
महाराष्ट्राच्या राजकारणात सध्या एका नवीन वादळाने सत्ताध्यांच्या घाम फोडला आहे. ते म्हणजे महाराष्ट्र आणि मराठी माणसाच्या मनावर राज्य करणारी शिवसेना आणि मनसेची युती. संपूर्ण महाराष्ट्र या युतीचा साक्षीदार आहे. शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षप्रमुख उद्धव ठाकरे आणि मनसे अध्यक्ष राज ठाकरे हे दोघेही निवडणुकीत एकत्र लढणार असून आता या दोघांची संयुक्त मुलाखतही होणार आहे. याबाबत शिवसेना नेते आणि खासदार संजय राऊत यांनी सोशल मीडियावर पोस्ट शेअर करत माहिती दिली आहे.
संजय राऊत यांनी सोशल मीडिया प्लॅटफॉर्म फेसबुकवर उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे यांचा फोटो शेअर केला आहे. यामध्ये त्यांनी “आता… दणदणीत आणि खणखणीत संयुक्त मुलाखत… सामना” अशी माहिती दिली आहे. राऊतांच्या या एका पोस्टने राजकीय वर्तुळात मोठी खळबळ उडवून दिली असून, अनेक वर्षांनंतर दोन्ही ठाकरे एकत्र एका व्यासपीठावर येणार असल्याने शिवसैनिकांमध्ये उत्साहाचे वातावरण आहे.
या मुलाखतीतून महाराष्ट्रातील सध्याची राजकीय स्थिती, आगामी महापालिका निवडणुका आणि हिंदुत्वाच्या मुद्द्यावर दोन्ही नेते काय भाष्य करतात, याकडे संपूर्ण देशाचे लक्ष लागले आहे. ही मुलाखत सामना’चे कार्यकारी संपादक संजय राऊत घेणार आहेत. संजय राऊतांच्या या पोस्टनंतर सोशल मीडियावर चर्चांना उधाण आले आहे. शिवसैनिक आणि मनसैनिक या मुलाखतीच्या टीझरची आतुरतेने वाट पाहत आहेत. सोशल मीडियावर सध्या ठाकरे बंधूंच्या या ऐतिहासिक भेटीची जोरदार चर्चा सुरू आहे



























































