
ज्येष्ठ समाजसेवक बाबा आढाव हे लोकशाही रक्षणासाठी संघर्ष करणाऱ्या पिढीचे दीपस्तंभ होते. त्यांच्या जाण्याने आपल्या सर्वांचाच मार्गदर्शक हरपला, अशा भावना व्यक्त करत शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी त्यांच्या निधनाबद्दल तीव्र दुःख व्यक्त केले.
महाराष्ट्रातल्या सामाजिक चळवळीला नवी दिशा देणारे बाबा आढाव गेले. 95 वर्षांचे त्यांचे आयुष्य हे गरीब, शोषित यांच्या उद्धारासाठीच त्यांनी सार्थकी लावले. ‘एक गाव, एक पाणवठा’, ‘हमाल पंचायत’ यासारख्या चळवळी त्यांनी उभ्या केल्या. अन्यायाविरुद्ध शेवटपर्यंत आवाज उठवणारे बाबा आढाव हे लोकशाही रक्षणासाठी संघर्ष करणाऱया पिढीचे दीपस्तंभ होते. ईव्हीएम घोटाळ्याविरुद्ध पुण्याच्या महात्मा फुले वाडय़ात त्यांनी केलेले आंदोलन लक्षणीय ठरले, असे उद्धव ठाकरे यांनी नमूद केले. उद्धव ठाकरे शोकसंदेशात पुढे म्हणतात, ‘‘बाबा हे आपल्या सगळ्यांचेच मार्गदर्शक होते. शेवटच्या श्वासापर्यंत ते संघर्ष करीत होते. त्या संघर्षाला पूर्णविराम मिळाला. बाबांच्या स्मृती कायम राहतील. ठाकरे परिवार व शिवसेनेतर्फे त्यांना विनम्र आदरांजली!’’





























































