उद्धव ठाकरे यांनी वाहिली श्रद्धांजली

सामना ऑनलाईन । नवी दिल्ली

शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी राजधानीत येऊन माजी पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी यांच्या पार्थिवाचे अंत्यदर्शन घेत त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण केली.भाजप मुख्यालयात उद्धव ठाकरे यांनी सौ. रश्मी ठाकरे, शिवसेना नेते, युवा सेनाप्रमुख आदित्य ठाकरे, तेजस ठाकरे यांच्यासह अटलजी यांना श्रद्धांजली वाहिली. त्यावेळी ज्येष्ठ भाजप नेते लालकृष्ण आडवाणी आणि उद्धव ठाकरे यांनी अटलजींच्या आठवणी जागवल्या. त्यातून अटलजी आणि हिंदुहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्यातील ऋणानुबंधांना उजाळा मिळाला. आडवाणी यांची कन्या प्रतिभा आडवाणी यावेळी उपस्थित होत्या.

अटलजींच्या कुटुंबीयांचे सांत्वन
उद्धव ठाकरे यांनी गुरुवारी मुंबईहून दिल्लीत दाखल होताच वाजपेयी यांच्या निवासस्थानी जाऊन त्यांच्या पार्थिवाचे अंत्यदर्शन घेतानाच त्यांच्या कुटुंबीयांची भेट घेऊन सांत्वन केले.

मोदी, शहांचीही भेट
उद्धव ठाकरे यांनी वाजपेयी यांच्या निधनाबद्दल पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि भाजप अध्यक्ष अमित शहा यांचीही सांत्वनपर भेट घेऊन सहवेदना व्यक्त केल्या.