उद्धव ठाकरे यांच्या सोमवारी धाराशिव जिल्ह्यात दोन सभा

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा
uddhav-thackeray-hatkangale

धाराशिव जिल्ह्यातील धाराशिव – कळंब व भूम – परंडा विधानसभा मतदारसंघातील शिवसेना-भाजपा – रिपाइं महायुतीचे अधिकृत उमेदवार कैलास पाटील व प्रा. डॉ. तानाजीराव सावंत यांच्या निवडणूक प्रचारार्थ शिवसेना पक्षप्रमुख उध्दव ठाकरे यांच्या सोमवार, 14 ऑक्टोबर रोजी धाराशिव व परंडा येथे जाहीर सभेचे आयोजन करण्यात आले आहे. शिवसेना पक्षप्रमुख उध्दव ठाकरे यांच्या या प्रचार दौऱ्यामुळे सध्या संपूर्ण जिल्हा भगवा झाला असून धाराशिव व परंडा येथे होणाऱ्या सभेची जय्यत तयारी करण्यात आली आहे. या दोन्ही सभांना जिल्ह्यातील महायुतीच्या पदाधिकारी, कार्यकर्ते व मतदारांनी मोठ्या संख्येने उपस्थित रहावे असे आवाहन शिवसेना उपनेते, जिल्हा संपर्कप्रमुख, पालकमंत्री तथा भूम – परंडा विधानसभा मतदारसंघातील महायुतीचे उमेदवार प्रा. डॉ. तानाजीराव सावंत, खासदार ओमप्रकाश राजेनिंबाळकर व धाराशिव विधानसभा मतदारसंघातील महायुतीचे उमेदवार कैलास पाटील यांनी केले आहे.

सोमवार, 14 ऑक्टोबर रोजी धाराशिव व परंडा येथे होणाऱ्या शिवसेना पक्षप्रमुख उध्दव ठाकरे यांच्या जाहीर प्रचार सभा भव्य दिव्य करण्यासाठी महायुतीच्या पदाधिकाऱ्याची जय्यत तयारी सुरु आहे. धाराशिव येथील सभा सकाळी 10.30 वाजता शहरातील कन्या प्रशालेच्या मैदानावर तर परंडा येथील सभा दुपारी 12.30 वाजता परंडा शहरातील कोटला मैदानावर होणार आहे. या दोन्ही सभेच्या ठिकाणी भव्य व्यासपीठाची उभारणी करण्यात आली आहे.

शिवसेना पक्षप्रमुख उध्दव ठाकरे यांचे उद्या सकाळी हेलीकॉप्टरने धाराशिव येथे आगमन होणार असून धाराशिव येथील सभा झाल्यानंतर ते परंडा येथील सभेला संबोधीत करणार आहेत. या दोन्ही ठिकाणच्या सभा भव्य, दिव्य व्हाव्या यासाठी शिवसेना उपनेते तथा जिल्हासंपर्कप्रमुख प्रा. डॉ. तानाजीराव सावंत, खासदार ओमप्रकाश राजेनिंबाळकर यांच्या मार्गदर्शनाखाली जय्यत तयारी करण्यात आली आहे. या सभेसाठी शिवसेना सचिव मिलींद नार्वेकर यांच्यासह भाजपाचे प्रदेश सरचिटणीस आमदार सुजितसिंह ठाकूर, जिल्हाध्यक्ष दत्ता कुलकर्णी, प्रदेश कार्यकारणी सदस्य नितीन काळे, रिपाइंचे जिल्हाध्यक्ष राजाभाऊ ओहाळ, रासपाचे बाळासाहेब पाटील – हाडोंग्रीकर यांच्यासह महायुतीचे प्रमुख पदाधिकारी उपस्थित राहणार आहेत.