उद्धव ठाकरे यांनी केली नालेसफाईची पाहणी

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

सामना प्रतिनिधी । मुंबई

शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी आज मुंबईतील नालेसफाईची पाहणी केली. नालेसफाई समाधानकारक असल्याचे सांगताना उर्वरित काम तातडीने पूर्ण करा असे आदेश त्यांनी पालिका अधिकाऱयांना दिले.

पावसाळा अवघ्या काही दिवसांवर आल्यामुळे पालिका प्रशासनाकडून नालेसफाईचे काम जोरदार सुरू असून हे काम अंतिम टप्प्यात आहे. मात्र पावसाळय़ात मुंबईकरांना कोणताही त्रास सहन करावा लागू नये यासाठी उद्धव ठाकरे यांनी मुंबई शहर आणि पश्चिम उपनगरातील नालेसफाईची पाहणी केली. यावेळी महापौर प्रिन्सिपल विश्वनाथ महाडेश्वर, आयुक्त अजोय मेहता, स्थायी समिती अध्यक्ष यशवंत जाधव, अतिरिक्त आयुक्त विजय सिंघल उपस्थित होते. यावेळी चमडावाडी नाला, हिंदमाता पंपिंग स्टेशन, वांद्रे नाला, फिटवाला नाला, अंधेरीचे ईर्ला पंपिंग स्टेशन आणि सांताक्रुझच्या गझदरबांध पंपिंग स्टेशनच्या कामाची पाहणी करून आढावा घेतला.

पावसाळय़ानंतरही काम सुरू राहणार
गेल्या २०-२५ वर्षांपासून नालेसफाईची पाहणी करतोय. त्या काळात अत्यंत अरुंद असणारे नाले आता रुंद करण्यात आले आहेत. त्यामुळे पाण्याचा निचरा वेगाने होत असल्याचे शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी यावेळी सांगितले. प्रशासनाने केलेल्या कामाची खरी स्थिती समजावी यासाठी नेहमीचे स्पॉट सोडून पाणी तुंबणाऱया ठिकाणांची पाहणी केली. या सर्व ठिकाणी अपेक्षित काम सुरू असून हे काम पावसाळय़ानंतरही सुरू राहील, असे ते म्हणाले.