
सामना ऑनलाईन । चाकण
मालिकेत महाराजांचे काम आणि मतदारसंघात शरद पवारांचे काम हा तर भगव्याशी आणि स्वराज्याशी द्रोह आहे. स्वराज्याशी द्रोह खपवून घेणार नाही, असा घणाघात शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी चाकण येथील विराट सभेत केला. निष्ठा कशाला म्हणतात हे शिवा काशीद यांच्याकडून शिकले पाहिजे, असा जबरदस्त टोला उद्धव ठाकरे यांनी लगावला.
शिरूर लोकसभा मतदारसंघातील शिवसेना-भाजप महायुतीचे उमेदवार खासदार शिवाजीराव आढळराव-पाटील यांच्या प्रचारार्थ चाकण येथे आणि मावळ लोकसभा मतदारसंघातील महायुतीचे उमेदवार श्रीरंग बारणे यांच्या प्रचारार्थ काळेवाडी फाटा येथे शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांची विराट जाहीर सभा झाली.
तुम्हाला हा तुमच्या सोबत राहून काम करणारा आढळराव यांच्यासारखा खासदार पाहिजे की मालिकेत काम करणारा खासदार पाहिजे, असा सवाल उद्धव ठाकरे यांनी करताच उपस्थितांनी आढळराव यांच्या नावाचा नारा दिला. त्याचा उल्लेख करून उद्धव ठाकरे म्हणाले, जीव ओतून आणि मन लावून छत्रपती शिवाजी महाराजांचे काम करणारा कलाकार हा कधी भगवा घरी ठेवा आणि दुसऱ्याला निवडून द्या असे म्हणणार नाही. मालिकेत महाराजांचे काम आणि मतदारसंघात शरद पवारांचे काम हा तर भगव्याशी आणि स्वराज्याशी द्रोह आहे. स्वराज्याशी द्रोह खपवून घेणार नाही असे उद्धव ठाकरे यांनी ठणकावताच टाळ्यांचा प्रचंड कडकडाट झाला.
उद्धव ठाकरे यांनी पन्हाळगडावरील शिवा काशीद यांच्या पराक्रमाचा यावेळी उल्लेख केला. भगव्याची आणि स्वराज्याची निष्ठा काय असते याचा आदर्श म्हणजे शिवा काशीद. मृत्यू समोर असतानादेखील तो डगमगला नाही. माझे मरण हे शिवाजी महाराज बनून भगव्यासाठी बलिदान असेल तर ते माझे भाग्य आहे अशी निष्ठा असणारा शिवा काशीद होता, मात्र दुसरीकडे महाराजांची भूमिका करणारा आणि मतदारसंघात शरद पवारांचे काम करणाऱ्याने शिवा काशीद यांच्याकडून निष्ठा काय असते हे शिकले पाहिजे, असे उद्धव ठाकरे यांनी बजावले.
मी हे पोटतिडकीने तुमच्यासमोर मांडत आहे खडी गंमत म्हणून सांगणाऱ्यांपैकी नाही असे सांगत उद्धव ठाकरे म्हणाले, आपल्याला एक एक खासदार महत्त्वाचा आहे. या शिरूर लोकसभा मतदारसंघाच्या विकासासाठी जबाबदारी मी घेतो. बैलगाडा शर्यतीवरील बंदीचा प्रश्न सोडवायला सरकारची गरज आहे की नाही असे विचारताच उपस्थितांनी आहे… आहे … असा प्रतिसाद दिला. पुणे-नाशिक महामार्गाचे काम आणि रेल्वेचे काम सरकार म्हणून ही कामे आम्हीच करणार आहोत, असे उद्धव ठाकरे यांनी ठामपणे सांगितले.
यावेळी पालकमंत्री गिरीश बापट, शिवसेना सचिव मिलिंद नार्वेकर, जलसंपदा राज्यमंत्री विजय शिवतारे, शिवसना उपनेत्या डॉ. नीलम गोऱहे, रवींद्र मिर्लेकर, उदय सामंत, आमदार सुरेश गोरे, शरद सोनवणे, महेश लांडगे आदी उपस्थित होते.
चौकार, षटकार मारणारच
शिवाजीरावांच्या सभेला आल्याशिवाय निवडणुकीची खरी गंमत येत नाही अशी आपुलकीची साद उद्धव ठाकरे यांनी घालताच उपस्थितांमधून चौकार… चौकार… असा आवाज सुरू झाला तेव्हा उद्धव ठाकरे यांनी आयपीएल सुरू आहे. चौकार, षटकार मारला पाहिजे आणि तो मारणारच! समोर जमलेली जनता आढळराव आपल्याला अभिमानाने नाही तर सन्मानाने दिल्लीला पाठवणार आहे, असा विश्वास व्यक्त केला.























































