
मराठा आरक्षणासाठी विधीमंडळाचे मंगळवारी विशेष अधिवेशन घेण्यात आले होते. या अधिवेशनात मराठा आरक्षण विधेयकाचा प्रस्ताव मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मांडला. त्यानंतर हे विधेयक एकमताने मंजूर करण्यात आले. हे आरक्षण कायद्याच्या सर्व निकषांवर आणि पातळ्यांवर टिकावं हीच माझी प्रार्थना आहे, अशी प्रतिक्रिया शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी दिली आहे.
माध्यमांनी विचारलेल्या प्रश्नावर बोलताना उद्धव ठाकरे म्हणाले की, प्रथम मी मराठा समाजातील माताभगिनी आणि बांधवांना सांगू इच्छितो की ज्या ज्या वेळी हा विषय आमच्या समोर आला, तेव्हा सभागृहात सर्व पक्षांनी हा ठराव एकमताने मंजूर केला आहे. तो 2018 मध्येही होता आणि आजही होता. 2018 साली आणि त्याआधी काय झालं, त्या खोलात मला जायचं नाही. मला खात्री आहे ज्या पद्धतीने हा प्रस्ताव मांडला गेला आणि हे विधेयक मंजूर झालं, याचा अर्थ असा की कायद्याच्या सर्व निकष आणि पातळींवर हे आरक्षण टिकेल अशी मला आशा वाटते, माझी प्रार्थना आहे, अशी प्रतिक्रिया उद्धव ठाकरे यांनी यावेळी दिली.
या मंजुरीविषयी बोलताना उद्धव ठाकरे पुढे म्हणाले की, सभागृहात कुणाला समजावून सांगण्याची गरज नव्हती. कारण, आधी आणि आता दोन्ही वेळेला एकमताने या विधेयकाला पाठिंबा दिला होता. मी मराठा समाजाला धन्यवाद देऊ इच्छितो कारण त्यांनी खूप मोठा लढा दिला आहे. सरकारला मला इतकंच सांगायचंय की, तुम्ही हा प्रयत्न केला, तेव्हा तुमच्या प्रामाणिकपणाबद्दल मी आतातरी शंका घेत नाही. पण त्याकरता मराठा समाजातल्या अनेकांना बलिदान द्यावं लागलं. जरांगे पाटील जेव्हा प्रथम उपोषणाला बसले होते, तेव्हा मी जालन्याला गेलो होतो. ज्या निर्घृणपणे आणि निर्दयीपणे त्या आंदोलकांवर अत्याचार केला होता, त्यांची डोकी फोडली होती. ती फोडण्याची काही गरज नव्हती. हा विषय पहिल्यापासून शांततेने सोडवता आला असता. मला आज राजकारणात जास्त काही बोलायचं नाहीये. पण, कोणत्याही समाजाच्या आरक्षणाला धक्का न लावता हे आरक्षण दिलं असं मुख्यमंत्र्यांनी सांगितलं, त्याबद्दल मी त्यांना धन्यवाद देतो आणि एकच प्रार्थना करतो, की पूर्वीचे सगळे अनुभव लक्षात घेऊन हे आरक्षण कायद्याच्या सर्व निकषांना आणि पातळीवरती टिकून राहिल, असं टिकणारं आरक्षण मराठा समाजाला मिळेल अशी आशा बाळगतो. हे आरक्षण शिक्षण आणि नोकरीमध्ये दिलेलं आहे. शैक्षणिक वर्ष सुरू होईल, तेव्हा कळेलच. पण आता तातडीने मराठा समाजातील किती भगिनी आणि बांधवांना कुठे नोकऱ्या मिळतील, हे सरकारने जाहीर केलं तर सोन्याहून पिवळं होईल, असंही ते यावेळी म्हणाले.
आरक्षणावरून महाविकास आघाडीत मतभेद आहेत का या प्रश्नावर बोलताना दोन मतं असल्याचा संबंध नाही. तसं असतं तर सभागृहात एकमताने मंजूरच केलं नसतं. तुम्ही नीट समजून घ्या. मराठा समाजालाही मी हेच सांगतोय की गेल्या महिन्यात सुद्धा गुलाल उधळला गेला होता. मग नंतर लक्षात आलं की फसवणूक झाली. त्याच प्रमाणे आताही सरकारने जी हमी घेतलेली आहे, ही हमी निवडणुकीच्या तोंडावर घेतलेली आहे. निवडणूक या सगळ्यात काढून घेण्याचा डाव त्यात नसेल ना, असा प्रश्न मी आजतरी उपस्थित करू इच्छित नाही. कारण मला राजकारण आणायचं नाही. पण पूर्ण खात्री पटल्याशिवाय या सरकारवरती भरोसा ठेवणं जरा कठीण आहे, असं उद्धव ठाकरे यावेळी म्हणाले.





























































