्याचे कंत्राट देण्यात आले. त्या कंपनीत आर. चंद्रशेखर हा अर्णब गोस्वामीच्या चॅनेलचा संस्थापक व महत्त्वाचा भागीदार. ते खासदार आहेत. त्यांना हे कंत्राट देण्यात आले. कुठलाही उद्योगपती सामाजिक भावनेतून अशी देणगी देत नाही. त्यांनी 20 कोटी भाजपला दिले होते.

‘एडीआर’ या स्वयंसेवी संस्थेच्या रिपोर्टनुसार 2019-20 मध्ये टॉपच्या पाच राजकीय पक्षांना 921 कोटी रुपयांच्या देणग्या मिळाल्या. त्यात सर्वाधिक 720 कोटी भाजपला मिळाले. भाजप ज्या काँग्रेसवर तळापर्यंत भ्रष्ट आहेत असे आरोप करते त्या काँग्रेसला 133 कोटी रुपये मिळाले आणि भाजपच्या मते चिखलात बुडालेल्या राष्ट्रवादीला 57 कोटी मिळाले. भाजपला या देणग्या उगाचच देतात का? निवडणूक रोख्यांचा सर्वात जास्त फायदा सत्ताधारी भाजपला होतोय. रोखे देण्याची पद्धत पारदर्शक नाही हे सर्वांना माहीत आहे; परंतु भाजपने त्यात कुठलीही सुधारणा केलेली नाही.

भाजपकडे लॉण्ड्रीची कॉर्पोरेट कंपनी

मनी लॉण्डरिंग म्हणजे काय तर काळय़ाचे पांढरे करणे. भाजपकडे लॉण्ड्रीची मोठी कॉर्पोरेट कंपनी आहे. त्यात स्वच्छ धवल होतात कपडे. ते भाजपमध्ये असेपर्यंत पुन्हा कधीच मळत नाहीत.

काँग्रेसच्या काळात मंत्री सुखराम यांचा दूरसंचार घोटाळा बाहेर आला होता. त्यावरून भाजपने संसदेत धिंगाणा घातला होता. नंतर त्यांच्याशी भाजपने दोस्ती केली. त्यांना पावन करून घेतले. तशाच प्रकारे विद्याचरण शुक्ल यांचे उदाहरण देता येईल. आणीबाणीत ज्यांनी प्रचंड अत्याचार केले, त्यांनाही भाजपने सामावून घेतले होते. कृपाशंकर सिंह, नारायण राणे हे सर्व पावन झालेले आहेत. त्यानंतर आनंदराव अडसूळ, प्रताप सरनाईक, भावना गवळी, भास्करराव पाटील-खतगावकर, यशवंत जाधव, हर्षवर्धन पाटील, बबनराव पाचपुते, विजयकुमार गावीत ही नावे घेता येतील.

राऊत दोषी असतील तर देशातील अगणित नेत्यांना तुरुंगात टाकावे लागेल

नगरसेवक, आमदार, खासदार, मंत्री, राजकीय पक्षांचे पदाधिकारी यांचा बिल्डरांशी संबंध येतो. अनेकांचे पैसे बिल्डरांकडे असतात. काळा पैसा पांढरा केला जातो. म्हाडा, एसआरए इथे पैसे चारावे लागतात ही वस्तुस्थिती आहे. ‘मानापमान’मध्ये धैर्यधर होते. तसाच धैर्यवान माणूस म्हणजे संजय राऊत. ते जर दोषी असतील तर या देशातील अगणित नेत्यांना तुरुंगात टाकावे लागेल.

