
‘‘होय, हा कुटुंब वाचवण्याचा लढा आहे आणि अवघा भारत हेच आमचे कुटुंब आहे,’’ अशा शब्दांत शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी आज भाजप आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना ठणकावून सांगितले. आमची लढाई कुणा एका पक्षाच्या विरोधात वा एका व्यक्तीच्या विरोधात नाही तर हुकूमशाहीविरोधात आहे, असे नमूद करत आम्ही विजयी होणारच, असा विश्वास उद्धव ठाकरे यांनी व्यक्त केला.
भाजपविरोधात 2024च्या लोकसभा निवडणुकीसाठी ऐक्याची वज्रमूठ आवळली गेली आहे. आज ‘इंडिया’ या नव्या राष्ट्रीय आघाडीची घोषणा झाली. या वेळी बोलताना उद्धव ठाकरे यांनी देशातील सद्यस्थितीवर भाष्य करत परखडपणे भूमिका मांडली. हुकमूशाहीविरोधात जनता एकजूट होत आहे. आज आमची दुसरी बैठक यशस्वीरीत्या पार पडली. ‘इंडिया’ हे आघाडीचे नावही घोषित झाले आहे. इंडिया म्हणजेच भारतासाठी आम्ही सारे लढत आहोत आणि हा लढा आम्हाला पुढे न्यायचा आहे. त्यासाठीच आम्ही एकत्र आलो आहोत, असे उद्धव ठाकरे म्हणाले.
पाटणा आणि आता बंगळुरू अशा दोन बैठका झाल्या आहेत. आजची बैठक यशस्वी ठरली. काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे, मुख्यमंत्री सिद्धरामय्या, उपमुख्यमंत्री शिवकुमार या सगळ्यांनाच मी धन्यवाद देईन. त्यांनी चांगले आयोजन केले. आता पुढची बैठक महाराष्ट्रात मुंबईत आपण घेऊ. त्याची तारीख ठरेलच, असे उद्धव ठाकरे यांनी पुढे नमूद केले.
स्वातंत्र्य धोक्यात
काही लोकांना असे वाटतेय की, आम्ही ही कुटुंबासाठी लढाई लढत आहोत. हो, आम्ही कुटुंबासाठीच लढतोय. देश हेच आमचे कुटुंब आहे आणि त्या कुटुंबासाठी आम्ही लढत आहोत. त्या कुटुंबाला आम्हाला वाचवायचे आहे. आमची लढाई एका पक्षाच्या विरोधात किंवा एका व्यक्तीच्या विरोधात नाही. ही लढाई नीतीविरोधात आणि हुकूमशाहीविरोधात आहे, असे उद्धव ठाकरे यांनी निक्षून सांगितले. एक लढाई स्वातंत्र्यासाठी झाली होती. आज तीच स्थिती निर्माण झाली आहे. देशाचे स्वातंत्र्य धोक्यात आहे. हे स्वातंत्र्य टिकवण्यासाठी आम्ही सगळे एकत्र आलो आहोत आणि यशस्वी होणारच हा मला ठाम विश्वास आहे, असे उद्धव ठाकरे म्हणाले.
ही लढाई इंडिया विरुद्ध डिक्टेटरशिप
भारताची एकात्मता आणि सार्वभौमत्व टिकवून ठेवण्यासाठी विरोधी पक्षांची जी वज्रमूठ तयार झाली आहे तिचं नाव सार्थ आहे- ‘इंडिया’ आहे. लढाई आता इंडिया विरुद्ध डिक्टेटरशिप अशी असणार आहे, असा हल्ला शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) नेते, युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे यांनी चढवला. आदित्य ठाकरे आणि शिवसेना नेते, खासदार संजय राऊत बंगळुरूतील बैठकीला उद्धव ठाकरे यांच्यासमवेत उपस्थित होते.
हम है ना…
आता काय होणार, अशी भीती देशातील जनतेच्या मनात आहे. मात्र त्यांनी घाबरण्याचे काहीही कारण नाही. मध्ये एक चित्रपट आला होता… ‘मै हू ना’ तसेच मी जनतेला सांगेन… हम है ना… जनतेने कशासाठी घाबरले पाहिजे? एक व्यक्ती, एक पक्ष म्हणजे देश होऊ शकत नाही. या देशातील जनता म्हणजे देश आहे, असे नमूद करत उद्धव ठाकरे यांनी विश्वास दिला. देशातील जनता इंडिया आणि भारत बनून पुढे येणार आहे आणि त्या बळावर आपल्या देशाला आम्ही सुरक्षित ठेवणार आहोत, असे उद्धव ठाकरे यांनी सांगितले.
यालाच लोकशाही म्हणतात
तुमच्या वेगवेगळ्या विचारधारा आहेत, असे मला विचारले जाते… त्यावर माझं स्पष्ट मत आहे – राजकारणात वेगवेगळ्या विचारधारा असल्याच पाहिजेत. यालाच तर लोकशाही म्हणतात. मात्र वेगळ्या विचारधारा असूनही आम्ही एकत्र आलो आहोत. कारण ही लढाई फक्त आमच्या एका पक्षाची नाही, असे ठणकावून सांगत उद्धव ठाकरे यांनी तोफ डागली.
मोदी विरुद्ध ‘इंडिया’ असा हा लढा
ही लढाई केवळ विरोधी पक्ष विरुद्ध भाजप अशी नाही. तर ‘आयडिया ऑफ इंडिया’वर जे हल्ले होताहेत त्यासाठी आमचा हा लढा आहे. त्यामुळे ‘इंडिया’ हे नाव देण्यात आल्याचे काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी सांगितले. एनडीए, भाजपची विचारधारा, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याविरुद्ध ‘इंडिया’ असा हा लढा आहे. आज देशातील संस्थांवर हल्ले होत आहेत. आमचा लढा भाजपच्या या विचारधारेविरुद्ध आहे. आमची आघाडी ‘इंडिया’ हा जनतेचा आवाज आहे. लवकरच एक कृती आराखडा तयार करू आणि आम्ही याबद्दल जनतेला माहिती देऊ, असे राहुल गांधी यांनी सांगितले.
एकत्र लढू आणि जिंकू!
राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवार हे विरोधी पक्षांच्या सोमवारी झालेल्या बैठकीला उपस्थित नव्हते. ते मंगळवारी बैठकीला उपस्थित राहिले. बैठकीनंतर ट्विटरच्या माध्यमातून शरद पवार यांनी आपली भूमिका स्पष्ट केली. भाजपाविरोधात एकजुटीने लढू आणि सर्व जण मिळून भाजपाचा पराभव करू, असे ट्विट शरद पवार यांनी केले.
‘इंडिया’साठी आमची एकजूट
आजपासून खरी लढाई सुरू झाली आहे. इंडिया म्हणून आम्ही यापुढे दोन हात करणार आहोत. एनडीएत हिंमत असेल तर त्यांनी इंडियाला रोखून दाखवावे, असे आव्हान पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी दिले. सरकारची खरेदी-विक्री हेच काम देशात सध्या सुरू आहे. भाजप लोकशाहीचा सौदागर बनला आहे. म्हणूनच इंडियासाठी आम्ही देशप्रेमी एकत्र आलो आहोत, असे ममता म्हणाल्या.





























































