
अगोदर कोरडा दुष्काळ होता. आता ओला दुष्काळ आहे. परिस्थिती अतिशय गंभीर आहे. पण खचू नका, धीर सोडू नका. आत्महत्या करण्याचा विचार तर मनात आणूही नका. या संकटाचा मुकाबला आपण मिळून करू. शिवसेना तुमच्या पाठीशी आहे, असा शब्दच शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी शेतकऱ्यांना दिला.
परतीच्या पावसाने केलेल्या नुकसानीची पाहणी करण्यासाठी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे हे आज मराठवाड्यात आले होते. संभाजीनगर जिल्ह्यात कन्नड तालुक्यातील कानडगाव व वैजापूर तालुक्यातील गारज येथे त्यांनी थेट बांधावर जाऊन परतीच्या पावसाने झालेल्या नुकसानीची पाहणी केली आणि शेतकऱ्यांशी संवाद साधला. मी तुम्हाला धीर देण्यासाठी आलो आहे. अन्नदात्याची परवड बघवत नाही. उन, वारा, पावसात शेतकरी राब राब राबत असतो. मातीतून सोनं पिकवण्याचे कसब असलेला अन्नदाताच आज उपाशी आहे. महाराष्ट्राचे हे वैभव होऊच शकत नाही असे उद्धव ठाकरे म्हणाले.
कागदी घोडे नाचवणे बंद करा
ओल्या दुष्काळामुळे शेतकऱ्याच्या घरची चूल विझली आहे. त्याला या क्षणाला मदतीची गरज आहे. मतदान करताना जनता नेत्यांचे ओळखपत्र, पॅनकार्ड, आधार कार्ड मागते का? मग मदत करताना कशाला पाहिजेत ही थेरं! पंचनामे, शिवार पाहणी वगैरे नाटके नंतर करा, कागदी घोडे न नाचवता शेतकऱ्यांना तात्काळ थेट मदत करा असे उद्धव ठाकरे यांनी ठणकावून सांगितले. लोकसभेच्या निवडणुकीत मोदी सरकार येण्यासाठी महाराष्ट्राने सिंहाचा वाटा उचलला आहे. आता संकटाच्या काळात त्याची परतफेड करा असे मी म्हणणार नाही पण शेतकऱ्यांना मदत करणे हे त्यांचे कर्तव्यच आहे, आणि आपण त्यांच्याकडून भरघोस मदत मिळवू अशी अपेक्षाही उद्धव ठाकरे यांनी यावेळी व्यक्त केली.
आत्महत्या करणार नाही, वचन द्या
परिस्थिती गंभीर आहे. जीवनमरणाचा प्रश्न आहे. सगळे काही खरे आहे. पण आत्महत्या हा त्यावरचा उपाय नाही. त्यामुळे मला अगोदर आत्महत्या करणार नाही असा शब्द द्या. तुम्ही माझ्या कुटुंबातले आहात. शिवसेना हा आपला परिवार आहे. कुटुंबातील एखादा सदस्य अडचणीत असताना त्याच्या मदतीला धावून जाणे हे आमचे कर्तव्यच नाही तर ती जबाबदारी आहे. शिवसेना सदैव तुमच्या पाठीशी आहे. फक्त आत्महत्येचा विचारही मनात आणू नका, असे कळकळीचे आवाहन उद्धव ठाकरे यांनी करताच उपस्थित शेतकऱ्यांनी त्यांना ‘होय, आम्ही आत्महत्या करणार नाही’ असे वचन दिले.
सातबारा कोरा झालाच पाहिजे
शेतकऱ्यांना देण्यात आलेली कर्जमाफी समाधानकारक नाही. शेतकरी कर्जमुक्तच झाला पाहिजे या मागणीचा जोरदार पुनरुच्चार यावेळी उद्धव ठाकरे यांनी केला. सरकार यायचे तेव्हा येईल, त्याचे काय व्हायचे ते होईल. पण शेतकऱ्याचा सातबारा कोरा करण्याचे वचन शिवसेनेने दिले आहे आणि ते आम्ही कोणत्याही परिस्थितीत पूर्ण करणारच असे उद्धव ठाकरे म्हणाले.





























