फडणवीसांनी विधिमंडळात नारायण राणेंवर आरोप केले होते. कुंडली सांगितली होती. लालबागमधील एका रिअल इस्टेट प्रकल्पाचा त्यांनी उल्लेख केला होता. कुणाचे शेकडो कोटी गुंतले आहेत तिथे असा तो मुद्दा. 300 कोटींची रक्कमही तेव्हा सांगण्यात आली होती. एका नेत्याचा तो पैसा आहे असे ते म्हणाले होते. लालबाग, परळ, नायगाव परिसरात कोणत्या नेत्याची बिल्डरकडे गुंतवणूक आहे याचा सहज शोध घेता येऊ शकतो, परंतु त्याची कुठेही चर्चा होत नाही. विखे-पाटील विरोधी पक्षनेते असताना त्यांनी फडणवीस सरकारवर आरोप केला होता अशाच एका घोटाळय़ाचा. आज ते भाजपमध्ये गेल्यावर पूर्णपणे विसरून गेले. राऊत यांच्यावर केवळ आरोप आहेत. अद्याप ते सिद्ध झालेले नाहीत. किरकोळ गुन्हा मोठा करून दाखवणार आणि त्याचीच मीडियावर चर्चा करणार. तुम्ही दुसऱयावर दगड मारता तेव्हा तुमचे व्यवहार काय आहेत हे लोक तुम्हालाही प्रश्न विचारतील.

भाजपच्या लोकांवर अशा कारवाया का होत नाहीत? समृद्धी महामार्गामध्ये हजारो कोटींचे व्यवहार झाले असतील, ते काढले तर त्यातून काय आढळेल याचेही उत्तर द्यायला हवे. उद्या चक्र फिरले, काँग्रेस पुन्हा सत्तेवर आली, शिवसेना केंद्रात सत्तेवर आली आणि त्यांनी हेच प्रकार सुरू केले तर कर नाही त्याला डर कशाला असे म्हटले जाणार नाही.

संजय राऊत, राहुल गांधी यांच्यात साम्य

आमदार कितीही कमी होवोत, उद्धव ठाकरे यांची साथ कधीच सोडणार नाही असे छातीठोकपणे सांगणारे संजय राऊत आणि काँग्रेस नेते राहुल गांधी यांच्यामध्ये आपल्याला साम्य वाटते. वारंवार पराभव झाला आणि माझ्यामागे कुणीही नसले तरी नरेंद्र मोदी यांच्या हुकूमशाहीविरुद्ध शेवटपर्यंत लढत राहीन, असे राहुल गांधी म्हणाले होते.

भाजपवाल्यांना ईडीने प्रेमाने भेट दिली तर किती कॅश मिळेल?

ईडीच्या म्हणण्यानुसार संजय राऊत यांच्याकडे 11 लाख सापडले. ज्या माणसाला विमानाने सातत्याने प्रवास करावा लागत असेल किंवा आपत्कालीन आरोग्य खर्चासाठी जवळ कॅश ठेवावी लागत असेल त्याच्याकडे 11 लाख सापडले तर मोठे आश्चर्य व्यक्त केले गेले. तीन वेळा खासदार झाले त्यांच्याकडे सापडलेले 11 लाख ही प्रचंड मोठी संपत्ती असेल तर ईडी, सीबीआयने भाजप आमदारांकडे–खासदारांकडे अचानक प्रेमाने स्नेहभेटी दिल्या तर त्यांच्याकडे किती कॅश मिळेल हे बघा. जे चाललेय ते अत्यंत संतापजनक आहे. सुनील राऊत यांनी हे पैसे पक्षाचे आहेत. अयोध्या यात्रेसाठीचे, असे सांगितले आहे. पश्चिम बंगालमध्येही एका नटीकडे पैसे सापडले. पार्थ चॅटर्जी यांना तृणमूल काँग्रेसने निलंबितही केले. तृणमूल काँग्रेसने तीन वेळा भाजपचा बुलडोझर चालला होता तो मागे हटवून सत्ता मिळवली. हे भाजपला बघवत नाही. झारखंडमध्येही बघवत नाही. ‘आप’चे सत्येंद्र जैन यांनाही आत टाकण्यात आले.

 (लेखक ज्येष्ठ राजकीय विश्लेषक आहेत)